जेव्हा इंग्लंडमधील पबमध्ये 1857 च्या लढ्यातील सैनिकाची कवटी सापडते...
- सौतिक बिस्वास
- बीबीसी प्रतिनिधी

ही कवटी 32 वर्षीय सैनिकाची आहे.
2014 मधली ही गोष्ट आहे. इतिहासतज्ज्ञ किम वॅगनर लंडनमधल्या आपल्या कार्यालयात बसले होते तेव्हा त्यांना एक ईमेल आला. आमच्याकडे एक वस्तू आहे ज्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत, असं त्या मेल मध्ये लिहिलं होतं. आणि हा ईमेल एका दांपत्याने त्यांना पाठवला होता. ती वस्तू होती मानवी कवटी.
डॉ. वॅगनर क्वीन मेरी युनिव्हर्सिटीत ब्रिटीश साम्राज्याचा इतिहास शिकवतात. आमच्याकडच्या या कवटीचं काय करावं हे कळत नसल्याचं त्या दांपत्याचं डॉ. वॅगनर यांना सांगितलं.
त्या कवटीचा खालचा भाग मात्र उपलब्ध नव्हता. काही दात खिळखिळे झाले होते आणि त्या कवटीला एक जुन्या काळाची छटा होती. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या खोबणीत एक कागद अडकवला होता. ते हातानं लिहिलेलं एक मोठं टिपण होतं. या कागदावर कवटीची कथा होती.
उत्तर बंगाल इंन्फंट्रीच्या 46 व्या रेजिमेंटचे हवालदार आलम बेग यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. त्यांच्या इन्फन्ट्रींच्या इतरअनेकांनाही असंच मारलं. ते 1857च्या बंडाच्या मुख्य सूत्रधारांपैकी होते. किल्ल्याकडे जाणाऱ्या एका रस्त्याचा त्यांनी ताबा घेतला. सर्व युरोपीय लोक तिथेच सुरक्षेसाठी लपण्याचा प्रयत्न करत होते. आधी डॉ. ग्रॅहम यांच्या बग्गीवर त्यांनी गोळ्या घातल्या. ते मुलीबरोबर प्रवास करत होते. त्यांचा दुसरा बळी मिशनरी म्हणून काम करणारे रेव्हरंड हंटर होते. ते आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर प्रवास करत होते. त्यांनी हंटर, त्यांची पत्नी आणि मुलीला रस्त्याच्या बाजूला घेऊन खून केला.
आलम बेग यांचं वय 32 वर्षं होते. त्यांची उंची पाच फूट साडेसात इंच होती आणि त्यांचं रूपइथल्या इतरांसारखं सामान्य नव्हतं.
ही कवटी कॅप्टन कोस्टेलो यांनी घरी आणली. आलम बेग यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली, तेव्हा ते ड्युटीवर होते.
हेच ते पत्र
या टिपणावरून हे स्पष्ट होतंय की, ही कवटी भारतीय सैनिक आलम बेग यांची आहे. ते बंगाल रेजिमेंटमध्ये होते. त्यांना 1858 मध्ये सियालकोटला तोफेच्या तोंडी देण्यात आलं. (सियालकोट सध्या पाकिस्तानात आहे.) जी व्यक्ती या घटनेची साक्षीदार होती त्याने ही कवटी इंग्लंडमध्ये आणली. पण हे कथित हत्याकांड बेग यांनी का घडवलं याबाबत त्या नोटमध्ये उल्लेख नाही.
मूळचे हिंदू आणि मुस्लीम सैनिकांना इंग्रजसुद्धा सिपॉय म्हणजे शिपाई म्हणत असत. त्यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उठाव केला होता. बंदुकीच्या काडतुसांत प्राण्यांची चरबी असल्याचा दावा हे या उठावाचं निमित्त होतं.
या दांपत्यांनी संपूर्ण इंटरनेट धुंडाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या बेग यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी डॉ. वॅगनर यांच्याशी संपर्क साधला. डॉ वॅगनर हे इतिहासकार आहेत आणि भारतीयांच्या या आंदोलनावर एक पुस्तक लिहिलंय अशी त्यांना माहिती मिळाली. 1857 च्या उठावाला 'पहिलं स्वातंत्र्ययुद्ध' असंही म्हणतात.
भयावह गोष्ट
ज्या दिवशी डॉ.वॅगनर या दांपत्याला भेटलं तो नोव्हेंबर महिन्यातला ढगाळ दिवस होता. दांपत्यानं वॅगनर यांना सांगितलं की, केंट इथल्या लॉर्ड क्लॉईड या पबची मालकी त्यांच्या एका नातेवाईकानं घेतली. या पबच्या इमारतीतल्या एका खोलीत काही जुने क्रेट होते. त्यातल्या एकात ही कवटी सापडली होती.
पण ही कवटी या पबमध्ये कशी आली याबद्दल कोणालाच कल्पना नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांनीसुद्धा 1963मध्ये 'खळबळजनक शोध' असं वर्णन करत ही बातमी जोरात चालवली होती. त्यात कवटीबरोबर पब मालकांचा फोटोसुद्धा छापला होता. या फोटोत त्यांनी ही कवटी एखादा पुरस्कार मिळाल्यासारखी मिरवली होती. मग त्यांनी ही कवटी पबच्या दर्शनी भागात ठेवली. जेव्हा पबच्या मालकांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे पबबरोबर ती कवटीही आली आणि त्यांनी मात्र ती लपवून ठेवली.
"तर अशा प्रकारे मी एसेक्समधल्या एका ट्रेन स्टेशनवर बॅगेट मानवी कवटी घेऊन उभा होतो. ही कोणतीही सामन्य कवटी नव्हती. ती इतिहासाशी निगडीत होती, जो विषय मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो," असं डॉ. वॅगनर सांगतात.
फोटो स्रोत, DOVER KENT ARCHIVES
1963 साली लॉर्ड क्लाईड नावाच्या पबमध्ये ही कवटी सापडली आहे.
नोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची शहानिशा करण्याचं मोठं आव्हान वॅगनर यांच्यासमोर होतं. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युजियम मध्ये एका तज्ज्ञानं कवटीचं परीक्षण केलं आणि ही कवटी 19व्या शतकातल्या मधल्या काळातली आहे असं सांगितलं. ही कवटी आशियायी पुरुषाचीच असेल आणि त्याचं वय 30 च्या आसपास असावं असं सांगण्यात आलं.
पण तज्ज्ञांच्या मते, मारहाण झाल्याची कोणतीच खूण तिथे दिसली नाही. तेसुद्धा साहजिकच होतं. कारण तोफेच्या तोंडी दिल्यावर छातीच्या भागावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. डोक्यावर कापल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे डोक्याचा भाग उन्हामुळे किंवा शव कीटकांच्या संपर्कात आल्यानं असा झाला.
बेग यांच्याबाबत अधिक माहिती मिळेल असा विश्वास डॉ. वॅगनर यांना वाटत नव्हता.
वसाहतीच्या काळातील सैनिकांबाबत फारशी कागदपत्रं, पुरावे उपलब्ध नाहीत. एखादा अपवाद मंगल पांडेचा असू शकतो. कारण त्यांनीच 29 मार्च 1857ला कोलकात्याच्या बाहेरच्या प्रदेशात पहिली गोळी चालवली आणि ब्रिटिशांविरुद्धच्या उठावाला सुरुवात केली.
बेग किंवा भेग (कारण या पत्रामध्ये उल्लेखलेलं नाव Alum Bheg असं आहे ) यांचं नाव भारत आणि यूकेमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही कागदपत्रात, पत्रांत, स्मरणग्रंथात किंवा कोणत्याही नोंदीत दिसत नाही. त्यांच्या कोणत्याही वंशजांनी कवटीची मागणी कधी केली नाही. पण त्याबरोबर काही रंजक शोध लागले.
बेग यांनी हत्या केलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची पत्र त्यांना सापडली. अमेरिकन धर्मगुरू अँड्र्यू जॉर्डन हे या उठावादरम्यान सियालकोटला होते. त्यांनी या सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते डॉ. ग्रॅहम आणि 'हंटर्स' म्हणजे हत्यारे या दोघांनाही ओळखत होते. शिपायांना म्हणजे बेग यांना देहांताची शिक्षा दिली तेव्हाही ते उपस्थित होते.
'द स्फिअर' या चित्रवृत्तपत्रात एक बातमी आली होती. त्यात व्हाईटहॉल मधील एका वस्तुसंग्रहालयात अशीच एक वस्तू ठेवल्याचं म्हटलं होतं.
भारतीय उठावाची अशीच एक भयानकआठवणव्हाईटहॉलमधील रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन मध्ये ठेवण्यात आली होती. बंगाल इन्फंट्रीच्या 49 व्या रेजिमेंटच्या एका सैनिकाची ही कवटी होती. त्याच्याबरोबर आणखी 18 लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. आता त्या कवटीचा सिगार बॉक्स तयार केल्याचं आपण बघत आहोत.
फोटो स्रोत, Getty Images
भारतीय सैन्यानं ब्रिटिशांविरुद्ध 1857 साली उठाव केला.
वृत्तपत्राच्या मते, "त्या वेळची भीषणता आम्ही समजू शकतो. त्यातून तिथल्या मूळ लोकांचा हिंसाचार आणि हिंसाचाराला दिलेली शिक्षासुद्धा आम्ही समजू शकतो. तरीसुद्धा या प्रसंगाच्या भयानक खुणा अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी का ठेवाव्यात?"
पुराव्यांच्या दुष्काळाशी लढता लढता डॉ वॅगनर यांनी बेग यांच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी दिल्ली आणि लंडनची संग्रह ग्रंथालयं, संस्था पालथ्या घातल्या. तसंच त्रिमू घाटात जुलै 1857 मध्ये झालेल्या संघर्षाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी सियालकोटला प्रवास केला. या युद्धात बेग यांच्या सैनिकांच्या तुकडीला पकडलं जनरल निकोल्सननं. त्याच जनरल निकोल्सनला 2 महिन्यांनंतर बेदम मारहाण झाली आणि ते जखणी झाले. उठाव केलेल्या सैनिकांच्या ताब्यातून दिल्लीची सोडवणूक करताना इंग्रजांच्या बाजूने जनरल लढत होते.
बेग यांचा आदर व्हावा म्हणून...
याचा परिणाम म्हणजे वॅगनरचं नवीन पुस्तक आहे. 19व्या शतकातील ब्रिटीश काळातील आंदोलनाबद्दल त्यात विस्तारानं लिहिलं आहे. 'The Skull of Alum Bheg' असं या पुस्तकाचं नाव आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक यास्मिन खान म्हणतात, "हे पुस्तक एका रहस्यय कथेसारखं आहे. पण ब्रिटीश काळात झालेला हिंसाचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे."
ब्रिटीश इंडियन इतिहासातल्या सगळ्यांत नाट्यमय काळाची ही कथा आहे. अलम बेग यांना आयुष्यात शेवटपर्यंत माणूस म्हणून चांगली वागणूक, सन्मान नाकारला गेला. त्यातला थोडा तरी आदर मिळावा म्हणून मी बेग यांची कथा लिहिली. आज 160 वर्षांनंतर अलम बेगला शांतता मिळेल असं मला वाटतंय," असं वॅगनर सांगतात.
विनगर म्हणतात की अलिम यांच्या आयुष्याचं अंतिम पर्व सुरू व्हायचं आहे.
डॉ वॅगनर यांचं मत विचारात घ्यायचं झाल्यास Alum Bheg यांचं खरं नाव अलिम बेग असं होतं. ते उत्तर भारतातले सुन्नी मुस्लीम होते. बंगाल रेजिमेंटची वाढ कानपूरमध्ये झाली. बेग त्याच भागातले असण्याची शक्यता आहे. हिंदू रेजिमेंटमध्येही 20% मुस्लीम असत.
बेग यांची दिनचर्या अतिशय भयानक होती. रेजिमेंटच्या उच्चाधिकाऱ्यांकडे पत्र पुरवणं हे त्यांचं काम होतं. जुलै 1857ला ते इंग्रजांच्या तावडीतून सुटल्याचं सांगण्यात येतं.
कॅप्टन कोस्टेलोसुद्धा ही शिक्षा दिली तेव्हा तिथे उपस्थित होते. त्यांना रॉबर्ट जॉर्ज कोस्टेलो असं त्यांचं नाव असल्याचं कळलं. याच व्यक्तीने ही कवटी इंग्लंडमध्ये परत आणली असं वॅगनर यांनी सांगितलं. त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला आणि त्यांना 1857 ला भारतात पाठवण्यात आलं. 10 महिन्यानंतर ते या पदावरून निवृत्त झाले.
बेग यांना भारतात सन्मानानं परत आणणं हेच या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे असं वॅगनर यांनी सांगितलं.
आतापर्यंत त्या कवटीवर कोणीही हक्क सांगितलेला नाही. पण ते भारतातील संस्था आणि ब्रिटीश दूतावासाशी प्राथमिक बोलणीच्या निमित्ताने सतत संपर्कात आहेत.
रावी नदीच्या किनारी बेग यांचं दफन करावं अशी वॅनगर यांची इच्छा आहे.
"पण या परतीच्या मार्गात कोणतंही राजकारण नको असं मला वाटतं. ही कवटी संग्रहालयात काचेच्या पेटीत जायला नको आणि किंवा बेवारसपणे पडायला नको असं मला वाटतं", ते सांगत होते.
आलम बेग यांचे अवशेष सन्मानाने परत आणून मग ते पुरण्यात यावेत, अशी मला आशा आहे, ते सांगतात.
"रावी नदीच्या काठावर त्यांना पुरण्यात यावं, तीच त्यांच्यासाठी योग्य जागा आहे. कारण उठावाच्या पहिल्या दिवसानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी इथेच आसरा घेतला होता. तीच आता भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे," वॅगनर आशावादी आहेत.
"शेवटी हे मी एकटा ठरवू शकत नाही. पण काही झालं तरी अलम बेगच्या आयुष्यातील अंतिम पर्व सन्मानाचं असावं असाच माझा उद्देश असेल," हा ब्रिटीश संशोधक सांगतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)