'हिंदूंना मुसलमान, बौद्धांना हिंदू चालतात पण नास्तिक कुणालाच नको असतात'

नास्तिक परिषद Image copyright Amit Jojare

सत्संग, निरूपण, जन्मोत्सव, माता का जगराता, मंदिरातला भंडारा... आस्तिकांना समविचारींशी भेटायला, बोलायला, व्यक्त व्हायला अनेक जागा आहेत. पण नास्तिकांचं काय? नास्तिकांनी काय करायचं? कुठे जायचं? शनिवारी मुंबईत परळमध्ये होणाऱ्या नास्तिक परिषदेत ही मंडळी एकत्र आहेत, त्या निमित्ताने...

"माझी मुलगी दुसरीत होती तेव्हाची गोष्ट. एक दिवस ती शाळेतून रडत रडत घरी आली. विचारलं तरी काही सांगेना. खोदून खोदून विचारलं तेव्हा कळलं की तिच्या वर्गातल्या मुलांनी तिला फार घाबरवलं होत."

"तू नरकात जाशील, तुला उकळत्या तेलात तळतील आणि तुझ्या डोळ्यात तिखट टाकतील. तिच्याच वयाची ही मुलं तिला काहीबाही बोलतं होती, धमकावत होती कारण बोलता बोलता ती सहज म्हणून गेली की तिचा देवावर विश्वास नाही."

"तिच्या घरात देव मानणारं कोणी नव्हतं, तिची आई (म्हणजे मी) कधी पूजा करणाऱ्यातली किंवा देवाला हात जोडणाऱ्यातली नव्हती, मग तिने का देव मानावा? पण तिच्या बरोबरीच्या सात-आठ वर्षांच्या मुलांना हे मान्य होणारं नव्हतं."

"देव न मानणं हे किती मोठ पाप आहे हे ती मुलं माझ्या मुलीला ठसवून सांगत होती आणि माझी मुलगी एकटी पडली होती. तिला कोणी समजून घेतलं नाही. अगदी शिक्षकांनीही नाही."

"ती कॉन्व्हेंटमध्ये होती. तिथे ख्रिस्ती धर्माचा पगडा जास्त. ज्या मुलांनी तिला एकटं पाडलं ती वेगवेगळ्या धर्मांची होती. म्हणजे त्यांचे आई-वडील ते धर्म मानत होते म्हणून ही मुलंही. त्यांना एकमेकांविषयी काही प्रॉब्लेम नव्हता. पण सगळे मिळून माझ्या मुलीला विरोध करत होते कारण ती कोणताही धर्म मानत नव्हती."

"हीच तर गंमत आहे ना. आपल्याकडे आजही बौद्धांना हिंदू चालतात, हिंदूंना मुसलमान आणि मुसलमानांना ख्रिश्चन. पण नास्तिक कोणालाच नको असतात. काहीही करा, कोणत्याही धर्माचे असा, पण देवाचं अस्तित्व मान्य करा."

"निरीश्वरवादी व्यक्ती आजही आपल्या समाजात एकटी पडते. आणि त्यात ती बाई असेल तर विचारायलाच नको."

मुंबईच्या चैताली शिंदे सांगत असतात. व्यवसायाने इंस्ट्रक्शनल डिझायनर असणाऱ्या चैताली दुसऱ्या पिढीतल्या नास्तिक आहेत. त्यांचे आईवडीलही नास्तिकच. पण त्यांचं लग्न मात्र आस्तिक घरात झालं. नवरा, सासू-सासरे सगळे आस्तिक.

'स्त्रीला नास्तिक असण्याची परवानगीच नाही'

"आपल्या समाजाच स्त्रीला नास्तिक असण्याची परवानगी नाही. मुळात नास्तिकांकडे बघायचा दृष्टिकोन सरळ नाही. ही देवाला मानत नाही ना, म्हणजे हिला चांगल्या-वाईटाची चाड नसणार, यांच्या घरात वाट्टेल धंदे चालत असणार, दारूचा पूर वाहात असणार असं काहीसं चित्र इतरांच्या मनात उभं राहतं," चैताली हसतात.

"माझं लग्न झालं तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी नास्तिक आहे. पूजापाठ करणार नाही. तेव्हा कदाचित भावनेच्या भरात असेल पण माझ्या नवऱ्याने ते मान्यही केलं," त्या सांगतात.

"त्यानंतर माझ्या सासूबाई आजारी पडल्या. त्यांना असाध्य रोग झाला आणि खापर फुटलं ते माझ्या सत्यनारायण करणार नाही या भूमिकेवर. त्यानंतर वादाचे असे अनेक प्रसंग आले. आजही मी नास्तिक आहे असं चारचौघात म्हटल्यावर समोरचा डोळे विस्फारतो," त्या म्हणाल्या.

"काही वर्षांपूर्वी मी आणि माझा नवरा विभक्त झालो. त्याची कारणं फार वेगळी होती, पण आजही 'ही देवाचं काही करत नाही ना म्हणूनच हिच्याबरोबर असं झालं' अशी कुजबूज कानावर येतं. समोर कुणी बोलत नसलं तरी पाठीमागे लोक बोलतातच," त्या पुढे म्हणतात.

Image copyright AMIT JOJARE

"कोणी तोंडावर बोलत नसलं तर निरीश्वरवादी माणसाविषयी इतरांचा हाच अप्रोच असतो."

"नास्तिकांना आपला चांगलेपणा, नीतिमत्ता सिद्ध करून दाखवावी लागते. इतरांपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. यांचं सतत प्रेशर असतं मनावर. त्यात मनमोकळ बोलायला कोणी नसतं. मग नास्तिक माणसाचं एकाकी बेट बनत जातं," असं चैतालींना वाटतं

म्हणूनच अनेक शहरांमध्ये विखुरलेल्या या एकेकट्या नास्तिकांना एका छताखाली एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हेतू हा की नास्तिक समविचारी माणसं भेटावीत, त्यांना आपले अनुभव इतरांशी शेअर करता यावेत, आणि ज्या गोष्टी ते आपल्या आस्तिक असणाऱ्या नातेवाईक, मित्र मंडळी किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी बोलता येत नाहीत, त्या मोकळेपणाने इतर नास्तिकांशी बोलता याव्यात, असं त्या म्हणाल्या.

नाशिकमध्ये नुकताच झालेला नास्तिक मेळावा, पुण्यामध्ये नास्तिकांनी एकत्र येऊन आयोजित केलेली पिकनिक किंवा आज मुंबईत होणारी नास्तिक परिषद ही याची काही उदाहरणं आहेत.

आस्तिकांच्या जगातल्या नास्तिकांच्या सपोर्ट सिस्टीम

"आपली माणसं भेटाल्यानंतर जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे," नाशिकच्या नास्तिक मेळाव्याच्या आयोजकांपैकी एक असणारे अमित जोजारे सांगतात.

"नातेवाईकांमध्ये, समवयस्कांमध्ये धर्म, देव या विषयांवरून नेहमी चर्चा व्हायची. मी प्रश्न विचारायचो की तुमच्या धर्मात, देवाने जे सांगितलं आहे असं तुम्ही म्हणता, त्याच्या विरुद्ध वर्तन तुम्ही सर्रास करता. मग अशा वेळेस तुमचा देव कुठे जातो?" ते सांगतात.

Image copyright Sujay_Govindaraj/Getty Images

"आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही ही आस्तिक माणस निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही," असं ते सांगतात.

"आम्हा नास्तिकांचे मेळावे, भेटी या थकव्याला उत्तर आहेत. म्हणजे तिथे मी काहीही बोललो तरी मला कोणी चुकीच्या अर्थाने घेणार नसतं. नास्तिकांमध्येही वाद होतात, पण ते तर्कानेच होतात. त्याला उगाच, 'ते काहीही असो, पण जगात एक शक्ती असतेच जी सगळं नियंत्रित करते', अशी तर्कशून्य शेपूट कोणी जोडत नाही. त्यामुळे अशा इव्हेंटनंतर खूप फ्रेश वाटतं," अमित म्हणतात.

मग तुम्ही फक्त बौद्धिक चर्चा करता का?

"नाही, अजिबात नाही. आमचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. आम्ही त्यावर गप्पा मारतो, माहिती शेअर करतो, कधी सगळे मिळून एखादा पिक्चर पाहायला जातो तर कधी कोणाच्या घरी जमून गप्पा मारतो. थोडक्यात जवळचे मित्रमैत्रिणी मिळून जी धमाल करता ती सगळी आम्ही करतो. मेळावे, भेटीगाठी, एकत्र फिरायला जाणं या आम्हा नास्तिकांच्या सपोर्ट सिस्टीम्स आहेत," चैताली उत्तरतात.

"पुण्याचा ग्रुप तर दर पंधरा दिवसाला कुठे फिरायला, ट्रेकिंगला जातो. अर्थाच पुण्याच्या आसपास फिरण्यायोग्य ठिकाणं पण खूप आहेत. तसं आमचं नाही म्हणून आमची गोची होते," अमित मिश्कीलपणे सांगतात.

बुद्धिप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचा ध्यास

आधी दुबईत आणि आता कतारमध्ये राहाणाऱ्या कविता दळवी सांगतात, "मी आधी देवभोळी होते, अंधश्रद्धाळूही होते. धर्म संकटात आहे म्हणून एक संस्थाही जॉईन करणार होते. पण नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांच्या संपर्कात आले आणि डॉ. दाभोलकरांबरोबर काम करण्यास सुरुवात केली."

Image copyright SoumenNath/Getty Images

पूर्ण विचारांती मी नास्तिक झाले.

नास्तिक मेळाव्यांचा हेतू डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर बुद्धिप्रामाण्यवादाची चळवळ पुढे नेण्याचा आहे.

"नास्तिकांना एकटं वाटू नये, त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडावेत, आणि त्यायोगे बुद्धिप्रामाण्यवादाची चळवळ पुढे जावी असा आमचा उद्देश आहे. कारण एकेकट्या नास्तिकांना खिंडीत गाठणं सोपं आहे, पण संघटित झालो तर आमचा आवाज दूरवर पोहोचेल."

धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध

नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे या नास्तिक मेळाव्यांचं छोट्या काळाचं उदिष्ट असलं तरी धर्माच्या बदनामीचा कायदा रद्द व्हावं म्हणून चळवळ उभी करणं हे या मेळाव्यांचं दीर्घकालीन ध्येय आहे, असं मुंबई नास्तिक परिषदेच्या आयोजकांपैकी एक असणारे कुमार नागे सांगतात.

Image copyright Instants/Getty Images

"बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरणाऱ्यांना या कायद्यापायी प्रचंड त्रास सहन करावा लागतो," असं ते सांगतात.

"अगदी मीही दोन दिवसांपासून पोलिसांना तोंड देतो आहे, कारण आमच्या परिषदेपायी कोण्या गृहस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परिषदेआधीच त्यांच्या भावाना कशा दुखावल्या हे कोड काही मला उलगडलेलं नाही," असं ते म्हणतात.

"डॉ. दाभोलकरांवर 14 केस दाखल होत्या. त्यातली एक केस औरंगाबाद, एक नागपूर, एक पणजी, आणि एक कुर्ला अशी होती. आयुष्यभर माणसाने या केस लढण्यासाठी फिरत राहायचं का?" असा प्रश्न ते विचारतात.

"या कायद्यामुळे नास्तिकांना त्रास होतो. आज बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणाऱ्या लोकांची संख्या 15 टक्के आहे असं आम्ही केलेल्या सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. ही संख्या वाढणार हे निश्चित आणि हेच लोक आता या कायद्याविरुद्ध आवाज उठवतील."

निरीश्वरवादाचा पंथही नकोच

एका बाजूला नास्तिक, बुद्धीप्रामाण्यवादी माणसं एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र नास्तिकांनी एकत्र येऊ नये. त्यांनीही पंथ स्थापन केला तर धर्म मानणारे आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काय फरक, असं विचारणारेही लोक आहेत.

मराठी चित्रपट अभिनेता अतुल कुलकर्णी त्यापैकी एक. त्यांनी 2015 साली मुंबईत होणाऱ्या नास्तिक परिषदेचं अध्यक्षपद नाकारलं होतं.

Image copyright clara_cs/Getty Images

'अशा परिषदा किंवा मेळावे आयोजित करणं हे माझ्या नास्तिकतेच्या व्याख्येत बसत नाही. कोणताही पंथ तयार करणं हे संघटित धर्म न मानणाऱ्या किंवा धर्म न मानणाऱ्या निरीश्वरवादी विचारसरणीच्या विरोधात आहे आणि त्याला नास्तिक मेळावेही अपवाद नाहीत. मी अशा प्रकारच्या कोणत्याही मेळाव्याला उपस्थित राहिलो तर मी नास्तिक राहाणार नाही,' असं त्यांनी आयोजकांना केलेल्या इमेलमध्ये म्हटलं होतं.

"हो, अशी विचारसरणी मानणारे अनेक नास्तिक लोक आहेत. आणि त्यांचा मतांचा आदर आहे. पण तरीही अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असते कारण आपलं मत इतकं ठामपणे व्यक्त करणारे लोक कमी आहेत," असं अमित सांगतात.

बहुतांश जण हे चळवळीशी संबंधित आहेत आणि ते द्विधा मनस्थितीत नसतात. पण अशांचं काय जे आस्तिक घरांमधून येतात आणि नास्तिक होऊ पाहात आहेत?

"एक शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा जो विचारांती नास्तिक झाला आहे, पण त्याला रोजच्या आयुष्यात एकटं वाटतं त्याला या मेळाव्यात समविचारी मित्र भेटणार आहेत आणि त्याच्या मनातला गोंधळ कमी होणार आहे. नास्तिकांची एकेकटी बेट होऊ नयेत म्हणून असे उपक्रम फार गरजेचे आहेत," अमित उद्गारतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)