#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या

  • दिव्या आर्य
  • बीबीसी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

#BBCSheमध्ये सहभागी झालेल्या तरुणी.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांच्याबाबतीत माध्यमांतर्फे करण्यात येणाऱ्या वार्तांकनाविषयी नागपूरच्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थता आहे.

माझ्या डोळ्यांसमोर सैराट या मराठी सिनेमातील तो शेवटची सीन तरळून जातो. जेव्हा एका उच्च जातीतील मुलीचं कुटुंब तिला आणि खालच्या जातीतील तिच्या नवऱ्याला मारून टाकतं.

खून होताना दाखवण्यात आलेलं नसलं तरी जेव्हा त्या दांपत्याचा लहान मुलगा रडत बाहेर येतो तेव्हा त्यातील हिंसेच्या क्रुरतेनं मनात यातना व्हायला लागतात.

जेव्हा नागपूर इथं #BBCSheच्या कार्यक्रमात एक युवती बोलत होती, तेव्हा तिचा इशारा हा यातना आणि भीतीदायक वातावरणाकडेच होता.

ती म्हणाली, "वेगवेगळ्या जातीचे किंवा धर्माचे लोक लग्न करतात तेव्हा माध्यमं त्यांच्याविरोधात निर्माण झालेला आवाज आणि हिंसेच्याच बातम्या दाखवतं. यामुळे आमच्यावर याचा दबाव तयार होतो आणि त्यातून अशा विवाहांबाबतीत एक तर विचार करूच नये असं वाटायला लागतं. न जाणो काय होईल."

फोटो कॅप्शन,

#BBCSheमध्ये सहभागी झालेल्या तरुणी.

"असं का बरं नाही होतं. माध्यमं अशा नात्यांविषयी का नाही सांगत जे यशस्वी ठरलेत. जिथं कुटुंबांनी साथ दिली किंवा जिथं मुलीमुलींनी त्यांच म्हणणं कुटुंबाला पटवून दिलं."

उदाहरण म्हणून या तरुणीनं तिच्या शिक्षिकेची भेट घालून दिली. त्या दक्षिण भारतातल्या आहेत. त्यांचे पती महाराष्ट्रातले आहेत. दोघांच्या जाती भिन्न आहेत. शिक्षिकेचं कुटुंब या विवावाहाच्या विरोधात होतं. पण त्यांच्या पतीच्या कुटुंबाला या विवाहाबद्दल काहीच आक्षेप नव्हते.

या मागचं कारण सांगताना त्या म्हणाल्या, त्यांच्या पतीच्या एका भावानं काही वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. कुटुंबानं त्या विवाहास परवानगी दिली नव्हती. त्यांच्या भावाला आणि वहिणीला कोर्टमॅरेज करावं लागलं. त्यांना शहर सोडून दूसरीकडे पळून जावं लागलं.

नंतर कुटुंबानं त्यांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यांच्यावर एक दुसऱ्याला घटस्फोट देण्यासाठी सतत दबाव आणला.

पण ते दांपत्य अडूनच बसलं. शेवटी एक महिने लपून राहिल्यानंतर ते परतले आणि कुटुंबान त्यांचा स्वीकार केला.

हेच कारण होतं, जेव्हा त्यांच्या पतीनं दूसऱ्या जातीतल्या मुलीशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा कुटुंबानं त्याला लगेचच मान्यता दिली.

शिक्षिका सांगतात की, त्यांचं कुटुंब फार रुढीवादी आहे. पतीच्या कुटुंबाची सकारात्मक वागणूक असतानाही त्यांचे आई-वडील एक वर्षापर्यंत त्यांच्यासाठी दूसरा मुलगा शोधत होते.

"शेवटी त्यांनी हे स्वीकारलं. कारण त्यांनाही सकारात्मक अनुभव आला. भाऊ आणि वहिणीच्या संघर्षानं आमच्यासाठी मार्ग मोकळा केला. माध्यमांनी असे अनुभव समोर आणले तर न जाणो कितीतरी मुलामुलींचा संघर्ष सोपा होईल."

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसारखंच महाराष्ट्रातही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यावर मुलगा किंवा मुलीचा खून करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सैराट सिनेमा अशाच एका नात्याविषयी आणि कुटुंबाच्या हिंसेविषयीची भाष्य करतो.

विदर्भातलं नागपूर हे तसं एक शांत शहर भासतं. इथून अशा हिंसेच्या घटनांची माहिती मिळत नाही. उलट अशा घटना पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाल्याचं समोर येतं.

पण ऐतिहासिक नजरेतून पाहिलं तर जातीसंदर्भातला लढा नागपूरसाठी फार महत्त्वाचा ठरतो.

फोटो कॅप्शन,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

इथंच 1956मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय भेदभावाचा विरोध करत हिंदू धर्माचा त्याग केला होता आणि बौद्ध धर्म स्वीकारला होता.

त्यांच्या नेतृत्वाखाली दलित जातीतील तब्बल पाच लाख लोकांनी धर्मांतरण केलं होतं आणि आता ही जागा दीक्षाभूमी या नावानं ओळखली जाते.

त्या ऐतिहासिक घटनेचे पडसाद आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतात बौद्ध धर्म मानणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.

रुपा कुलकर्णी बोधी यांचा जन्म 1945मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. 1956मध्ये नाही पण त्यांनी 1992मध्ये जेव्हा त्या 47 वर्षांच्या होत्या, तेव्हा हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्विकारला.

असं का केलं असेल? त्या तर उच्च जातीत जन्मल्या होत्या. तत्कालीन नागपूर विद्यापीठात त्या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या आणि त्यांना कुठल्याही पद्धतीच्या भेदभावाला सामोरं जावं लागलं नसणार.

त्यांनी मला सांगितलं, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं."

रुपा कुलकर्णी बोधी यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळं राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिलं जातं.

फोटो कॅप्शन,

रुपा कुलकर्णी बोधी

बहुतांश मराठी सिरीअल्समध्ये उच्च जातीतली समृद्ध कुटुंब दाखवली जातात. जिथं खालच्या जातीतल्या लोकांची भूमिका ही घरगूती काम करणाऱ्या महिलेची किंवा मजुराची असते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.

नागपूरच्या कॉलेजात भेटलेली ती तरुणी याच प्रकारच्या मिलाप आणि खुल्या चर्चेची अपेक्षा ठेवते.

ती मला म्हणते, तिच्यासाठी तिची शिक्षिका एक सकारात्मक उदाहरण आहे, ज्यातून तीला प्रेरणा मिळते. पण आई-वडिलांच काय? कारण माध्यमं त्यांना अशा पद्धतीच्याच बातम्या देत असतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)