#5मोठ्याबातम्या : क्रांतीकारक राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक होते - RSS

आरएसएस

आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. शहीद राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक होते - RSS

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे आणि भगत सिंग यांचे निकटचे सहकारी राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा दावा संघ प्रचारक नरेंद्र सेहगल यांनी केला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. 'भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता' या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे यावर त्यांनी हे पुस्तक लिहलं आहे. राजगुरू यांनी नागपूर येथे येऊन डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली. राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते. हेडगेवार यांनी आपले सहकारी भैयाजी दाणी यांच्या फार्म हाऊसवर राजगुरू यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती, असं देखील या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे.

2. लष्करासोबतच्या चकमकीत 13 जहालवादी ठार

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी शोपियान आणि अनंतनाग जिल्ह्यात लष्कर आणि जहालवाद्यांच्या चकमकीत 13 जहालवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या चकमकीत तीन जवान ठार झाले आहेत, असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

ज्या वेळी चकमकी सुरू होत्या त्याच वेळी गावांमध्ये निदर्शनं झाली. जमावाला शांत करण्यासाठी सैन्यानं पेलेट गनचा वापर केला. त्यामध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसंच 4 नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. जमाव प्रक्षोभक झाल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं होतं तसंच शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातली रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. आज होणाऱ्या शाळांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

3. चार वर्षांतील सर्वांत मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ

रविवारी चार वर्षांतील सर्वांत मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. नवी दिल्लीत पेट्रोल 73.73 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 64.58 रुपये प्रतिलीटर झाला आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅंडर्डनं दिलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 18 पैशांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर 2014मध्ये पेट्रोलचा दर 76.06 ला भिडला होता तर डिझेलची किंमत 64.58 रु. प्रतिलीटर इतकी झाली होती. त्यानंतर ही सर्वांत मोठी दरवाढ आहे.

4. ISISने ठार केलेल्या भारतीयांचे मृतदेह आज भारतात

इराकमध्ये ISISकडून ठार झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह आज भारतात आणले जातील अशी माहिती परराष्ट्र खात्यानं दिली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी मोसूलला रवाना झाले. आज (सोमवारी) ते भारतात परतणार आहेत.

ISISनं एकूण 39 जणांना ठार केलं होतं. त्यापैकी 38 जणांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले जाणार आहेत. एका व्यक्तीच्या मृतदेहाबाबत अद्याप कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या नसल्यामुळे तो मिळणार नसल्याची माहिती परराष्ट्र खात्यानं दिली आहे. सिंह परत आल्यावर आधी अमृतसरला, त्यानंतर पाटणा आणि कोलकात्याला जाऊन मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देतील.

5. ठाण्याच्या पारसिक बोगद्याजवळ महिला रेल्वे प्रवाशांवर हल्ले

ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरातल्या पारसिक बोगद्याजवळ लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पारसिक बोगद्यातून लोकल ठाण्याकडून मुंब्र्याकडे येत असताना काही तरुण महिलांवर दगड आणि इतर जड वस्तू भिरकवतात. हे तरुण स्थानिक असावेत असं म्हटलं जात आहे.

अशाच हल्ल्यात डोंबिवलीच्या विद्या कोळी या प्रवासी जखमी झाल्या आहेत, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. या हल्ल्यात कोळी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)