भारतात 'घासफुस' खाणारे जास्त की 'लेगपीस' खाणारे?

  • सौतिक बिश्वास
  • बीबीसी प्रतिनिधी
लाइफस्टाइल, भारत, व्हेज. नॉनव्हेज

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

बहुतांशी भारतीय मांसाहार करतात

भारतीयांच्या खाण्यापिण्याबाबत अनेक साचेबद्ध आणि ऐकीव गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्यापैकीच एक मोठा गैरसमज म्हणजे, भारत हा बहुतांशी शाकाहारी लोकांचा देश आहे.

पण तसं अजिबात नाही. काही अनौपचारिक अंदाजांनुसार एकूण लोकसंख्येच्या केवळ एक तृतीयांश लोक शाकाहारी आहेत. आणि तीन मोठ्या सरकारी सर्वेक्षणांनुसार 23 ते 37 टक्के भारतीय शाकाहारी असल्याचा अंदाज आहे. पण हा आकडा काही ऐतिहासिक सत्य वगैरे नाही.

अमेरिकेतले मानववंशशास्त्रज्ञ बालमुरली नटराजन आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ सूरज जेकब यांनी केलेल्या संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार सांस्कृतिक आणि राजकीय दबावामुळे ही आकडेवारीही फुगवून सांगितली जाते. त्यामुळे मांसाहारी व्यक्तींचा विशेषत: बीफ खाणाऱ्यांचा आकडा शाकाहारी मंडळींच्या तुलनेत जाणीवपूर्वक कमीच सांगितला जातो.

हे सगळं लक्षात घेता जेमतेम 20 टक्के भारतीय पूर्ण शाकाहारी आहेत, असं स्पष्ट होतं. फुगवून सांगितल्या जाणाऱ्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.

एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के नागरिक हिंदूधर्मीय आहेत आणि हीच मंडळी प्रामुख्याने मांसाहारी आहे. उच्चशिक्षित, उच्चवर्णीय भारतीयांपैकी केवळ एक तृतीयांश लोक शाकाहारी आहेत.

शाकाहारी घरांमध्ये उत्पन्न जास्त असतं आणि त्यामुळे साहजिकच खर्च करण्याची क्षमताही जास्त असते. मांसाहार करणाऱ्या घरांपेक्षा शाकाहार करणाऱ्या घरांमध्ये सुबत्ता असते. दलित तसंच आदिवासी मंडळी प्रामुख्याने मांसाहारी आहेत.

शाकाहाराचं सरासरी प्रमाण जास्त असणारी भारतीय शहरं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बहुसंख्य लोक चिकन आणि मटण खातात, काही नियमितपणे तर काही प्रसंगानुरूप.

  • इंदौर: 49%
  • मेरठ: 36%
  • दिल्ली: 30%
  • नागपूर: 22%
  • मुंबई: 18%
  • हैदराबाद: 11%
  • चेन्नई: 6%
  • कोलकाता: 4%

(स्रोत: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे)

मात्र डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांच्या यांच्यानुसार बीफ खाणाऱ्यांची संख्या काही दावे आणि साचेबद्ध आकडेवारीपेक्षा बरीच जास्त आहे. सरकारी सर्वेक्षणानुसार 7% भारतीय बीफ खातात. मात्र हे प्रमाणही कमीच आहे कारण बीफ खाणाऱ्यांना राजकीय आणि सामाजिक दबावाला सामोरं जावं लागतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी भाजप सरकार शाकाहाराला प्रोत्साहन देत आहे. हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींच्या रक्षणावर भर दिला जात आहे.

डझनवारी राज्यांनी गाईंच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. आणि मोदींच्या कार्यकाळात "गाईंच्या रक्षणा"ची स्वयंघोषित गौरक्षकांनी गाईंची ने-आण करणाऱ्या लोकांना ठार केलं आहे.

दलित, मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मीयांच्या भारतात लाखों देशवासी बीफ खातात. केरळमधील 70 विविध जाती मुख्य आहार म्हणून ... तुलनेत बीफला प्राधान्य देतात.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

20 टक्के भारतीय शाकाहारी आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार जवळपास 15% भारतीय म्हणजे 18 कोटी नागरिक बीफ खातात. हा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा तब्बल 96% जास्त आहे.

भारतीय काय खातात याविषयी अनेक समज आहेत. देशाची राजधानी दिल्लीच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश नागरिक शाकाहारी आहेत. मात्र हेच शहर 'बटर चिकन'साठी प्रसिद्ध आहे. बटर चिकनची राजधानी म्हणून दिल्लीचा नावलौकिक देशभर आहे.

शाकाहाऱ्यांचं शहर म्हणून चेन्नईचं नाव घेतलं जातं, परंतु हाही एक गैरसमजच आहे. कारण चेन्नई शहरात केवळ 6% लोक शाकाहारी आहेत, असं एक सर्वेक्षणानुसार स्पष्ट झालं आहे.

चिकनप्रेमी प्रांत म्हणून पंजाबची ख्याती आहे. परंतु या राज्यातले 75% लोक शाकाहारी आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत भारताला एक शाकाहारी देश कसं म्हणता येईल?

मग भारताची ही शाकाहारी देशाची प्रतिमा कशी काय रंगवण्यात आली?

डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब यांनी मला सांगितलं, "इतक्या विविधतेने नटललेल्या समाजात काही किलोमीटरवर खानपानाच्या सवयी सामाजिक घटकांनुसार बदलत असतात. मग इतक्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण समूहाच्या लोकसंख्येबद्दल काही सरसकट मत समोर आलं तर ते मत कोण व्यक्त करतंय, याला जास्त महत्त्व आहे."

"जो आहार शक्तिशाली लोकांचा असतो, तोच मग जो सामान्य लोकांचा आहार समजला जातो. एखाद्या गटाचं, प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्याची हीच शक्ती मग साजेबद्धपणाला निमंत्रण देते," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

बहुतांशी भारतीय बीफ खातात असं स्पष्ट झालं आहे.

"मांसाहार ही त्या मानाने एक वेगळी संकल्पना आहे. त्यातून शाकाहारी लोकांचं सामाजिक श्रेष्ठत्व दिसतं आणि त्यातूनच एक सामाजिक संरचना उदयाला येते. त्यात शाकाहारी लोक हे मांसाहारी लोकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत, असं दाखवण्यात येतं. हे म्हणजे गौरवर्णीय लोकांनी बिगर-गौरवर्णीय ही संकल्पना तयार केल्यासारखं आहे. अशाच सामाजिक संरचनेचा आधार घेत गौरवर्णीय लोकांनी त्यांच्यावर राज्य केलं."

स्थलांतर

दुसरी गोष्ट अशी आहे की काही साचेबद्ध गोष्टी या स्थलांतरणामुळे तयार होतात. त्यामुळे जेव्हा दक्षिण भारतातले लोक उत्तर भारतात येतात तेव्हा त्यांचे पदार्थ तिकडे उपलब्ध व्हायला सुरुवात होते. उत्तर भारतीयांच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे.

शेवटी काही स्थलांतरित लोकांमुळे एक साचेबद्धपणा येतो.

उत्तर भारतीय काही दक्षिण भारतीयांना भेटून मनात काही समज तयार करून घेतात. त्यावेळी ते प्रादेशिक वैविध्य विचार करत नाही. दक्षिण भारतीयही उत्तरेकडे आल्यावर तसाच विचार करतात.

व्हीडिओ कॅप्शन,

तुमच्या आहारामुळे हवामानात होतोय बदल? - पाहा व्हीडिओ

अभ्यासकांच्या मते प्रसार माध्यमंही अशा स्टिरिओटाइपिंगला तितकेच कारणीभूत आहेत कारण ते काही विशिष्ट गोष्टींनीच एखाद्या समाजाची ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात.

या अभ्यासात पुरुष आणि स्त्रियांच्या अन्नांच्या सवयींवर प्रकाश टाकला आहे. उदाहरणादाखल, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रमाणात शाकाहारी असतात कारण पुरुष बाहेरचं जास्त खातात आणि त्यातसुद्धा एक प्रकारचा बेफिकीरपणा असतो. पण बाहेर खाणं म्हणजे मांसाहार करणं, असा होत नाही.

याला पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आणि राजकरणसुद्धा तितकंच जबाबदार आहे.

"शाकाहाराची परंपरा जतन करण्याची जबाबदारी, कुणास ठाऊक का, स्त्रियांवर जास्त आहे," असं डॉ. नटराजन आणि डॉ. जेकब सांगतात.

ज्या घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यापैकी 65 टक्के घरांमधली दांपत्य मांस खातात. त्यात शाकाहार करणाऱ्यांचं प्रमाण 20 टक्के होतं. तर 12 टक्के घरांमध्ये पती मांसाहारी होता आणि पत्नी शाकाहारी होती. फक्त तीन टक्के केसेसमध्ये हे उलट होतं."

व्हीडिओ कॅप्शन,

व्हीडिओ पाहा : किडे-मुंग्या जगाचं खाद्य होणार?

याचाच अर्थ बहुसंख्य लोक चिकन आणि मटण खातात, काही नियमितपणे तर काही प्रसंगानुरूप. पण बहुतांश लोक शाकाहार करत नाहीत.

मग भारत शाकाहारी देश आहे असं चित्र जगभरात का रंगवलं जातं? आणि शाकाहारी लोकांचा का भारताच्या समाजव्यवस्थेवर इतका प्रभाव आहे? यामागचं नेमकं कारण काय - हे आहार निवडीवरच्या दबावाशी निगडीत आहे, की बहुसांस्कृतिक समाजात साचेबद्धपणा रुजवण्याशी?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)