ग्राउंड रिपोर्ट : जिथं दलित असाल तर डिस्पोजेबल कपमधून दिला जातो चहा

  • बाला सतीश
  • बीबीसी तेलुगू
फोटो कॅप्शन,

दलित समाजातील व्यक्तींना हीन वागणूक दिली जाते.

स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनंतरही दलित समाजाला चहा वेगळ्या पेल्यातून प्यावा लागतो. बीबीसी तेलुगूनं आंध्र प्रदेशातल्या दुर्गम गावांमधल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

तुम्ही हॉटेलात जाता. चहा पिता. चहा प्यायल्यावर तुम्ही कधी स्वत:चा कप विसळला आहे का? दक्षिण भारतातल्या अनेक भागात हॉटेलांमध्ये चहा प्यायल्यानंतर काही विशिष्ट लोकांना स्वत:चा कप स्वत:च विसळावा लागतो.

जातीच्या उतरंडीत शेवटच्या स्तरावर असणाऱ्या दलित समाजाला अशी वागणूक मिळते. अनेकदा गावकऱ्यांबरोबर चहा पिण्याचीही त्यांना अनुमती नसते.

काय असते ग्लास सिस्टम

दलितांनी ज्या कपातून चहा प्यायला आहे तो कप वेगळा ठेवला जाण्याच्या पद्धतीला टू ग्लास सिस्टम म्हटलं जातं. स्वतंत्र भारताच्या काही भागात अजूनही ही पद्धत कायम आहे.

काही अपवाद सोडले तर सवर्ण परिवारांमध्ये आजही दलित माणसांनी वापरलेली भांडी वेगळी ठेवली जातात. सार्वजनिक ठिकाणी दलितांचे ग्लास वेगळे ठेवण्याची परंपरा धक्कादायक आहे. समाजसुधारकांचं कार्य आणि भेदभावविरोधी कायदेकानून असूनही भेदाभेदाची परंपरा अजूनही संपुष्टात आलेली नाही.

जातींवरआधारित भेदभाव रोखण्यासाठी संविधानात अनेक कलमं आहेत. संविधानाचं 15वं कलम जाती, धर्म, वंश, लिंग तसंच जन्मस्थानावर आधारित भेदभाव रोखतं. 16व्या कलमानुसार समान संधी मिळण्याबाबतही तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे.

फोटो कॅप्शन,

चहा पिताना दलितांना भेदभावाची वागणूक मिळते.

जातीपातींवर आधारित अत्याचार रोखण्यासाठीच 1989मध्ये अॅट्रॉसिटी कायदा पारित करण्यात आला. मात्र एवढ्या सगळ्या उपाययोजना असूनही जातीआधारित भेदभाव अजूनही कटू सत्य आहे.

दशकभरापूर्वी शोध लागलेल्या पेपरकपसारख्या छोट्या गोष्टीनं भेदभावाच्या प्रथेला मूठमाती दिली आहे. चहाच्या टपऱ्या आणि हॉटेलांमध्येही डिस्पोजेबल ग्लासेसचं पेव फुटलं आणि भेदभावाचा विषय हळूहळू मागे पडला. आता कोणत्याही जातीच्या व्यक्तीला चहा प्यायलानंतर स्वत:चा कप स्वत: विसळावा लागत नाही.

कागदाच्या ग्लासाने किती बदललं चित्र?

बीबीसीच्या टीमनं आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागात असलेल्या मुत्ताई वल्सा, तम्मी वल्सा, कामा वल्सा आणि पीरिडी भागाचा दौरा केला. पेपररकपनं दलितांचं जीवन किती बदललं याचा आम्ही आढावा घेतला.

विजयनगरम जिल्ह्यातल्या मुत्ताई वल्सा गावात उपेक्षित वर्गाची मंडळी राहतात. या गावात चहाची छोटीशी टपरी चालवणाऱ्या गृहस्थांना आम्ही भेटलो. तिथं दलितांना डिस्पोजेबल कपातून चहा दिला जातो तर अन्य जातीच्या लोकांना नेहमीच्या काचेच्या कपातून चहा दिला जातो.

फोटो कॅप्शन,

चहाच्या पेल्यातलं वादळ

"आधी आमच्या गावात दोन प्रकाराचे ग्लास चहाच्या टपरीवर असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या भीतीमुळे डिस्पोजेबल ग्लास दिसू लागले आहेत. गावात सगळ्या जातीधर्माची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. आमच्यात कोणतंही भांडण नाही. एखाद्याला प्लॅस्टिकच्या ग्लासात चहा पिण्यात अडचण असेल तर तो घरून स्वत:चा कप घेऊन येतो," असं गावातील दलित नागरिक वेनक्कना यांनी सांगितलं.

भारताच्या लोकसंख्येत दलितांचं प्रमाण 16 टक्के आहे. 2011 जणगणनेनुसार आंध्र प्रदेशात (ज्यामध्ये आताच्या तेलंगणाचाही समावेश आहे) दलितांचं प्रमाण 16 टक्के आहे.

आम्ही नाराजी व्यक्त केली होती

मुत्ताई वल्सा गावातीलच दलित युवक राजू यांनी परिस्थिती सांगितली. आम्ही गावात बंधुभावानं राहतो असं राजू सांगतात. चहाच्या टपरीवर तसंच छोटेखानी हॉटेलात दोन स्वतंत्र ग्लास देण्याच्या पद्धतीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

फोटो कॅप्शन,

काचेच्या कपांची स्वच्छता अशी राखली जाते.

ते पुढे म्हणाले, "आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर चहाच्या टपऱ्या आणि छोट्या हॉटेलांमध्ये प्लॅस्टिकचे ग्लास आले. डिस्पोजेबल कप आल्यापासून आम्ही प्रेमानं राहत आहोत."

दरम्यान नेहमीचे कप साफ नसतात म्हणून त्यातून चहा प्यायला आवडत नाही, असं परिसरातल्या दलित महिलेनं सांगितलं.

सण कसे साजरे होतात?

गावातली दलितेत्तर मंडळी मात्र कोणत्याही भेदभावाच्या गोष्टीचा इन्कार करतात. गावातल्या वृद्धांनी मात्र वेगळीच कहाणी सांगितली. सणासुदीच्या काळात दलित मंडळी आमच्या घरी येतात. आम्ही एकत्र खातोपितो. इथे ग्लास सिस्टम अजिबात अस्तित्वात नाही.

तर 12वीत शिकणाऱ्या युवकानं अशा प्रथा आमची पिढीच हाणून पाडेल असं सांगितलं.

फोटो कॅप्शन,

चहाच्या पेल्यावरून अस्पृश्यता दिसते.

दुसऱ्या गावातली स्थिती

बीबीसीच्या टीमनं तम्मी वल्सा गावाला भेट दिली. या गावात टू ग्लास सिस्टम आहे की नाही याचा या टीमनं आढावा घेतला. या गावात छोटी हॉटेलं जातीच्या उतरंडीत खाली असणाऱ्या जातीची मंडळीच चालवतात.

"उपेक्षित वर्गाच्या लोकांना नेहमीच कप आणि डिस्पोजेबल कप अशा दोन्हीतून चहा देतो. दलितांना डिस्पोजेबल ग्लास आणि पेपरप्लेटमध्ये खाणंपिणं देतो. मात्र कोणीही कधीही याविरोधात बोललेलं नाही," हॉटेल चालकानं सांगितलं.

फोटो कॅप्शन,

चहाच्या टपरीवरचे दृश्य

एकतेची भावना

भेदभावाविरोधात कोणते कायदेशीर अधिकार आहेत याची गावातल्या दलितांना जाणीव आहे. तसं असूनही त्यांना गावकऱ्यांसोबत मिळून मिसळून राहायचं आहे.

पिरिडी नावाच्या गावात बीबीसीच्या टीमला टू ग्लास सिस्टम आढळली नाही. 1990 मध्येच ही प्रथा बंद झाली असं गावकरी सांगतात.

टू ग्लास सारखी सिस्टम कधीही अनुभवली नसल्याचं 40वर्षीय दलित नागरिक रामाराव यांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

पिरिडी गावात दलितांना चहा वेगळ्या पेल्यात देण्याची व्यवस्था नाही.

सामाजिक दबाव

टू ग्लास सिस्टमला विरोध तीव्र झाल्यानंतर आणि समाजात याविषयी जागरुकता निर्माण झाल्यानंतर ही प्रथा बंद झाली, असं अनेक सामाजिक चळवळींशी संलग्न असलेल्या सिम्हाचलम यांनी सांगितलं.

काही हॉटेलांमध्ये अजूनही टू ग्लास सिस्टम प्रथा सुरू आहे, असं दलितांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सोरू रामबैया यांनी सांगितलं.

गावांमध्ये टू ग्लास पद्धती आता अजिबात नाही यावर तुमचं एकमत आहे का, असं रामबैया गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना विचारतात. ही प्रथा नष्ट होण्यासाठी पोलिसांनी लक्ष ठेवायला हवं असंही ते सांगतात.

गावातल्या सगळ्यांना एकाच प्रकारच्या कपात चहा मिळायला हवा तरच दलित आणि समाजातल्या अन्य घटकांमध्ये समानता येऊ शकेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)