'राजगुरू स्वयंसेवक होते, असं म्हणणं चुकीचं'

राजगुरू Image copyright NARINDER NANU/getty
प्रतिमा मथळा राजगुरू, भगत सिंग आणि सुखदेव

भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत 23 मार्च 1931 रोजी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा दावा संघाचे प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी एका पुस्तकातून केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजगुरू हे खरंच स्वयंसेवक होते का? असा प्रश्न सोशल मिडीयामध्ये विचारला जात आहे.

ब्रिटिश अधिकारी जे. पी. साँडर्स यांच्या हत्येच्या प्रकरणात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी झाली होती. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा प्रतिशोध म्हणून या तिघांनी 1928मध्ये साँडर्स यांची हत्या केली होती. 1931मध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती.

"स्वातंत्र्य लढ्यात 'संघा'चे काय योगदान आहे, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नाला उत्तर देऊन गैरसमज दूर करावेत या उद्देशाने 'भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता' हे पुस्तक आपण लिहिलं आहे," असं या पुस्तकाचे लेखक नरेंद्र सेहगल यांनी बीबीसीला सांगितलं.

"साँडर्स यांच्या हत्येनंतर राजगुरू नागपूरला गेले होते. नागपूरमध्ये त्यांनी 'संघा'चे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भेट घेतली. हेडगेवार यांनीच त्यांची एका सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था केली आणि पुण्याला न जाण्याचा सल्ला दिला," असं सेहगल सांगतात.

Image copyright Getty Images

डॉ. हेडगेवार आणि राजगुरू यांची भेट झाली होती याला काय पुरावा आहे, असं विचारलं असता ते सांगतात, "डॉ. हेडगेवार यांचे सहकारी नारायण हरी पालकर यांनी 1960मध्ये हेडगेवार यांच चरित्र लिहिलं आहे. त्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी हे लिहिलं आहे. 'संघा'शी असलेल्या जवळीकतेमुळेच राजगुरू नागपूरला गेले."

'राजगुरू डॉ. हेडगेवार यांना भेटले होते पण ते स्वयंसेवक नव्हते'

"लाहोरहून परतल्यावर राजगुरू नागपूरला गेले होते आणि त्यांनी डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली होती. त्या काळात राजगुरू भूमिगत होते. त्यांना लपण्यासाठी देखील हेडगेवारांनी जागा दिली होती या गोष्टी खऱ्या आहेत पण ते स्वयंसेवक होते असं म्हणता येणार नाही," असं राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू सांगतात.

Image copyright Getty Images

"त्या काळात क्रांतिकारक आणि समाजसेवकांचा जनमानसावर मोठा प्रभाव होता. डॉ. हेडगेवार यांचा देखील महाराष्ट्रातील जनतेवर प्रभाव होता. त्यामुळं त्यांना देशातील विविध भागातील क्रांतिकारक भेटत असत. त्यापैकीच शहीद राजगुरू देखील एक होते," असं सत्यशील राजगुरू सांगतात.

क्रांतिकारकांना 'संघ' आपल्यासोबत का जोडत आहे?

"भारताच्या स्वातंत्र लढ्यात संघाचं काही योगदान नसणं ही 'संघा'ची दुखती नस आहे. त्यांच्या स्वयंसेवकांनी लढ्यात भाग घेतला नव्हता म्हणून ज्यांनी भाग घेतला आहे अशा क्रांतिकारकांना ते आपल्यासोबत जोडतात," असं मत इतिहासकार चमन लाल यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. चमन लाल यांनी 'भगतसिंग आणि त्यांचे सहकारी' या ग्रंथाचं संपादन केलं आहे. भगत सिंग यांच्या संदर्भातील कागदपत्रांचा त्यांनी संग्रह केला आहे.

Image copyright Getty Images

"या आधी 'संघा'ने उधमसिंग यांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. राजगुरू हे मराठी होते. RSSचे संस्थापक देखील मराठीच होते त्यामुळं हा संबंध जोडला गेला असावा पण याबाबतचा ठोस पुरावा नाही. फक्त ओळख असणं हे एखाद्या विचारधारेशी जोडले गेले असल्याचा पुरावा नाही," असं चमन लाल सांगतात.

"राजगुरू यांचे सहकारी शिव वर्मा यांनी 'संस्मृतियाँ' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी राजगुरू हे समाजवादी विचारसरणीचे होते असं लिहिलं आहे. भगतसिंग आणि त्यांचे सर्व साथीदार हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. त्यामुळे ते हिंदुत्ववादी विचारसरणीकडे झुकण्याची शक्यता कमी वाटते," असं चमन लाल यांचं म्हणणं आहे.

Image copyright Getty Images

जर, राजगुरू हे स्वयंसेवक होते तर त्यांनी स्वतःच ही गोष्ट कधी जाहीर का केली नाही? असा विचारलं असता सेहगल सांगतात, "स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी संघानं आपल्या स्वयंसेवकांना सांगितलं होतं की तुम्हाला ज्या संघटना किंवा आंदोलनात सहभागी व्हायचं असेल त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्या प्रमाणे काही स्वयंसेवक महात्मा गांधी यांच्यासोबत गेले तर काही स्वयंसेवक क्रांतिकारक बनले. आणीबाणीच्या काळात संघातल्या लोकांनी जय प्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. दुसऱ्याचं नेतृत्व स्वीकारलं म्हणजे ते स्वयंसेवक नव्हते असा त्याचा अर्थ होत नाही."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)