#5मोठ्याबातम्या : राज्यात आजही पावसाची शक्यता

Image copyright AFP

आजच्या वर्तमानपत्रांतील आणि विविध वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. राज्यात आजही पाऊस

महाराष्ट्रात आजही काही भागांत पावसाचा शिडकाव होणार असल्याचे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

केंद्रीय हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला आहे. मागील तीन दिवस राज्यातल्या काही भागात पाऊस पडत आहे. आज आत्र पावसाचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे. सोमवारी विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

2. रामसेतू संशोधन प्रकल्प गुंडाळला

रामसेतू मानवनिर्मित आहे की नैसर्गिक याचा शोध घेण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन मंडळ त्यांचा निधी देणार नाही. तसंच त्यांनी कोणतही संशोधन हाती घेण्याचं ठरवलेलं नाही, अशी बातमी लोकसत्तानं दिली आहे.

Image copyright NASA

परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी ही माहिती दिली आहे. उत्खनन किंवा तत्सम कामं इतिहासकारांची नसतात, त्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आहे, यात इतिहास संशोधन परिषद शिफारस करू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

तत्कालीन अध्यक्ष वाय. सुदर्शन राव यांनी सैद्धांतिक परिक्षण करून नंतर शोध प्रकल्प राबवला जाईल, असं म्हटलं होतं, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. आठवले यांच्या अंगावर टाकला काळा झेंडा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अंगावर काळा झेंडा टाकण्याची घटना सुरतमध्ये घडली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये देण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

'दलितांवर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारणात व्यग्र आहेत,' असा आरोप करत दलित तरुणानं हे कृत्य केल्याचं या बातमीत म्हटलं आहे. आठवले यांनी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी हा प्रकार घडला.

4. मोदींचा वाराणसीत धुव्वा उडेल : राहुल गांधी

सर्व विरोधक एकत्र आल्यास लोकसभा निवडणूक जिंकणं तर सोडाच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीमधली जागादेखील राखता येणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

बेंगलुरूत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली, असं लोकमतनं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त करत उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत असल्याकडे लक्ष वेधल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

5. स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाजाचा औरंगाबादमध्ये मोर्चा

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी औरंगाबादमध्ये रविवारी मोर्चा काढण्यात आला.

शहरातल्या क्रांती चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप विभागीय कार्यालयावर झाला. याच मागणीसाठी दिल्लीतही मोर्चा काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एबीपी माझंनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)