सलमान खान : काळवीट शिकार प्रकरणाच्या या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
सलमान खान
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलायने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टानं अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची मात्र निर्दोष सुटका केली आहे.
नेमकं काय आहे काळवीट शिकार प्रकरण?
1) चित्रपट 'हम साथ साथ है'च्या चित्रिकरणादरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर 1998 कालावधीत सलमानसह इतर कलाकारांवरही आरोप होते. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर काळवीटच्या शिकारीसाठी सलमानला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
2) काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. मथानिया आणि भवाद या ठिकाणी काळविटांच्या शिकाराची दोन स्वतंत्र प्रकरणं, कांकाणीमध्ये हरणांची शिकार प्रकरण आणि लायसन्स संपल्यानंतरही रायफल बाळगल्याचा (आर्म्स अॅक्ट) आरोप सलमानवर आहे.
3) जोधपूरजवळच्या भवाद गावामध्ये 26 आणि 27 सप्टेंबर रोजी 1998मध्ये काळविटांची शिकार करण्यात आली होती. तीन काळविटांच्या शिकारीप्रकरणी सलमानला पहिल्यांदा जोधपूरच्या न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावली होती.
फोटो स्रोत, Getty Images
4) हरणाच्या शिकारप्रकरणी सलमानला 10 एप्रिल 2006 मध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली होती. जोधपूरजवळच्या मथानियानजीक घोडा फार्म याठिकाणी 28-29 सप्टेंबर 1998 रोजी शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी जोधपूर हायकोर्टानं सलमानला जामीन दिला होता.
5) घोडाफार्म हाऊस शिकारप्रकरणी सलमानची रवानगी 10 ते 15 एप्रिल 2006 या कालावधीकरता सहा दिवस केंद्रीय कारागृहात झाली होती. सेशन्स कोर्टानं शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर 26 ते 31 ऑगस्ट 2007 या कालावधीत सलमान तुरुंगात होता.
6) या दोन्हीप्रकरणी जोधपूर हायकोर्टात 12 मे रोजी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती.
7) तिसरा खटला कंकाणी गावाशी संबंधित आहे. 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी दोन हरणांची शिकार करण्यात आली होती. आर्म्स अॅक्ट अंतर्गत आणखी आरोप निश्चित करण्यात आल्याने प्रकरण जुलै 2012 पर्यंत प्रलंबित होतं. नंतर हा खटला सेशन्स कोर्टात सुरू झाला.
फोटो स्रोत, Getty Images
सलमान खान
8) या प्रकरणांमध्ये हरीश दुलानी यांची साक्ष महत्त्वाची होती. शिकारीच्या वेळेस सलमान खानची जिप्सी गाडी दुलानी चालवत होते. मात्र आता ते गायब आहेत. दुलानी मुंबईत असल्याची चर्चा आहे तर काहीजण ते विदेशात असल्याचं सांगतात. हरीश यांच्या ठावठिकाण्याबद्दल त्यांच्या घरच्यांनी कोणालाही काहीही माहिती दिलेली नाही. हरीश यांनी सलमानविरोधात साक्ष दिली होती. मात्र त्यानंतर साक्ष बदलली. नंतर त्यांनी सलमानच्या बाजूनं साक्ष दिली. हरीश 17 वर्षांपासून गायब आहेत.
9) काळवीटांची काळजी घेणाऱ्या बिश्नोई समाजानं सलमानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)