#5मोठ्याबातम्या : यंदा दुष्काळाची शून्य टक्के शक्यता, देशभरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

यंदा सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. या दिलासादायक बातमीसह वेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर असलेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या.

1. यंदा पाऊस सरासरी गाठणार

'स्कायमेट'च्या अंदाजानुसार देशभरात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे 55 टक्के आहे.

महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, अतिपावसाची शक्यता 5 टक्के आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे.

सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 20 टक्के आहे. तर यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के आहे.

केरळात 1 जूनला मॉन्सून दाखल होतो. 2 आठवड्यात त्याची निश्चित तारीख जाहीर केली जाईल असं सुद्धा स्कायमेटनं म्हटलं आहे.

2. चित्रपटगृहांत जंकफूडची दुकानं कशासाठी?

चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीवर पूर्णपणे बंदी असायला हवी. तसंच चित्रपटगृहांत घरचे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली जात असेल तर जंकफूडची दुकानं कशासाठी, असा सवाल उच्च न्यायालयानं चित्रपटगृह मालकांना विचारला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या अवाजवी किमतीचा मुद्दाही उपस्थित करत हे दर नियमित असले पाहिजेत, असंही न्यायालयानं सरकारला सुनावलं आहे.

यावर पुढील 6 आठवड्यांत धोरण आखणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून न्यायालयाला देण्यात आली आहे.

3. काळवीट शिकारप्रकरणी आज निकाल

20 वर्षांपूर्वी सलमान खाननं जोधपूरजवळच्या कांकाणी गावात 2 काळविटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालय आज निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP

न्यायालयाच्या निकालच्या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानसह सहआरोपी सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बुधवारी जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.

याप्रकरणी सलमान खान दोषी ठरल्यास त्याला कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्षं शिक्षा होऊ शकते.

4. आफ्रिदीच्या ट्वीटला सचिनचं उत्तर

"देश चालवण्यासाठी आमच्याकडे योग्य लोक आहेत. आम्ही काय करायला हवं हे आम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगायची गरज नाही," असं उत्तर सचिन तेंडुलकरनं शाहिद आफ्रिदीला दिलं आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं ट्वीट केलं होतं की, "भारत प्रशासित काश्मीरमध्ये भीती निर्माण करणारी परिस्थिती आहे. तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. निर्दोष लोकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत जेणेकरून एका स्वतंत्र आवाजाला दाबता येईल. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था कुठे आहेत? यावर ते का काही करत नाहीत?"

आफ्रिदीच्या या ट्वीटनंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, सुरेश रैना आणि कपिल देव यांनी यापूर्वीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

5. एकाच वेळी दोन जागांवर निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाचा विरोध

एकाच उमेदवारानं एकाच वेळा 2 मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगानं विरोध दर्शवला आहे. दिव्य मराठीनं दिलेल्या बातमीनुसार,

या प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च वाढतो. दोन मतदारसंघांतून विजयी होणारा उमेदवार नंतर एका जागेवर राजीनामा देतो. तिथे होणाऱ्या पोटनिवडणुकीचा खर्च संबंधित उमेदवाराकडूनच वसूल करायला हवा, असं मतही आयोगानं यानिमित्तानं मांडलं आहे.

भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी 2 मतदारसंघांतून एकाच उमेदवारास निवडणूक लढवण्याची मुभा रद्द करावी, या मागणीची याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)