कर्नाटक : उडुपीतल्या साधूंनी का उडवली आहे भाजप नेत्यांची झोप?

  • सलमान रावी
  • बीबीसी प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा चुनाव 2018

दक्षिण कर्नाटकाच्या उडुपीमधल्या शिरूर मठाचे प्रमुख आहेत लक्ष्मीवारा तीर्था स्वामी. पण त्यांची ओळख केवळ एक साधू म्हणून मर्यादित नाही.

ते गिटार वाजवतात, कीबोर्डही वाजवतात, तसंच मृदंग, नादेश्वरम आणि ड्रम्ससुद्धा बडवतात. ते पजेरो आणि बुलेटही चालवतात. शास्त्रीय संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्त्य क्लासिकल संगीतातही रुची आहे.

"पूर्व आणि पश्चिमेकडच्या तसंच शास्त्रीय आणि मॉडर्न संगीतात मला रुची आहे. मला पोहायला आवडतं आणि बुलेट चालवायलाही. यामुळेच नेत्यांना मी आवडत नाही," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

हनुमान जयंतीसाठी मठात भक्तांनी गर्दी केली होती. हवन, पूजा-अर्चा करण्यासाठी अनेक भाविक दूरवरून आले होते. या वेळेस स्वामींनी पूजा स्वत: केली.

निवडणूक लढवणार

उडुपीच्या प्राचीन श्रीकृष्ण मठातल्या आठ मठ प्रमुखांपैकी लक्ष्मीवारा तीर्था स्वामी एक आहेत. त्यांनी राजकारण्यांची झोप उडवली आहे. निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) तिकीटही मागितलं आहे.

पण भाजपचे माजी आमदार रघुपती भट आणि इतर नेत्यांनी त्यांना विरोध दर्शवला आहे.

स्वामींच्या या घोषणेनं उडुपीतल्या इतर सात मठ प्रमुखांना अचंबित केलं आहे. लक्ष्मीवारा तीर्था स्वामी हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख आहेत. पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश्वा तीर्था स्वामी हे त्यांचे वरिष्ठ आहेत. शिरूर मठाच्या प्रमुखाचा हा निर्णय वैयक्तिक असून त्यावर मला काही बोलायचं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीत विचारांचं स्वातंत्र्य

यापूर्वी कोणत्याही साधूनं कर्नाटकाच्या राजकारणात उघडपणे सहभाग घेतला नाही. लक्ष्मीवारा तीर्था स्वामी यांचे मोठे भाऊ वादर स्वामी सांगतात की, "लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा आहे."

भारतीय संसदेचं उदाहरण देत ते म्हणतात की, "संसदेत तुम्हाला बरीच माणसं दिसतील जी भगवी वस्त्र परिधान करून लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत. हा स्वामींचा वैयक्तिक निर्णय आहे आणि कुटुंबातले लोक त्यांच्यासोबत आहेत."

लक्ष्मीवारा तीर्था स्वामी यांच्या कुटुंबातले इतर सदस्य संसारी आहेत. स्वामींनी मात्र भोग-विलास सोडून तपस्येचं व्रत स्वीकारलं. त्यांनी लग्न केलं नाही. त्यांच्या भावांची मात्र लग्नं झालेली आहेत.

हिंदुत्वाचे समर्थक

बीबीसीशी बोलताना स्वामी सांगतात की, "मी बऱ्याच वर्षांपासून बघत आलो आहे की, एकदा निवडून आल्यानंतर आमदार आणि खासदार त्या भागात परत कधी जात नाही. फक्त मत मागण्यासाठी तेवढे येतात."

"असं असलं तरी स्वामीजी हिंदुत्वाची बाजू उचलून धरतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची प्रशंसा करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ते मार्गदर्शक मानतात," ते पुढे सांगतात.

"मी हिंदुत्वाचा समर्थक आहे. पण याचा अर्थ असा नाही की उडुपीचे ख्रिश्चन आणि मुस्लीम माझा आदर करत नाहीत. ते सर्व माझा सन्मान करतात. याच कारणामुळे मला लोकांची सेवा करायची आहे. खासकरून ग्रामीण भागातल्या लोकांची जिथं आतापर्यंत विकास पोहोचलेला नाही," असं स्वामी सांगतात.

पूजा करण्याची वेगळीच तऱ्हा

पूजा करण्यासाठी स्वामी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे ते सतत चर्चेत असतात. ते अरबी समद्रात दोन तास डुबकी मारून जप करतात, असं त्यांचे भक्त अशोक शेट्टी सांगतात.

राजकारणात यायच्या स्वामींच्या निर्णयावर त्यांचे भक्त खूश असले तरी नेत्यांची झोप मात्र उडाली आहे, खासकरून भाजप नेत्यांची. कारण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही स्वामींनी केली आहे.

काँग्रेस-भाजप दोघांसाठी डोकेदुखी

लक्ष्मीवारा तीर्था स्वामी यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर इतर साधुंनीही तशीच इच्छा जाहीर केली आहे. यात मँगलोरच्या वज्रादेही मठाच्या राजशेखरानन्दा स्वामी यांचाही समावेश आहे. आता त्यांनीही तिकीटाची मागणी केली आहे.

चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या होलालकेरे या जागेसाठी दलित साधू चेन्नईया स्वामी मदारा यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी अमित शहा यांची होलालकेरे इथे सभा झाली होती तेव्हा स्वामींच्या सांगण्यावरून अनेक लोक आले होते.

उडुपी असो अथवा चित्रदुर्ग साधुंच्या राजकारणात येण्याच्या इच्छेनं काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना हैराण करायला सुरुवात केली आहे. कारण ही साधुमंडळी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)