पंडिता रमाबाई : 'धर्मांतर केल्यामुळेच दुर्लक्षित राहिल्या का?'

  • डॉ. अनुपमा उजगरे
  • लेखिका
पंडिता रमाबाई

फोटो स्रोत, Anupama Uzgare

स्त्रियांच्या सबलीकरणासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या पंडिता रमाबाई यांचा 5 एप्रिल हा स्मृतिदिन. कैसर-ए-हिंद पुरस्कार मिळूनही त्यांचं कार्य दुर्लक्षितच राहिलं आहे, असं त्यांच्याविषयीच्या अभ्यासक आणि चरित्रलेखक डॉ. अनुपमा उजगरे यांचं मत. त्यांनी मांडलेला रमाबाईंच्या कार्याचा आलेख खास त्यानिमित्ताने...

पंडिता रमाबाईंना स्त्रियांची अनेक बाबतीत होणारी कुचंबणा जाणवत होती. त्यांचे प्रश्न समजत होते. स्त्री प्रश्नांविषयी अतिशय कळकळ असणाऱ्या रमाबाईंनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. स्त्रियांची बाजू हिरीरने मांडताना त्यांच्या शब्दाला कधी धार चढायची तर कधी त्या मृदुपणे बोलायच्या.

तो काळा 18व्या शतकातला होता. पुण्या-मंबईत होणाऱ्या आपल्या बिनबोभाटी सभांचे त्यांनी आर्य महिला समाज असं नामकरण केलं. अनाथ, दुर्दैवी, विकलांग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय पं. रमाबाईंनी पुणे, मुंबई आणि अहमदाबादमधल्या पुढाऱ्यांना आणि धनवान लोकांना कळवला, पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का, हा विचारच त्याकाळी काहींना पटला नाही.

त्यांनी विधवागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रमाबाई अमेरिकेत फंड जमा करीत आहेत अशी बातमी 'ज्ञानोदय' (29-09-1887) मध्ये छापून आली. ती वाचून पुणेवैभवकार म्हणतात, "आम्हा लोकांत निराश्रित विधवा आधी सापडायच्या नाहीत आणि सापडल्या तर त्या अशा गृहात यायच्या नाहीत." कारण घरोघरी विधवा म्हणजे फुकटच्या मोलकणी, स्वयंपाकिणी इतपतच त्यांना किंमत होती.

लोकांचा असा प्रतिकूल प्रतिसाद असला तरीही रमाबाई मुळीच मागे हटल्या नाहीत. स्त्री डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या निमित्तानं मधल्या काळात त्यांना परदेशगमनाची संधी मिळाली.

याबाबत, 'नेपोलियननं रशियावर स्वारी करण्यात जेवढं नैतिक धैर्य दाखवलं त्यापेक्षा रमाबाईंना इंग्लंडला जाताना अधिक नैतिक धैर्य दाखवावं लागलं,' असं जर्मन पंडित मॅक्समुलर यांनी म्हटलं आहे.

परदेशप्रवास हा तेव्हाही खर्चिक होताच. पण इच्छा तेथे मार्ग म्हणतात त्याप्रमाणे पुस्तकं लिहून त्याच्या विक्रीतून प्रवासाचा खर्च भागवण्याचा मार्ग त्यांना ट्रान्सलेटरच्या हुद्द्यावर असलेल्या दादोबा पांडुरंगांमुळे सापडला.

तिथं गेल्यावर तिथल्या स्त्रियांना मराठी-संस्कृतच्या शिकवणीतून त्यांचा अर्थार्जनाचा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र झेलमकाठच्या थंडीत एका कानाला बहिरेपण आल्यामुळे दुर्दैवानं रमाबाईंना वैद्यकीय शिक्षण घेता आलं नाही.

शारदा सदनाची स्थापना

रमाबाईंनी शारदासदन या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889रोजी मुंबईत विल्सन कॉलेजजवळ 169, गिरगाव चौपाटी जवळच्या एका भाड्याच्या घरात केली. त्यासाठी त्यांना अमेरिकेतून रमाबाई असोसिएशननं दहा वर्षं आर्थिक मदत पुरवली.

सुरुवातीला शारदा सदनात 18 विधवा होत्या. मुंबईपेक्षा पुण्याची हवा चांगली, शिवाय तिथं स्वस्ताई आहे, असा विचार करून रमाबाईंनी शारदासदन 1890च्या नोव्हेंबरात पुण्यात आगाखानांच्या बंगल्यात हलवलं.

नंतर 42 हजार रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचं 26 जुलै 1892 रोजी डॉ. आत्माराम पाडुरंग यांच्या हस्ते उद्धाटन होऊन शारदा सदन आपल्या मालकीच्या इमारतीत स्थिरावलं.

फोटो स्रोत, Anupama Uzgare

शारदा सदन या संस्थेची स्थापना रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर साडेपाच वर्षांनी केली. ख्रिस्ती संस्थेला हिंदू देवतेचं नाव दिल्यावरून ख्रिस्ती लोकांची नाराजी बाईंनी ओढवून घेतली.

खरं तर, संस्थेत पहिली जी मुलगी दाखल झाली होती तिचं नाव होते शारदा गद्रे. तिचंच नाव रमाबाईंनी संस्थेला दिलं होतं. ही शारदा गद्रे बालविधवा नव्हती तर पुनर्विवाहित आईची मुलगी होती.

पुण्यात एका तरुण विधवा स्त्रीनं अनेक विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांसाठी आश्रम काढावा, त्यांना सुखात ठेवावं, फुले माळू द्यावीत, हसूखेळू द्यावं, हे स्थानिकांच्या पचनी पडणारं नव्हतं.

त्यामुळे त्यांनी रमाबाईंवर रमाबाई नावाची राक्षसीण, मुलींचा छळ करते, बाटवते, असे बिनबुडाचे आणि अत्यंत गलिच्छ आरोप केले. रमाबाईंनी रमाबाई असोसिएशच्या अनुमतीनं जे सल्लागार मंडळ बनवलं होतं, त्यात रा. ब. कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, न्या. महादेव गोविंद रानडे, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्या. काशीनाथ त्र्यंबक तेलंग अशी बडी मंडळी होती. या सल्लागार मंडळीशी रमाबाईंचे मतभेद होण्याचं एक कारण असं की, रमाबाई बालविधवांना सुखात ठेवण्याची खटपट करीत, पण सल्लागार मंडळाला ते आवडत नसे.

शारदा सदन धर्मातीत ठेवण्याचं जाहीर वचन दिल्यामुळे पंडिताबाई सर्व प्रकारची काळजी घेत होत्या. पण एकीकडे विघ्नसंतोषी माणसं त्यांना सुखासुखी काम करू देत नव्हती. अडथळ्यांवर अडथळे आणत होती. त्याचवेळी आपल्या दुर्दैवी कथा सांगत मुली सदनात मोठ्या संख्येनं दाखल होत होत्या.

फोटो स्रोत, Anupama Uzgare

अनेक दुर्दैवी मुली रमाबाईंकडे येत होत्या. कुणी नातेवाईक त्यांना गुपचूप आणून सोडत होते. एकदा तर एक ब्राह्मण गृहस्थ आपल्या मुलीचं केशवपन होऊ नये म्हणून रमाबाईंच्या संमतीची वाटही न पाहताच तिला रात्रीच्या काळोखात सदनात विश्वासानं सोडून गेले. पुढे रमाबाईंनी तिला शिकवलं. तिचा विवाह करून दिला. पुढे तिचा मुलगा मुंबईच्या विल्सन कॉलेजचा प्राचार्य झाला.

अशा अनेक मुली तिथं सुखानं नांदत होत्या. त्यांची काहीच तक्रार नव्हती. सदनात प्रवेश करताना त्या कशा हडकुळ्या होत्या आणि नंतर त्यांनी कसं बाळसे धरले याची साक्ष त्यावेळचे त्यांचे फोटो देतात.

महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे रमाबाईंविषयी लिहितात, "सल्लागार मंडळी म्हणे, आपल्या जातीतील विधवांना चैनीनं राहणे बरं नव्हे...,रमाबाई म्हणत, मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी, त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचं ठरवलं आहे. ते कमी होणे नाही. मला सर्व भारतातील स्त्रिया एकसारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदूमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्रीजातीचे कल्याण आणि सुधारणा करण्याच्या कामात मी परामुख होणार नाही. स्त्रीजातीची सुधारणा करायची हे व्रत मी धारण केलं आहे."

कर्वे आपल्या मानसकन्येला सुखी ठेवतील का याची रमाबाईंनी आधी खात्री करून घेतली. नंतर हिंदू रीतिनुसार जावयाचा योग्य मानपान करत रमाबाईंनी त्यांचं लग्न थाटात लावून दिलं होत.

याबाबत आनंदीबाई कर्वे यांनी लिहिलं आहे."दोनतीन वेळा माघारपणासाठी शारदासदनात गेले... लोकांनी दिलेला त्रास कठीण वाटला नाही, कारण पंडिता रमाबाई होत...त्यांनी केलेला उपदेश मी टिकलीप्रमाणे गोंदून ठेवला आहे. त्या म्हणत ईश्वरावर श्रद्धा ठेवतात तशी कामावर ठेव न नेट दाखव म्हणजे देव ते पार पाडायला बळ देतो. हिंगण्याचा आश्रय आणि इतर संस्थासाठी मी जी सेवा केली ती त्यांच्याच उपदेशाचे फळ. माझा धर्म : पं. रमाबाईंनी शिकवलेला अनाथ-अपंगांना वाट दाखवण्याचा अडल्यापडल्याला मदत करण्याचा."

कर्वे दाम्पत्य ख्रिस्ती न होताही कायम पं. रमाबाईप्रत कृतज्ञ राहिले यातच सगळं आलं.

मुक्तिमिशन

रमाबाई असोसिएशनची दहा वर्षांची मुदत संपत आल्यावर पुण्याजवळ 34 मैलांवर असलेल्या केडगाव इथली खडकाळ जमीन स्वस्तात विक्रीला होती. दूरदृष्टीच्या रमाबाईंनी ती विकत घेतली.

त्याच सुमारास पुण्यात प्लेग फोफावला आणि पुणे म्युनिसिपालिटीनं त्यांना आणि मुलींना 48 तासांच्या आत पुण्याबाहेर जाण्याचा आदेश दिला. रमाबाई आपलं शारदासदन केडगावला घेऊन गेल्या आणि तिथं झोपड्या उभारून राहिल्या. काही दिवसांतच तिथं पक्क्या इमारतींचं मुक्तिमिशन उभे राहिलं. ती तारीख होती 24 सप्टेंबर 1898.

फोटो स्रोत, anupama.uzgare

फोटो कॅप्शन,

पं.रमाबाईंचे दाट झाडीत लुप्त झालेले जन्मस्थान : गंगामूळ (कर्नाटक)

मुक्तिमिशनमध्ये पं. रमाबाईंनी जी कामे केली, त्याला इतिहासात तोड नाही. अंध स्त्रियांसाठी ब्रेल शिक्षणाची सोय करणं, चाळीस एकर रुक्ष जमिनीतील काही जमीन शेतीसाठी तयार करून तिच्यातून वेगवेगळी पिके काढणे, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणं, वाकाच्या दोऱ्या वळणं, वेताच्या खुर्च्या विणणे (ही कामं अंध स्त्रियादेखील करत असत), लेस, स्वेटर आणि मोजे विणणे.

या शिवाय गायी बैलांचे खिलार, शेळ्या-मेंढरांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध-दुभतं, कोबड्यांची पोल्ट्री, सांडपाणी मैल्यापासून शेतीसाठी खत, भांड्यावर नावं घालणं, भांड्यांना कल्हई करणं, हातमागावर कापड-सतरंज्या विणणं, घाण्यावर तेल काढणं, छापखाना - त्यात टाईप जुळवणे सोडणं, चित्र छापणे, कागद मोडणे - पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम करणे, शेतात पिकलेले धान्य, भाजीपाला, दूधदुभते यांचा पुरवठा सरकारी ऑर्डर्स घेऊन करणे, या सर्व उद्योगांसाठी प्रशिक्षित पुरुषमाणसांकरवी त्यांनी मुलींना तयार केलं.

हिशेब त्या स्वतः रोज बघत. आपल्या देखत त्यांनी या सगळ्या कामांत स्त्रियांना तरबेज केलं. अनेक प्रकारचे कुटीरउद्योग सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

इतिहासानं अन्याय केला का?

एकटी बाई, विधवा बाई, अबला असली विशेषणे त्यांनी कधी लावून घेतली नाहीत. त्यांच्या बाणेदार आणि फटकळ स्वभावामुळे लोक त्यांना वचकून असत. त्यांचा स्वभाव बराचसा हेकेखोर असल्यामुळे सामंजस्याची भूमिका घेण्यापेक्षा एकला चलो रे या पद्धतीनं त्यांनी आपली कामं चालू ठेवली. आणि पूर्णत्वालादेखील नेली.

माणसांपेक्षा देवावर त्यांनी अधिक भिस्त ठेवली. 'परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, मनुष्य माझे काय करणार?' हे बायबलमधील वाक्य त्यांच्या मनावर अनुभवानं बिंबलं होतं. त्यामुळेच एकुलत्या एका कन्येचा ऐन तारुण्यात झालेला मृत्यूही त्यांनी शांतपणे स्वीकारला.

स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, स्वालंबन या त्रिसूत्रीवर भर देणारी समाजसुधारक म्हणून पंडिताबाईंना कैसर-ए-हिंदचं 45 ग्रॅम वजनाचं सोन्याचं पदक बहाल करण्यात आलं. टाइम्स ऑफ इंडियानं त्यांची गणना भारतीय शिल्पकारांत केली आहे. जावाचा राजा आदिपती सास रोनिंग्रथ यांची दुसरी कन्या कार्टिनी हिनं फ्रेंच वृत्तपत्रात पं. रमाबाई यांच्या कार्याविषयी वाचलं आणि त्यामुळे प्रेरित होऊन तिनं युरोपमध्ये पुष्कळ पत्रमैत्रिणी मिळवल्या. त्यांच्या मदतीनं तिनं तिकडे स्त्रीशिक्षणाची चळवळ उभी केली.

पं. रमाबाईंनी भारतीय जनतेचा प्रवास आणि देशाचे दळणवळण या सोयींसाठी आपल्या मुक्तिमिशनच्या मालकीच्या जमिनीतला भाग रेल्वेमार्गासाठी देऊन मोकळा करून दिला. त्यांचं ऋण लक्षात ठवून केडगाव स्टेशनला खरं तर पं. रमाबाई यांचे नाव देणं सयुक्तिक ठरेल.

रमाबाईंनी विविध विषयांवर ग्रंथरचना केली. पं. रमाबाई हा अनेकांच्या साहित्याचा विषय झाल्या. मूळ भाषांमधून त्यांनी एकटीनं सातत्याने 18 वर्षे बायबलच्या भाषांतराचे काम पूर्ण केले आणि शेवटीची प्रुफे तपासली, त्याच रात्री त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. (5 एप्रिल 1922)

पं. रमाबाई यांना परदेशात स्थिरस्थावर होऊन पुन्हा विवाह करून आनंदात आणि समृद्धीत आयुष्य व्यतीत करता येणं सहजशक्य होतं. परंतु आपले भारतीयत्व त्यांनी जपलं. भारतातील सर्व प्रकारच्या गांजलेल्या स्त्रियांना उर्जितावस्थेत आणण्याचं कार्य करण्याचा वसा त्यांनी घेतला होता.

एवढे महान कार्य एकहाती - एकमती करूनही आज पं. रमाबाईंचे नाव फारसं कोणाला माहीत नाही. ह्याचे कारण एकच - पं. रमबाईंनी धर्मांतर करून वेगळी वाट चोखाळली होती!

यासंदर्भात वि. द. घाटे 'विचार विलसिते'मध्ये लिहितात - 'रमाबाईंनी अंतरीची हाक ऐकू आली होती, ती सर्वसामान्यांना कळणे कठीण आहे.'

'हिंदू संतमालिकेत जिचं नाव समाविष्ट करण्यात येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पं. रमाबाई!' सरोजनी नायडू यांनी शोकसभेत काढलेले उद्गार आणि 'पं. रमाबाई यांचं जीवन म्हणजे साक्षात परमेश्वरानं लिहिलेली एक अमर आणि अविस्मरणीय कादंबरी!' हे आचार्य अत्रे यांच उद्गार पं. रमाबाई यांच्याविषयी निर्लेप मनानं नव्यानं विचार करायला जुन्या पिढीला भाग पाडतील, अशी आशा बाळगू या.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)