2 शिवसेना कार्यकर्त्यांचा खून : अहमदनगर राजकीय गुन्हेगारीचा अड्डा बनत आहे का?

  • निरंजन छानवाल
  • बीबीसी मराठी
झेंडा

फोटो स्रोत, Getty Images

अहमदनगरमध्ये शनिवारी संध्याकाळी शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. अहमदनगरमध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ लागलं आहे का? एका पोटनिवडणुकीत खून होतो, का आहे केडगाव इतकं प्रतिष्ठेचं?

अहमदनगरमधील केडगावच्या सुवर्णनगर भागात शनिवारी सांयकाळी शिवसेनेचे शहर उप-प्रमुख संजय कोतकर आणि पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोतकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तर ठुबे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.

महापालिकेच्या एका जागेसाठी केडगावला झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. ही पार्श्वभूमी या हत्येमागे आहे का? याविषयी चर्चा होत आहे.

या जागेवर काँग्रेसचे विशाल कोतकर हे विजयी झाले. तर शिवसेनेचे विजय पठारे पराभूत झाले. कोतकर आणि ठुबे यांच्या हत्येमागे या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, FACEBOOK/VASANT THUBE

फोटो कॅप्शन,

मृत वसंत ठुबे

घटनेमागे राजकीय पार्श्वभूमी

बीबीसी मराठीसाठी नाशिकहून काम करणारे प्रवीण ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शर्मा यांनी अहमदनगरच्या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेमागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, FACEBOOK/RANJAN KUMAR SHARMA

फोटो कॅप्शन,

रंजन कुमार शर्मा

"केडगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस होती. याच वादातून शनिवारी दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली."

"या प्रकरणी विद्यमान आमदारांसह इतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पहाटे एका आमदारासह 22 जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे", ते म्हणाले.

"या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांच्यासह 47 कार्यकर्त्यांची नावं निष्पन्न झाले असून काही आरोपी ताब्यात घेतले आहेत. बाकी आरोपींचा शोध चालू आहे," असं रंजनकुमार शर्मा म्हणाले.

न्यायालयाने आमदार संग्राम जगतापसह इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

केडगाव आणि राजकारण

महापालिकेच्या केडगाव वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत अशी घटना घडण्या इतकं या पोटनिवडणुकीचं महत्त्व का आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला.

फोटो स्रोत, FACEBOOK/KOTKAR

फोटो कॅप्शन,

मृत संजय कोतकर

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याविषयी दिव्य मराठीचे ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे यांना विचारले असता त्यांनी केडगावची पार्श्वभूमी सांगितली.

"केडगावच्या पोटनिवडणुकीत विशाल कोतकर हे विजयी झाले. कोतकरांचं या भागावर आधीपासून वर्चस्व आहे. केडगाव हे ग्राम पंचायतमध्ये असल्यापासून ते आता महापालिकेत समाविष्ट होईपर्यंत स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे."

"महापालिकेत आल्यावर या भागातून सहा नगरसेवक निवडून येऊ लागले. त्यात काँग्रेस आणि पर्यायाने कोतकर यांच्या व्यतिरिक्तही इतर पक्षाचं कुणी निवडून येऊ लागल्यानं वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली.

"काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होती. अगदी सहा-सात महिन्यांसाठीचं हे नगरसेवक पद असूनही काँग्रेसने ते प्रतिष्ठेचं केलं. संदीप कोतकर यांचे चुलत भाऊ विशाल कोतकर यांनाच पक्षाने तिकीट दिलं. त्यासाठी प्रचंड ताकद लावली."

"केडगाव परिसरात एका वॉर्डात शिवसेनेचाही एक नगरसेवक असल्याने माजी आमदार अनिल राठोड यांनीसुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांच्यासाठी हे राजकारणातील कमबॅक असल्यासारखं असल्याचं म्हटलं जातं. त्यांनीही या निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली."

"मतदानाच्या दिवशी शुक्रवारी वादावादी झाली होती. विजयी उमेदवार अतिशय कमी फरकानं निवडून आला. त्यानंतर शनिवारी ही घटना घडली. केडगावावर वर्चस्व कुणी ठेवायचं यातून ही घटना घडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं", असं बेंडाळेंचं मत आहे.

गावठी कट्टे आले कुठून ?

"शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा जिथं खून झाला ते त्या भागात राहत नाही. ते जुन्या गावात राहतात. केडगावला पोलीस स्टेशन असूनही घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना उशीर झाला. यात सर्वांत गंभीर बाब अशी आहे की मारेकऱ्यांकडे गावठी कट्टे कुठून आले. पोलिसांचं काहीच नियंत्रण नाही का? अहमदनगरसाठी अशी परिस्थिती खरंतर धोकादायक म्हणावी लागेल," असं मिलिंद बेंडाळे म्हणाले.

आतापर्यंत कुणाला झाली अटक?

या हत्येप्रकरणात संदीप गुंजाळ नावाचा तरुण रात्री पारनेर ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याने हे खून केल्याची कबुली दिली असली तरी पोलिसांकडून मात्र त्याचा या हत्याकांडाशी काही संबध आहे का हे तपासलं जात आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/SANGRAM JAGTAP

फोटो कॅप्शन,

आमदार संग्राम जगताप

या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांचीही नावं आहेत.

दुसरीकडे या प्रकरणात शनिवारी रात्रीच पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते. रविवारी पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली.

तसंच विजयी उमेदवाराचे वडील बाळासाहेब कोतकर यांच्यासह संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यासह एकूण 50 जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणात 250 ते 300 कार्यकत्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

अहमदनगर शहरात प्रॉपर्टीच्या व्यवहारात अनेक स्थानिक राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. भूखंडाच्या व्यवहारातून अनेक घटना घडतात, असं नगर लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.

फोटो स्रोत, Shahid Shaikh

फोटो कॅप्शन,

घटनास्थळावरचं दृष्य

"राजकीय नेत्यांचे आशीर्वाद आणि पोलिसांची बघ्याची भूमिका यातून गुन्हेगारीकरणाला वाव मिळतो. शहरी भागात प्रॉपर्टीत राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांनी शिरकाव केला आहे. तर ग्रामीण भागात वाळू हे राजकारण्याच्या केंद्रस्थानी आहे. अवैध धंद्यांना आश्रय देण्याच्या नादात गुन्हेगारीच्या घटना घडतात," असं लंके म्हणाले.

"काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप कोतकर हे खुनाच्या एका प्रकरणात आधीच शिक्षा भोगत आहेत. हे राजकीय गुन्हेगारीचं एक उदाहरण आहे," असं त्यांनी सांगितलं

हे सांगत असताना लंके यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वळवलं. कुठल्याही घटनेत दोन्ही बाजूनं राजकारण केलं जातं. आताही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करत असल्याचं लंके म्हणाले.

अहमदनगरमधील राजकीय नातीगोती

नगर जिल्ह्यात राजकीय घराणी आहेत. या घराण्यांमध्येच नातीगोती असल्याने या जिल्ह्याचं राजकारण त्या घराण्यांभोवतीच फिरतं.

सुधीर लंके यांना नगरमधील राजकारणाविषयी विचारलं असता त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ही घराणेशाही आणि नातीगोती बघायला मिळत असल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Shahid Shaikh

फोटो कॅप्शन,

घटनेनंतर पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

"ही राजकीय घराणी एकमेकांच्या नात्यात येतात म्हणजे सगळ्यांचीच पार्श्वभूमी वाईट आहे किंवा गुन्हेगारीची आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. प्रत्येकाचं राजकारण वेगळं आहे.

अहमदगनर जिल्ह्यातील विखे आणि थोरात हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी घराणी आहेत. शहरामध्ये कोतकर-जगताप-कर्डिले हे नात्यात आहेत. ग्रामीण भागात थोरात-राख-राजळे आणि घुले-तनपुरे-काळे हे नात्यात आहे. यातील काही घराणी एकाच पक्षात तर काही वेगवेगळ्या पक्षात आहेत, अशी माहितीही सुधीर लंके यांनी दिली.

घटनेनंतर शिवसेना आक्रमक

शिवसैनिकांच्या हत्येनंतर शनिवारी सांयकाळी सुवर्णनगर परिसरात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं.

फोटो स्रोत, Shahid Shaikh

फोटो कॅप्शन,

माजी आमदार अनिल राठोड व शिवसैनिक

संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांना घटनास्थळावरून मृतदेह उचलून नेण्यास मज्जाव करण्यात आला.

शिवसेनातर्फे 'जिल्हा बंद'ची हाक देण्यात आली होती. रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. शहरात शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या नेत्यांनी अहमदनगरला भेट देत पत्रकार परिषद घेतली. हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा या हत्यांकाडामागे हात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्याची माहिती एबीपी माझानं दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी झी 24तासशी बोलताना, ही घटना राजकीय वादातून नव्हे तर भावकीच्या वादातून घडल्याचं सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)