कॉमनवेल्थ गेम्स 2018 : पिस्तूल किंग जितू रायचा सुवर्णवेध!

जितू राय Image copyright Getty Images

पिस्तूल किंग अशी बिरुदावली मिळवणाऱ्या नेमबाज जितू रायनं कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. भारताच्याच ओम मिथरवालनं याच प्रकारात कांस्यपदक मिळवलं.

नेपाळमधल्या संखुवासभा नावाच्या छोट्याशा गावातल्या जितूला नेमबाजी नावाचा खेळ असतो याची कल्पनाही नव्हती. जितूचे वडील भारतीय सैन्यात होते. चीन आणि पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता.

विसाव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जितूनं भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. जितूला प्रत्यक्षात ब्रिटिश सैन्यात जायचं होतं. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

ब्रिटिश सैन्यात नेपाळमधल्या गुरखा समाजातील व्यक्तींना घेतात. 200 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. 2006-07 मध्ये जितू सैन्यभरतीसाठी आला होता. मात्र ब्रिटिश सैन्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली नव्हती. मात्र त्याचवेळी भारतीय सैन्यासाठीची भरती सुरू होती. जितूनं सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि तो भारतीय सैन्याचा भाग झाला.

जितूचं पोस्टिंग लखनौ येथे झालं होतं. नेमबाजीत प्राविण्य असूनही खेळ म्हणून कारकीर्द तसंच व्यावसायिक करिअर म्हणून याकडे पाहण्याचा विचार जितूच्या डोक्यातही नव्हता.

Image copyright Getty Images

मात्र लष्करातील वरिष्ठांनी जितूची नेमबाजीतील कौशल्य हेरत त्याला मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिट येथे पाठवलं.

परंतु जितूला याठिकाणी आपली छाप उमटवता आली नाही. अपेक्षित कामगिरी करता न आल्यानं जितूला या केंद्रातून दोनदा परत पाठवण्यात आलं. परंतु जितूनं हार मानली नाही आणि आपल्या नेमबाजी कौशल्यांवर काम करायला सुरुवात केली.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये यशस्वी झाल्यानंतर जितूनं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. 11 गोरखा रायफल्स रेजिमेंटचा भाग असलेल्या नायब सुभेदार जितूनं स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 50 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेही जितूनं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जितू राय

2014 मध्ये नेमबाजी विश्वचषकात नऊ दिवसांच्या अंतरात जितूनं तीन पदकं पटकावली. पदकं मिळवतानाच जितूनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. दैदिप्यमान प्रदर्शनामुळे जितूकडून अपेक्षा वाढल्या.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जितू पदकाचा प्रमुख दावेदार होता. मात्र जितूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑलिंपिक अनुभवानं खचून न जाता जितूनं नेमबाजी विश्वचषकात कांस्यपदक मिळवलं.

सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी जितू रायला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी जितूची आई नेपाळहून दिल्लीला आली होती. त्यावेळी जितूच्या नेमबाज म्हणून दमदार कारकीर्दीबाबत आईला सविस्तर कळलं.

लष्करातली नोकरी आणि नेमबाजीतील करिअर यामुळे जितूला नेपाळमधल्या आपल्या गावी जाण्याची संधी अभावानंच मिळते. दिल्ली किंवा लखनौहून दार्जिलिंगमधल्या बागडोगरालाला जावं लागतं. तिथून गावी जायला दोन-तीन दिवस लागतात.

नेमबाजीतील दिमाखदार कामगिरी करणाऱ्या जितूमुळेच गावात सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत. काही वर्षांपूर्वीच जितूच्या गावात वीजपुरवठा सुरू झाला आहे. नेमबाजीव्यतिरिक्त जितू अभिनेता आमिर खानचा चाहता असून त्याला व्हॉलीबॉल खेळायलाही आवडतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)