#मोठ्याबातम्या : कशी गेली सलमानची तुरुंगातली पहिली रात्र?

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आलेल्या पाच मोठ्या बातम्या.
1. कशी गेली सलमानची तुरुंगातली पहिली रात्र?
काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर सलमान खानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली. सलमान खानला त्या ठिकाणी कैदी नंबर 106 असं म्हटलं जात आहे.
बलात्कार प्रकरणात तुरुंगात असणारे आसाराम बापू हे सलमान खानचे शेजारी असल्याची माहिती तुरुंगअधिकाऱ्यांनी दिली असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. त्यांच्या दोघांमध्ये फक्त एका भिंतीचं अंतर आहे.
सलमान खाननं काल तुरुंगातलं जेवण नाकारलं अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली. त्याला इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात येणार आहे. तुरुंगात आल्यामुळे काही अस्वस्थता वाटत आहे का? असं त्याला तुरुंगाधिकाऱ्यांनी विचारलं होतं, काही गोळ्याऔषधं हवी आहेत का? असं त्याला विचारलं असता तो म्हणाला, काही नको मी याआधी सुद्धा जेलमध्ये राहिलो आहे, असं तुरुंगाधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.
2. पाच लाख भारतीयांचा डेटा फेसबुकहून चोरीला गेल्याची शक्यता
फोटो स्रोत, Alamy
फेसबुक डेटा चोरीचा फटका भारतीयांना देखील बसला असण्याची शक्यता आहे. केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक अलेक्झांडर कोगन यांनी तयार केलेलं अॅप 335 भारतीयांनी डाउनलोड केलं होतं.
त्यामुळे 5 लाख लोकांची माहिती त्यांच्या हाती लागली. ती माहिती त्यांनी केंब्रिज अॅनालिटिकाला दिली असावी असा अंदाज फेसबुकनं व्यक्त केला आहे, असं वृत्त इकोनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.
माहिती चोरीची घटना उघड झाल्यानंतर केंद्र सरकारनं फेसबुक आणि केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे याबद्दल विचारणा केली होती. मात्र, केंब्रिज अॅनालिटिकाकडून उत्तर येत नाही, तोपर्यंत फेसबुकवर कारवाईचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
3. न्यूज पोर्टलच्या नियमनासाठी सरकारची समिती स्थापन
ऑनलाइन पोर्टलवरील नियमनासाठी माहिती प्रसारण मंत्रालयानं एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये गृह, कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचा समावेश आहे, असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
MyGovचे मुख्याधिकारी आणि नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशनचे अधिकारी या समितीमध्ये असतील.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सरकारचं नियंत्रण आहे आणि त्यांचं नियमन करण्यात आलं आहे, पण ऑनलाइन मात्र अद्याप नियंत्रणात नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
4. अरुण जेटली यांना किडनीचा आजार, ट्वीटद्वारे दिली माहिती
फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली किडनीच्या विकारानं आजारी असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.
AIIMSचे डॉक्टर सध्या अरुण जेटली यांच्या निवासस्थानी त्यांची तपासणी करत आहेत. मूत्रपिंडरोपण करायचे की नाही? याबाबत डॉक्टरांनी निर्णय घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना AIIMSमध्ये दाखल केले जाऊ शकतं.
लंडनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या ब्रिटन-भारत आर्थिक चर्चेत ते सहभागी होणार नाहीत. सध्या मी किडनीच्या आजारानं त्रस्त आहे, त्यामुळे मी घरून काम करत आहे असं ट्वीट जेटलींनी केलं आहे.
5. शहीद शुभम मुस्तापुरेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
जम्मू काश्मीरच्या पूंछ डिल्ह्यातल्या कृष्णा घाटीजवळच्या नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात परभणी जिल्ह्यातील जवान शुभम मुस्तापुरे सीमेवर धारातीर्थी पडले होते.
त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. हजारो नागरिक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोनेरवाडी गावात जमले होते. शहीद शुभम मुस्तापुरे अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता असं एबीपीनं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)