ग्राउंड रिपोर्ट : मेरठमधल्या दलितांच्या 'हिट लिस्ट'मागचं सत्य

  • प्रशांत चाहल
  • बीबीसी प्रतिनिधी
गोपी पारिया

फोटो स्रोत, PRASHANT PARIYA

फोटो कॅप्शन,

गोपी पारिया

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातल्या शोभापूर गावात कथित 'हिट लिस्ट' जाहीर झाल्यानंतर एका दलित युवकाची हत्या करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी त्याच्या अस्थींचं विसर्जन गंगेत करण्यात आलं.

ज्या दलित युवकांनी भारत बंद आंदोलनात उत्साहानं सहभाग घेतला होता, त्यांना अद्दल घडवण्यासाठी ही हिस्ट लिस्ट तयार करण्यात आली, अशा बातम्या आल्या होत्या.

स्मशान शांतता असलेल्या शोभापूर गावात पीएसीचे (प्रोविंशियल आर्म्ड कॉन्स्टेब्यूलरी) ट्रक गोपी भैयांच्या घराची ओळख करून देतात.

गोपी पारिया ज्यांना गावातले दलित लोक प्रेमानं गोपी भैय्या म्हणत. गावातल्याच गुर्जर समुदायाच्या लोकांनी त्यांची गोळी घालून हत्या केली होती.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 वरील मेरठ डेव्हलमेंट कॉर्पोरेशनअंतर्गत येणारं शोभापूर हे गाव दलित बहुल आहे. पण या घटनेनंतर गावातल्या दलितांमध्ये जितका राग आहे त्याहून अधिक भीती आहे.

आता थोडं भूतकाळात जाऊया...

जुन्या भांडणामुळे घडलेली ही घटना आहे, असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. 3 वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी दलित युवक गोपी पारिया यांनी गुर्जर समुदायाच्या मनोज आणि गुलवीर गुर्जर यांचं डोकं फोडलं होतं.

या घटनेत फौजदारी गुन्हा दाखल झाला नव्हता आणि गावच्या पंचायतीनं वातावरणार नियंत्रण मिळवलं होतं. गोपीच्या हत्येसाठी गावातल्या लोकांना ही घटना म्हणजे एक क्षुल्लक कारण वाटतं.

अशा घटना कधी ना कधी होत राहतात, पण या घटनेपूर्वी त्यांना जातीय हिसेंची किनार कधीच नव्हती.

गावात दलितांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस तैनात आहेत.

पोलिसांचा फौजफाटा दलितांच्या सुरक्षेसाठी आहे का? असं आम्ही एकाला विचारलं.

"जाटव लोकांमध्ये प्रचंड राग आहे. ते सवर्णांवर हल्ला करू नयेत म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ते आमचं नाही तर त्यांचं रक्षण करत आहेत," असं त्यानं सांगितलं.

भारत बंददरम्यान काय झालं?

2 एप्रिल रोजी देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आला होता. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 वर शोभापूर गावातले 25 ते 30 युवक निदर्शन करत होते.

गोपी त्यांचं नेतृत्व करत होता. गोपी आणि त्याचे वडील ताराचंद पारिया बहुजन समाज पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. ताराचंद यांनी बसपाच्या तिकीटावर दोनदा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आहे.

"भारत बंददरम्यान आमचं निदर्शन एकदम शांततेनं सुरू होतं. पण पोलिसांनी जातीवाचक शब्दांचा वापर करत लाठीचार्ज सुरू केला," असं ताराचंद सांगतात,

त्यानंतर हिंसाचार भडकला. यूपी रोडवेजची एक बस जाळण्यात आली. शोभापूरची पोलीस चौकी आगीत भस्मसात झाली. वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि दुकानांवर हल्ला करण्यात आला.

हिंसाचार भडकावणारे बाहेरचे लोक होते असा दलितांचा दावा आहे. पोलिसांच्या मते, "हिंसेला गावातलेच लोक कारणीभूत आहेत."

"हिंसाचार भडकला तेव्हा हत्यारं आणि दगड घेऊन आम्ही दलितांना रोखलं. कारण आमची दुकानं आणि वाहनांचं नुकसान होत होतं," असं गावातल्या सवर्णांचं म्हणणं आहे.

गोपीच्या हत्येत मुख्य आरोपी असलेल्या मनोज गुर्जरचे मोठे भाऊ ओमवीर सिंह गुर्जर काही दुकानदारांचं नाव घेऊन सांगतात की, "दलितांनी त्यांची दुकानं लूटली. दलितांनी महिलांसोबत गैरवर्तनही केलं. म्हणून त्यांना थांबवणं गरजेचं होतं."

...त्यानंतर बनली यादी?

हत्येचा आरोप असलेल्या कपिल राणा याचे मोठे भाऊ ओमवीर सिंह गुर्जर यांनी सांगितलं, "भारत बंदच्या रात्री झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. गावातल्या गुर्जर, ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांनी कथितरित्या गावातल्या एका मंदिराजवळ मीटिंग केली. काही जणांकडून पुरावे गोळा करून आणि ज्यांच्यावर संशय होता अशांची एक यादी बनवण्यात आली."

फोटो कॅप्शन,

मनोज गुर्जरचे मोठे भाऊ ओमवीर सिंह गुर्जर.

त्यांच्या मते, "आम्ही ती यादी पोलिसांना देणार होतो. दलित समाजातल्या उपद्रवी लोकांची यादी, असं त्या यादीचं शीर्षक होतं. यात दलित तसंच मुस्लीम समाजातल्या जवळजवळ 100 लोकांची नाव होती."

पण ही यादी पोलिसांपर्यंत पोहोचण्या अगोदरच व्हाट्सअॅपवर पसरवण्यात आली आणि यामुळे ती दलितांपर्यंत पोहोचली.

"3 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ही यादी आमच्या सर्व मुलांजवळ होती," दलित वस्तीत राहणारे वृद्ध राजेंद्र कुमार सांगतात.

"ही यादी पोलिसांनी जाहीर केली आहे आणि यानंतर पोलीस छापा टाकतील असं सर्वांना वाटलं. दलित युवकांनी आपापलं नाव यादीत चेक केलं आणि ज्यांची नावं यादीत होती ते घर सोडून पळून गेले," कुमार पुढे सांगतात.

दलितांचीच यादी का?

शोभापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर आणि दलित लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये अशा प्रकारच्या याद्या सोशल मीडियावरून पसरवण्यात येत आहेत.

दलित युवकांच्या अटकेसाठी पोलीस शोभापूरसोबतच दायमपूर, डाबका, मीरपूर, रोहटा आणि फाजलपूर या गावांमध्ये छापे टाकत आहेत आणि त्यामुळे गावांमधले दलित युवक फरार आहेत.

फोटो कॅप्शन,

गोपीचे लहान भाऊ प्रशांत पारिया.

"याप्रकारच्या कोणत्याही यादीशी उत्तर प्रदेश पोलिसांचा काहीएक संबंध नाही," असं मेरठचे एसएसपी मंजिल सैनी यांनी स्पष्ट केलं आहे. पण पोलिसांच्या एफआयआरमध्ये आलेली नावं ही सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या यादीशी साधर्म्य राखणारी आहेत.

यामुळेच उत्तर प्रदेशची पोलीस यंत्रणा सर्वणांच्या इशाऱ्यावर काम करते, असा इथल्या दलितांचा आरोप आहे.

गोपी पारिया यांचा चुलत भाऊ अरूण पारिया रिअल इस्टेट कंपनीमध्ये कामाला आहे. कंकरखेडा पोलीस स्थानकात युवकांना पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीचा व्हीडिओ दाखवत ते सांगतात, "योगी सरकारच्या काळात पोलीस खूपच आक्रमक आहेत. किती एनकाऊंटर होत आहेत. अशाप्रकारे मारहाण करण्यात येत आहे. यादीतल्या नावावरून आम्हाला घेऊन गेले तर खूपच मारतील. आमच्या प्रकरणाची सुनावणीसुद्धा होणार नाही. याच भीतीपोटी अनेक युवक फरार आहेत."

हत्या कशी झाली?

2 तारखेनंतर गोपी घराबाहेरच होता. 4 तारखेला दुपारी तो कपडे बदलण्यासाठी घरी आला होता. रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आणि आरोपी कपिलचे वडील सुखवीर सिंह यांनी सांगितलं, "हिंसाचाराच्या घटनेत साक्ष देऊ नको असं गोपीनं माझ्या मुलाला सागितलं होतं. यामुळे दलितांच्या समस्येत वाढ होत आहे, असं त्याचं म्हणणं होतं."

फोटो कॅप्शन,

मी बरा होईल, असं गोपीनं आईला सांगितलं होतं.

"मनोज गुर्जर यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे, असं सांगत गावातलाच सुनील नावाचा मुलगा गोपीला बोलवायला आला होता," असं गोपीचे वडील ताराचंद सांगतात. याच मनोजला 3 वर्षांपूर्वी गोपीनं मारहाण केली होती.

या नंतर सव्वा चार वाजता गावात गोळीबाराच्या चार राऊंडचा आवाज घुमला. गावातल्या श्रीराम विहार कॉलनीजवळील मंदिर परिसरात गोपीवर गोळ्या चालवण्यात आल्या. गोळ्या लोगल्यानंतर गोपी घराकडे पळत सुटला. जवळपास 200 मीटर धावल्यानंतर तो खाली पडला आणि दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

"बसपा आणि समाजवादी सरकारच्या काळात दलितांनी गुर्जरांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी सहाय्य केलं होतं आणि दोन्ही समाज एकमेकांसोबत होते," असं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे. पण 4 एप्रिलच्या सूर्यास्तानंतर गावातलं राजकीय आणि सामाजिक समीकरण बदललं.

गोपी पारिया कोण होता?

शोभापूरची लोकसंख्या 6 हजारहून थोडीशी जास्त आहे. इथे गुर्जर समुदायाचे 200 पेक्षा कमी मतं आहेत. मुस्लीम, पाल, वाणी आणि ब्राह्मण लोकंही गावात आहेत. दलितांची संख्या सर्वांत जास्त आहे. दलितांच्या एकूण 3 वस्त्या असून तीनही महामार्गा नजीक आहेत. पहिली वस्ती कारागीरांची आहे ज्यांचं हातावर पोट आहे.

फोटो स्रोत, PRASHANT PARIYA

दुसरी रईया वस्ती असून तिथं चामड्यांना रंगरंगोटी करणारे लोक राहतात. खेवा ही तिसरी वस्ती असून इथले लोक ब्राह्मण, गुर्जर आणि वाणी लोकांकडे मजूरी करतात.

कारागीरांची वस्ती इतरांच्या तुलनेत समृद्ध आहे. इथले काही लोक आता व्यापारही करत आहेत. 27 वर्षांचा गोपी यापैकीच एक होता.

मेरठ शहर खेळांच्या सामग्रीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बॅडमिंटन विणण्याचं कंत्राट गोपीनं घेतलं होतं.

दलित समाजात गोपीची प्रतिमा खूपच चांगली असल्याचं सांगितलं जातं. समाजासाठी काम करणारी गोपीसारखी मुलं कमीच असतात, असं गोपीच्या आई-वडिलांचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांमधले बहुतेक लोक म्हणत होते. पण गुर्जर वस्तीत मात्र गोपीबद्दल वेगळेच सूर ऐकायला मिळत होते. जसं की, "वाया गेलेला होता तो मुलगा आणि शिंगं फुटली होती त्याला. त्याला मरणं भागच होतं. आमच्या नाही तर दुसऱ्या कुठल्या मुलानं त्याला ठार केलं असतं."

गोपी नंतर...

गोपीच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. मुलाच्या आठवणीत गोपीच्या आईचा श्वास रोखला जातो.

या प्रकरणात अटक झालेले 4 आरोपी मनोज गुर्जर, कपिल राणा, गिरधारी आणि आशिष गुर्जर यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी गोपीचे वडील करतात. चौकशी अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी लवकरच चार्टशीट दाखल करण्यात येईल, असं सांगितलं आहे.

यावर्षी आम्ही डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करणार नाही, असं इथल्या दलित समाजाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

"आम्ही गोपी नाही तर आमचा स्वत:चा चेहरा गमावला आहे," असं गावातली मुलं सोशल मीडियावरल्या दलित ग्रूपवर लिहित आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)