#BBCShe : 'मला जाणून घ्यायचय कट्टरवादी कसे तयार होतात'

जालंधर

जालधंरमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या स्वप्नाआड कोण येत आहे?

जालधंर शहर लहान असलं तरी इथल्या मुलींची स्वप्न मात्र मोठी आहेत. BBCSheच्या चर्चेदरम्यान दोआबा कॉलेजमध्ये भेटलेल्या या मुली पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.

वय जरी 22-23 वर्षं असलं तरी त्यांची वेगवेगळ्या मुद्द्यांवरची समज खोल आहे. त्यांना जाणून घ्यायचं आहे की एक सामान्य माणूस कट्टरवादी का होतो किंवा सुनावणीदरम्यान जेलमध्ये कैदेत असलेल्या आरोपीला काय वाटत असेल?

पण शिक्षणाबरोबरच नोकरी करत असलेल्या या मुलींच्या मते त्यांना मात्र शिक्षण आणि महिलांसंदर्भातल्या विषयांचीच कामं सांगितली जातात.

त्या हिंदी आणि पंजाबी भाषेतली वृत्तपत्र आणि वेबसाइट्समध्ये काम करतात.

"हे तुझ्यासाठी नाही असं मला सांगितलं जातं. ते राहू दे असं म्हणून एखादं प्रसिद्धी पत्रक करण्यासाठी हातात दिलं जातं."

जालधंरमध्ये अनेक मीडिया कंपन्यांची कार्यालयं आहेत. एवढचं नव्हे तर या शहराला पंजाबमध्ये न्यूज मीडियाचा बालेकिल्लाही म्हटलं जातं.

पण या कार्यालयांमध्ये महिलांची संख्या फारच कमी आहे. कुठं शंभर लोकांच्या टीममध्ये दहा तर कुठं साठ लोकांच्या टीममध्ये चारच महिला काम करतात.

विद्यार्थिनींशी बोलल्यानंतर काही प्रमाणात त्यांची तक्रार रास्त वाटली.

क्राईम, राजकारण किंवा शोध पत्रकारितेसाठी वेळी-अवेळी बाहेर पडावं लागतं. तसंच वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतं. जे मुलींसाठी चांगल समजलं जातं नाही.

कित्येक तास काम करायचं आणि तेही अल्प पगारात, त्यांच्या कुटुंबीयांनाही ते आवडत नाही.

सर्वसामान्यपणे असा समज आहे की, मुली शिक्षण पूर्ण केल्यानंतर फारफार तर काय दोन-तीन वर्षं काम करतील आणि नंतर त्यांच लग्न होईल.

म्हणजे मुली त्यांच्या करिअर विषयी गंभीर नाहीत. ती एक तात्पुरती व्यवस्था आहे. एक हौस आहे, जी पूर्ण झाल्यावर त्या पुढच्या मार्गाला लागतील.

त्यामुळेच अनेक संपादकांच्या दृष्टीने महत्त्वाचं, जबाबदारीचं काम हे फक्त पुरूषांना देणं चांगलं ठरतं.

पण अशा गोष्टी तर वीस वर्षांपूर्वी ऐकायला मिळत होत्या. त्यानंतर काहीच बदललं नाही का?

मोठ्या शहरांमध्ये किंवा इंग्रजी भाषेत कार्यरत असलेल्या मीडिया कंपन्यांमध्ये वातावरण फार वेगळं आहे. महिलांना जास्त संधी उपलब्ध होतात. तसंच आवडीच्या क्षेत्रासाठी किंवा कामासाठी त्या हक्कानं लढू शकतात.

पण जालधंरमध्ये प्रादेशिक भाषांच्या मीडियात काम करणाऱ्या पत्रकार सांगतात की, त्यांची संख्या कमी असल्यानं निर्णय घेताना त्यांची भूमिका तोकडी पडते.

काहीच बदलं झाला नाही असं म्हणता येणार नाही. वीस वर्षांपूर्वी शंभर लोकांच्या न्यूजरुममध्ये एक-दोनच महिला असायच्या. आता किमान दहा तरी आहेत. असं असलं तरीसुद्धा हे प्रमाण फारच कमी आहे.

जालधंरमध्ये सहा विद्यापीठं आहेत. प्रत्येक ठिकाणी पत्रकारितेचं शिक्षण दिलं जातं. यातील काहींमध्ये तर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.

पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीमध्ये हेच गुणोत्तर अगदी व्यस्त आहे.

एका विद्यार्थिनीनं आम्हाला सांगितलं, "आई म्हणते हे असं कुठलं काम करते तू. उन्हात भटकत असते. विशेष असा पगारही मिळत नाही. त्यापेक्षा शिक्षकाची नोकरी चांगली. तुझ्याशी लग्न कोण करणार?"

पण या विद्यार्थिनींना पालकांच्या विचारांची तेवढी चिंता नाही जेवढी मीडियातल्या रुढीवादी वागणुकीबद्दलची आहे.

त्या म्हणतात, "पत्रकारांविषयी हे ऐकलं होतं की ते खुल्या विचारांचे असतात. जगाच्या पुढे चालणारे असतात. पण असं तर कुणी भेटलं नाही."

"महिलांच्या मुद्द्यांवर आवाज उठवणारे, त्यावर लेख लिहणारे स्वतः काय करत आहेत. त्यांनी विचार केला पाहीजे."

हे सगळं ऐकून जालंधरमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या एका जेष्ठ महिला पत्रकार म्हणाल्या,"स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही स्वतःला महिला आणि आपल्या संपादकाला पुरूष असल्याच्या दृष्टीकोनातून पहायला लागणार नाही. आपण सगळे पत्रकार आहोत. स्वतःच्या हक्कांसाठी लढणं स्वतःच्याच हातात आहे."

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)