ग्राउंड रिपोर्ट : भटकळच्या हिंदूंनाही हवी बदनामीपासून सुटका

भटकळ Image copyright MANJUNATH KIRAN/GETTY IMAGES

कर्नाटकातील भटकळ या गावची ओळख इस्लामिक कट्टरवाद्यांचा कारखाना अशी झाली आहे. इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळचा याच गावाशी संबंध आहे. इंडियन मुजाहिदीनवर देशातल्या विविध भागांत स्फोट घडवून आणल्याचे आरोप आहेत. यासीन भटकळ सध्या तुरुंगात आहे.

भटकळ गावाच्या झालेल्या बदनामीनंतर इथल्या माणसांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं.

एकीकडे केरळचं कासरगोड आणि दुसरीकडे कर्नाटकचं भटकळ या दोन ठिकाणांपासून कट्टरवादी घटनांचं संचलन होतं, असा विश्व हिंदू परिषदेचा आरोप आहे.

पण भागातील ज्येष्ठांना हा आरोप चुकीचा असल्याचं सांगतात.

इथले ज्येष्ठ नागरिक हनीफ शोबाब म्हणतात इथून दुसरीकडे गेले की लोकांना आपल्या गावची ओळख लपवावी लागते.

बदनामीचा शिक्का

"एकतर मुस्लीम आणि त्यातही भटकळचा रहिवाशी. मग काय, त्रासाला सुरुवात होते. भटकळ कट्टरवाद्यांचा कारखाना आहे, असं सगळे म्हणतात. हा शिक्काच आमच्यावर लागलाय," हनीफ सांगतात.

"यासीन भटकळ आणि रशीद भटकळ यांनी जे काही केलं आहे त्याचा भटकळच्या नागरिकांशी काहीही संबंध नाही. न्यायालय आहे, कायदा आहे. त्यानं केलेलं सिद्ध झालं तर न्यायालय त्याला शिक्षा देईल. पण आमचा त्याच्याशी का संबंध लावता? आम्ही यासीन आणि राशिद भटकळ यांच्या सारख्यांना प्रोत्साहन देत नाही आणि संरक्षणही देत नाही. त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी," असं शोबाब पुढे सांगतात.

फक्त यासिन, राशिद आणि इकबालच भटकळचे नाहीत. इथलाच असलेला अन्वर हुसेन भटकळ अफगाणिस्तानात जाऊन तालिबानला भेटला होता, असं सुरक्षा यंत्रणा सांगतात. नंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ठार केलं होतं.

ईराणी मुस्लीम

इथे सर्वांत अगोदर ईराणचे नवायथ मुस्लीम आले आणि त्यांनी व्यापार सुरू केला, असं स्थानिक इतिहासकार सांगतात. त्यांच्याजवळ खूप पैसा होता. नवायथ मुस्लीम भटकळपासून कराचीपर्यंत आढळतात.

भटकळमध्ये नवायथ मुस्लिमांची संख्या 70 टक्के असल्याचं सांगितलं जातं. इथल्या इतर मुस्लिमांना मात्र दखनी (दक्षिणी) मुस्लीम म्हणून संबोधलं जातं.

भटकळचे मुस्लीम कन्नडी भाषेऐवजी कोकणी भाषा बोलतात. मोठमोठ्या इस्लामिक संस्थांच्या निर्मितीमुळे इथले मुस्लीम हिंदी आणि उर्दू भाषाही बोलतात.

पण गेल्या 2 दशकांपासून आपल्याला संशयाच्या भोवऱ्यात टाकण्यात आलं आहे, असं इथल्या मुस्लिमांना वाटतं. त्यांच्या संस्थांकडे आणि कौटुंबिक जीवनाकडेही संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं कारण इथल्या अनेकांनी पाकिस्तानाचे कराचीमधल्या नवायथ समाजासोबत वैवाहिक संबंध आहेत.

भटकळ यासाठीही प्रसिद्धी

मोहिमीन इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे आणि भटकळमध्ये राहतो. तो सांगतो, "अभ्यासासाठी जेव्हा मी बाहेर जातो आणि भटकळचा असल्याचं सांगतो तेव्हा लोकांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलते."

एकेकाळी भटकळची वेगळीच ओळख होती, असं इथं राहणारे मुब्बशीर सांगतात. इथली बिर्याणी, हलवा आणि जाईचं फूल खूपच प्रसिद्ध होतं.

प्रतिमा मथळा व्यंकटेश रमेश सराफ

असं नाही की भटकळमध्ये फक्त मुस्लीमच राहतात. इथं हिंदूंची संख्याही लक्षणीय आहे. यातच एक आहेत ज्येष्ठ चिकित्सक व्यंकटेश रमेश सराफ ज्यांचा जन्म भटकळमध्येच झाला.

1993च्या दंगलीची आठवण काढून ते खिन्न होतात. दंगलीच्या काळात 9 दिवस भटकळमध्ये कर्फ्यू लागू होता. एकदा आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी जात असताना पोलिसांच्या लाठ्या पडल्या होत्या, असं ते सांगतात. मुस्लीम समाजाच्या लोकांकडून त्यांना जास्त आदर मिळतो, असं सराफ सांगतात. त्यांच्या टेबलवरील फोनकडे बघून ते सांगतात की, हा फोन त्यांना एका मुस्लीम रुग्णाने दिला होता.

"भटकळची अशी ओळख बनवण्यात आली आहे. ज्यामुळे लोक इथे यायला घाबरतात. ही ओळख मीडियामुळे बनली आहे," असं सराफ यांना वाटतं.

हिंदू-मुस्लीम संबंध

"सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनाही इथे नोकरी करायची नसते. पण काही महिने इथे घालवल्यानंतर त्यांना भटकळ इतकं आवडतं की, निवृत्तीनंतरही ते इथे राहायचा विचार करतात," सराफ पुढे सांगतात.

सराफ यांच्या मते, भटकळबद्दल देशातल्या लोकांचा असलेला दृष्टिकोन चुकीचा आहे. तसंच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जेवढे चांगले संबंध भटकळमध्ये आहेत तेवढे इतर कुठेही नाही, असाही ते दावा करतात.

प्रतिमा मथळा मुख्याध्यापक एन. नरसिंह मूर्ती

एन. नरसिंह मूर्ती हे 6 वर्षांपूर्वी भटकळ येथे स्थायिक झाले होते. ते भटकळमधल्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत.

"भटकळमध्ये येताना कुटुंबीयांनी विरोध केला होता. पण आता त्यांना हे गाव फार आवडते. आजही रथ यात्रेसारखे अनेक समारंभ हिंदू-मुस्लीम एकत्र साजरे करतात. ही रथ यात्रा मुस्लिमांच्या भागातून सुरू होते आणि त्यात हिंदूही सहभागी होतात," असं ते सांगतात.

भटकळमध्ये 1993 साली दंगल झाली होती. पण तेव्हापासून आजपर्यंत इथल्या हिंदू-मुस्लीम समाजामध्ये समन्वयाचं वातावरण आहे.

भटकळचे हिंदू असो किंवा मुस्लीम प्रत्येकालाच गावाच्या बदनामीपासून सुटका हवी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)