कचरा वेचणारे हात जेव्हा कॅमेरा उचलतात...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : लिहिता वाचता येत नव्हतं, मग कॅमेरा उचलला...

"माझ्या हातात कॅमेरा दिसला आणि त्या पोलिसानं मागचा पुढचा विचार न करता सरळ माझ्या कानाखाली मारली."

माया खोडवे या कचरावेचक महिलेच्या कॅमेरा शिकण्याची सुरूवात अशी झाली.

"नाशिकच्या एका संस्थेनं आम्हा कचरावेचक महिलांना कॅमेरा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. उद्देश हा होता की आमच्या समस्या मांडणाऱ्या छोट्या छोट्या फिल्म आम्ही स्वतः तयार कराव्यात.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही डंपिंग ग्राऊंडवर शूट करण्यासाठी गेलो. माझ्यासोबत इतरही कचरावेचक महिला आणि आमचे प्रशिक्षक होते. आमचं काम झालं तेव्हा सगळे चहा प्यायला निघाले. मी म्हटलं मी नंतर येते मला अजून काही शॉटस घ्यायचे आहे. कळत काही विशेष नव्हतं, पण म्हटलं करून पाहू.

मी थोडं पुढे जाऊन इतर कचरा वेचणाऱ्या बायकांचं शूटिंग करत होते. तेवढ्यात दोन पोलीस आले. माझ्या हातात त्यांनी महागडा कॅमेरा पाहिला आणि काहीही न विचारता सरळ मला मारलं. त्यांना मी चोर वाटले. नाहीतर माझ्यासारख्या बाईकडे अशी वस्तू कशी असणार?

माझ्यासारखी साधी कचरावेचक बाई! तेव्हा माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून पोलिसांनी मारलं. आज तोच कॅमेरा हाती आहे म्हणून लोकांचे प्रश्न काही अंशी का होईना सुटत आहेत."

Image copyright Maya Khodve/Facebook

माया खोडवेंच्या नव्या घरात गेलं की आजकाल झोपटपट्टीतल्या घरातही दिसणाऱ्या टीव्हीची उणीव प्रकर्षानं जाणवते. पण दर्शनी भागातच दिसतो तो नवा कॉम्प्युटर. तोसुद्धा एडिटिंगच्या सॉफ्टवेअर्सनी सुसज्ज असलेला.

शेजारच्या टेबलवर लॅपटॉप. डिजिटल कॅमेरा, टॅब्लेट, एक मोठा व्यावसायिक कॅमेरा आणि सगळ्या चार्जरच्या वायरींचं जंजाळ. यातल्या बऱ्याच वस्तू त्यांनी कर्ज काढून घेतल्या आहेत, तर काही त्या ज्या संस्थेत काम करतात त्यांनी दिल्या आहेत.

आम्रपली नगर या नाशिकच्या उपनगर भागातल्या झोपडपट्टीतलं घर सोडून त्या नुकत्याच या नव्या घरात राहायला आल्या आहेत.

बाबासाहेबांच्या संविधानानं दाखवला रस्ता

फक्त टेक्नालॉजीच नाही तर पुस्तकांचीसुद्धा त्यांच्या घरात कमतरता नाही. त्यांच्या घरातल्या पुस्तकांच्या ढिगात आंबेडकर, संपत्ती वितरण कायदा, संविधान आणि डेव्हिड जोसेफ श्वार्झचं 'The Power of Thinking Big' अशी वेगवेगळ्या विषयांची आणि लेखकांची पुस्तकं दिसतात.

"पुस्तकांनी मला प्रेरणा दिली. बाबासाहेबांच्या संविधानानं रस्ता दाखवला. दलितांचे, वंचितांचे हक्क काय असतात, ते हक्क मिळवण्यासाठी कसा लढा द्यायला हवा हे मला राज्यघटनेनं शिकवलं.

प्रतिमा मथळा माया खोडवेंच्या घरात पुस्तकं आणि कॅमेरा असे सुखनैव नांदतात.

आणि बाबासाहेबांमुळे कळालं की एक महिला म्हणून माझे काय हक्क आहेत. स्त्रियांचा संपत्तीतही वाटा आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. स्त्रियांना समान अधिकार आहेत, त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे."

शालेय शिक्षण न झालेल्या माया बोलत असतात. आम्रपाली नगरच्या लोकांसाठी आणि इतरांसाठीही त्या वचिंतांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मायाताई आहेत.

त्यांच्यांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की कार्यकर्त्यात असावा तसा आक्रमकपणा त्यांच्यात नाही. मृदू बोलणं, सौम्य वावर आणि दिलखुलास हास्य. या लहानशा कार्यकर्तीनं मोठ्यामोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांची दखल कशी घ्यायला लावली असेल?

"हा आहे ना माझा सोबती," हातातल्या कॅमेऱ्याकडे बोट दाखवत त्या म्हणतात. "आपल्या प्रश्नांसाठी आता आरडा-ओरडा नाही करावा लागत. कॅमेऱ्यानं शूट करायचं आणि सत्य अधिकाऱ्यांपुढे मांडायचं. शंभरातल्या नव्वद वेळेस सोल्यूशन निघतंच. तेही आवाज न वाढवता."

ज्या कॅमेऱ्यामुळे मार खावा लागला आज त्याच कॅमेऱ्यामुळे माया खोडवेंना अधिकाऱ्यांकडून मानसन्मान मिळत आहे.

लिहिता-वाचता येतं नव्हतं, मग कॅमेरा उचलला

सुरूवातीच्या काळात माया आपल्या आईबरोबर डंपिग ग्राऊंडला कचरा गोळा करायला जायच्या.

"शिक्षण नसल्यामुळे कचरा वेचायला जावं लागायचं. पण समाज आमच्याकडे वाईट नजरेनं पाहायचा. आम्ही रस्त्यानं जायला लागलो की शेजारून चालणारे लोक अक्षरशः नाक दाबून चालायचे. खूप वाईट वाटायचं तेव्हा.

आपण एवढा परिसर स्वच्छ ठेवतो. लोकांसाठी काम करतो आणि तरीही लोक आपल्याला असं वाईट का वागवतात? हे चित्र बदललं पाहिजे. पण यासाठी काय करता येईल? मी सतत हा विचार करत राहायचे," त्या सांगतात.

या विचारातूनच माया नाशिकच्या अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेशी जोडल्या गेल्या. 2011मध्ये त्यांना कॅमेरा हाताळण्याचं आणि शूटिंग करण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं. कचरावेचकांना आपल्या प्रश्नांवर लहान लहान फिल्म बनवण्याचं ट्रेनिंग देऊन ते प्रश्न सोडवण्यात त्यांना पुढाकार घ्यायला लावायचा असा या संस्थेचा हेतू होता. माया खोडवेंना कॅमेरा साद घालत होता.

Image copyright Maya Khodve/Facebook

मी शाळेत गेले नव्हते. लिहिता येत नव्हतं, वाचता थोडफार यायचं. आणि लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर लिहिण्या-वाचण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हा पर्याय मला कॅमेऱ्यात सापडला. कॅमेऱ्यातून आपले प्रश्न मांडण्यासाठी मला लिहिता-वाचता येण्याची गरज नव्हती.

नुसतं तोंडी सांगितलं तर कोणी लक्ष देत नाही

"सामान्य माणसाचे खूप लहानलहान प्रश्न असतात. आणि त्याची फार साधीसाधी उत्तरं असतात. पण ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांना या प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, किंवा त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही.

आमच्या कचरावेचक समाजाचेही विशेषतः महिलांचे अनेक प्रश्न होते, समस्या होत्या. पण, त्यावर कोणी काही करत नव्हतं. मग मी ठरवलं की आपल्या समस्यांवर फिल्म बनवायच्या. कारण आम्ही तोंडी कितीजरी सांगितलं तरी कोणी ऐकत नाही."

मी शूट करत होते, लोक हसत होते

ज्या संस्थेनं माया यांना कॅमेरा हाताळण्याचं ट्रेनिंग दिलं त्या संस्थेचा प्रकल्प काही काळानंतर थांबला. त्यांच्याकडे स्वतःचा कॅमेरा किंवा इतर उपकरण नसल्यानं कचरावेचकांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्नही थांबला.

"आपण एवढं शिकलो ते वाया जाणार का, अशी मला भीती वाटतं होती. पण 2013 साली मी व्हीडिओ व्हॉलेंटिअर्स या कम्युनिटी रिपोर्टिंग करणाऱ्या संस्थेशी जोडले गेले. व्हीडियोव्दारे वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणं, मग भले ते किती का साधे प्रश्न असोत, आणि त्यांना न्याय मिळवून देणं हा माझ्या कामाचा भाग होतो. याचे मला पैसेही मिळायला लागले."

प्रतिमा मथळा नाशिकच्या आम्रपाली नगरच्या वस्तीत माया खोडवेंनी आपल्या कामाला सुरूवात केली.

"माझा पहिला व्हीडिओ मी माझ्या घराजवळच शूट केला. तिथं ड्रेनेजचा पाईप फुटला होता आणि गटाराचं पाणी आख्या वस्तीत वाहत होतं. मी सकाळी पाणी भरायला उठले तेव्हा अवस्था पाहिली आणि कॅमेऱ्यानं शूट करायला लागले.

आसपासचे सगळे मला हसत होते. म्हणायचे, 'हे काय करायली? येड लागलं का?' पण मी काम सुरूच ठेवलं. जेव्हा व्हीडिओ शूट करून लोकांना दाखवला, तेव्हा वस्तीतल्या सगळ्यांना आवडला. मग आम्ही अधिकाऱ्यांना दाखवायला गेलो.

रविवार होता त्या दिवशी. पण त्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून त्याच दिवशी ड्रेनेजचं काम पूर्ण केलं. तो माझ्या कॅमेऱ्याचा पहिला विजय होता. मला त्या दिवशी खूप छान वाटलं. आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आला."

हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी मायांनी खूप मेहनत घेतली होती. पोलिसांचा मार खाल्ला, अधिकाऱ्यांचं उर्मट वागणं सहन केलं, इतकंच काय, ज्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा वसा हाती घेतला होत त्यांच्याही थट्टेला सामोरं जावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही.

"आज मी कुठेही गेले तरी सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. वस्तीतले लोक पाठीशी उभे राहातात. अधिकाऱ्यांकडे जरी गेले तरी ते उठून उभे राहातात. म्हणतात, या ना मॅडम, बसा!"

टेक्नोलॉजीशी दोस्ती

कॉलेजच्या प्रकल्पासाठी एक शॉर्टफिल्म बनवायची म्हटलं तरी किती वणवण फिरावं लागतं ते कोणत्याही मास मीडियाच्या विद्यार्थ्याला विचारा. आणि इथे तर सगळा 'वन वुमन शो'!

फिल्म मेकिंगसाठी ज्या ज्या तांत्रिक गोष्टी यायला हव्यात त्या सगळ्या माया खोडवे शिकल्या आहेत. बोलता बोलता मोबाईवर आणि कॉम्प्युटरवर एडिट करता येतील अशा पाच-सात सॉफ्टवेअर्सची नावं त्या सांगून टाकतात.

"सुरुवातीला मला यातलं काही यायचं नाही. फक्त शूट करायचं आणि अधिकाऱ्याला दाखवायचं असं होत. पण नंतर मला कळत गेलं की इतर तांत्रिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आपलं म्हणणं कमीत कमी शब्दात पण प्रभावीपणे मांडायचं असेल तर एडिटिंग यायला हवं या विचारानं मी ते शिकायला सुरूवात केली.

पण मला सुरुवातीला सगळं फार अवघड गेलं. कारण सगळं इंग्लिशमध्ये होतं. मला काहीच कळायचं नाही.

मग मी नकाशासारखं पाठ करायला लागले. उजव्याकडे तिसऱ्या नंबरवर क्लिक करायचं, मी तिथून खाली पाचव्या नंबरला असं करत मी शिकले. हळूहळू सगळं जमायला लागलं आणि टेक्नोलॉजिशी दोस्ती झाली."

दुसरी माया तयार करणार

माया डंपिंग ग्राऊंडवर कचरा वेचायला जायच्या त्याला आता जमाना झाला. पण अजूनही कितीतरी माया शिक्षणाअभावी अंधारात चाचपडत आहेत. या महिलांना मार्गदर्शन करून यातूनच कॅमरा कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार करणायासाठी माया प्रयत्नशील आहे.

"आजकाल अधिकाऱ्यांकडे जाताना मी दुसऱ्या महिलेला पुढे करते. हेतू हा की तिला बोलता यायला हवं. आमच्या काही महिला आता कॅमेरा चालवायला शिकल्या आहेत. एक महिला म्हणून आपण नेहमी स्वतःला कमी लेखतो.

मीही असंच करायचे. मला वाटायचं माझ्याकडून काय होणार? ही भावना मनातून काढून टाकायला मला खूप प्रयत्न करावे लागले. तसं माझ्या इतर सहकाऱ्यांच होऊ नये म्हणून मी जेंडर डिस्कशन (त्यांचाच शब्द) वर्ग आयोजित करते.

म्हणजे आम्ही काही बोजड डिस्कशन करतो असं अजिबात नाहीये. घरातल्या लहानसहान प्रश्नांपासून सामाजिक समस्यांपर्यंत कशावरही बोलतो.

महिलांना आत्मविश्वास यावा, आपल्यासोबत इतर महिलाही आहेत, आपण एकटे नाही ही भावन जागृत व्हावी यासाठी हा सगळा प्रपंच. मला खात्री आहे, यातूनच दुसरी माया खोडवे तयार होईल."

पडद्यामागून आता पडद्यावर

त्यांच्या घरात दिसणारा नवा कॉम्प्युटर, कर्ज काढून घेतलेला व्यावसायिक कॅमेरा आणि इतर तांत्रिक गोष्टींचं रहस्य विचारलं तर कळत की माया आता आपली भूमिका बदलत आहेत. पडद्यामागून पडद्यावर!

बापरे, तुम्ही एकदम हिरोईन झालात, लवकरच तुमचा ऑटोग्राफ घ्यायला यावं लागेलं, असं म्हटलं की त्या खळाळून हसतात.

"तसं काही नाही, माझे पती आनंद आणि मी एक डॉक्यूड्रामा (पुन्हा त्यांचाच शब्द) बनवत आहोत. सामाजिक विषयावरची ही फिल्म आहे. त्यात मी मुख्य भूमिका करत आहे. कधी कधी समाजाला नुसतं आदर्शवादी भाषण देऊन चालत नाही. त्यांना आवडेल अशा स्वरूपात आपलं म्हणणं त्यांच्यापुढे मांडावं लागतं. कडू औषध साखरेच्या गोळीत घालून द्यावं लागत, तसंच काहीसं म्हणा ना."

अनेक अर्थांनी माया खोडवे या पहिल्या आहेत. नाशिकच्या पहिल्या कचरावेचक महिला, ज्यांनी कॅमेरा उचलला.

त्यांच्या समुदायातून परदेशी जाणाऱ्याही त्या पहिल्याच. अशा वातावरणातून येऊन कर्ज काढून फिल्म बनवण्याचं धाडस करणाऱ्यासुद्धा त्या कदाचित पहिल्याच आहेत.

पण त्यांना आपल्या 'पहिलं' असण्याचं कौतूक नाही. त्याची धडपड सुरू आहे ती दुसरी 'माया' घडवण्यासाठी. हीच त्यांची सगळ्यांत मोठी अचिव्हमेंट असेल.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)