सलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं?

  • भरत शर्मा
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी
काळवीट

फोटो स्रोत, AFP

सलमान खान आणि काळवीट असे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा सलमान अडचणीत आहे, असं समजून जायचं. सलमान खानवर राजस्थानच्या जोधपूरमध्ये दोन काळवीटांची शिकार करण्याचा आरोप आहे.

काळवीट म्हणजे काळ्या रंगाचं हरीण. ही हरणाची प्रजात दुर्मीळ गटात मोडते.

सध्या चर्चेत असलेली ही घटना 26 सप्टेंबर 1998 ची आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर 28 सप्टेंबरला सलमानवर घोडा फार्म्समध्ये आणखी एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

त्याच वर्षी बिश्नोई समुदायानं सलमान खानच्या विरुद्ध खटला दाखल केला आणि दहा दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली. लगेचच जामीन मिळाला. तेव्हापासून हा खटला सुरू आहे. आज त्याला दोषी ठरवण्यात आलं.

पण हा खटला इतका का गाजला? त्यात देशातला सगळ्यांत प्रसिद्ध अभिनेता गुंतला आहे म्हणून की काळवीट खरंच इतका महत्त्वाचा प्राणी आहे म्हणून?

कुठे कुठे सापडतो?

पहिल्यांदा काळवीट म्हणजे काय ते बघू या. काळवीट किंवा ब्लॅक बकला इंडियन एंटिलोप असंही म्हटलं जातं. भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये काळवीट सापडतात.

काही परिसरात त्यांची संख्या सामान्य प्रमाणात आहे पण संरक्षित क्षेत्रात त्यांची लोकसंख्या वाढते आहे. काही परिसरात ते पिकांना नुकसानदायी असतात, अशीही स्थानिकांची तक्रार आहे.

फोटो स्रोत, AFP

काळवीट ज्या परिसरात राहतात त्या क्षेत्रांची संख्या कमी होत आहे. पण तरीही काही गोष्टी काळवीटांच्या बाबतीत संतुलित पद्धतीनं घडत आहेत.

काळवीटाबदद्ल एक विशेष गोष्ट म्हणजे परिस्थितीनुरूप बदलून जुळवून घेण्यात ते पटाईत असता. पण तरीही वाढती मानवी लोकसंख्या, त्याबरोबरीने वाढणारी पाळीव प्राण्यांची संख्या आणि आर्थिक विकास यामुळे जंगलावरचा दबाव वाढत आहे.

वजन आणि उंची किती?

उदयपूरमध्ये मुख्य वनसंरक्षक राहुल भटनागर यांनी बीबीसीला सांगितलं की, काळवीट शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे आणि त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे.

ते म्हणाले, "काळवीट सामान्यत: वाळवंटी प्रदेशात दिसतो. याची भरमसाठ शिकार झाली आहे आणि त्यातून ही प्रजाती वाचवण्यासाठी कायद्याचा आधार घेतला जातोय."

फोटो स्रोत, AFP

काळवीटाचं वजन 34-45 किलोग्रॅम असतं. खांद्याची उंची 74-88 सेंटीमीटर असते. मादीचं वजन 31-39 किलोग्रॅम असतं. ती उंचीनं थोडी कमी असते.

नरासारखाच मादीचासुद्धा पांढुरका भुरा रंग असतो. दोघांच्याही डोळ्याच्या चारी बाजूला तोंड, पोटाचा काही भाग आणि पायाजवळच्या भागावर पांढरा रंग असतो. शिंगांची लांबी ही नर आणि मादी यांच्यातला फरक ओळखण्याची खूण असते. नराची शिंगं मोठी असतात तर मादीच्या बाबतीत असं होत नाही.

हरीण रंग बदलतो

काळवीट रंग बदलतो ही आणखी एक विशेष गोष्ट आहे. मान्सूनच्या शेवटापर्यंत नर हरणांचा रंग काळा होतो. पण थंडीत हा रंग हलका व्हायला सुरुवात होते आणि एप्रिलच्या सुरुवातीला पुन्हा एकदा हा रंग भुरा होतो.

दक्षिण भारतात असे काही काळवीट आहे ज्यांचा रंग काळपट होत नाही. पण असं असूनसुद्धा नराचा रंग मादी आणि पिल्लाच्या रंगाच्या तुलनेत गडद होतो.

फोटो स्रोत, AFP

काळवीट साधारणत: गवत खातात. पण थोडीफार हिरवळ असलेल्या अर्ध वाळवंटी प्रदेशातसुद्धा ते सापडतात.

वन्यजीवतज्ज्ञ आरेफा तहसीन यांनी बीबीसीला सांगितलं की, ते उदयपूरहून येतात आणि ब्रिटिशांच्या काळात ते झुंडीनं येत असत. पण आता तसं होत नाही.

लोकसंख्या आणि धोके

"काळवीटांची अडचण अशी आहे की त्यांचा परिसर आता कमी होत आहे. काळवीट म्हणजे घनदाट जंगलात राहणारा प्राणी नाही. हा मैदानी प्रदेशातला प्राणी आहे. मानव प्राण्यांची संख्या वाढल्यामुळे आम्ही त्यांच्या परिसराचा ताबा घेत आहोत", आरेफा यांनी सांगितलं.

दोनशे वर्षांपूर्वी काळवीटांची संख्या 40 लाख होती. पण 1947मध्ये ती 80 हजारावर आली. 1970च्या दशकात त्यांची संख्या कमी होऊन 22 ते 24 इतकी झाली आहे. 2000 मध्ये ही संख्या 50 हजारापर्यंत गेली आहे.

भारतात काळवीट राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सापडतात. भारताच्या बाहेर ते नेपाळमध्ये 200 अर्जेंटिनामध्ये 8600 आणि अमेरिकेत 35 हजार आहे.

फोटो स्रोत, AFP

काळवीटांची तंतोतंत गणना होत नाही. त्यामुळे त्यांची नेमकी संख्या किती आहे हे सांगता येत नाही. काही भागात ही संख्या जास्त आहे.

या हरणांनी जमिनीवर राहण्याची आणि वसण्याची पद्धत शिकून घेतली आहे. काही परिसरात ते पिकांना नुकसानदायी असतात. पण ते नीलगायीइतके धोकादायक झालेले नाही.

प्राचीन काळाशी संबंध

भारतीय संस्कृतीत काळवीटाचं विशेष स्थान आहे. अंदाज असा आहे की, सिंधूच्या खोऱ्यातले लोक यांची शिकार करून त्याचा भोजनात समावेश करत असत. धोलवीरा आणि मेहरगड सारख्या जागांवर त्यांचे अवशेष सापडले आहेत.

16 ते 19व्या शतकात आलेल्या मुघलांच्या काळातली काळवीटाची चित्रं सापडतं. भारत आणि नेपाळमध्ये काळवीटाचं कोणीही नुकसान करत नाही आणि त्यांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई होते.

बिष्णोई समाज तर जवळजवळ त्यांची पूजा करतो. आंध्र प्रदेशनं त्याला राज्यप्राण्याचा दर्जा दिला आहे.

संस्कृतमध्ये या हरणाचा उल्लेख कृष्ण मृगाच्या रुपात आला आहे. हिंदू प्राचीन ग्रंथानुसार काळवीट कृष्णाचा रथ वाहताना दिसतो. काळवीटाला वायू, सोम आणि चंद्राचं वाहनसुद्धा मानलं जातं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)