सोशल - 'कॉमनवेल्थ देशाला मान मिळवून देणारी स्पर्धा तर IPL हा व्यापार'

कॉमनवेल्थ गेम्स VS IPL Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॉमनवेल्थ गेम्स VS IPL

एकीकडे कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे खेळाडू मेडलवर मेडल पटकावत आहेत, तर दुसरीकडे IPLचा सीझन सुरू झाला आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सोमवार संध्याकाळपर्यंत 10 सुवर्णपदकं, 4 रौप्यपदक आणि 5 कांस्यपदक, अशा एकूण 19 पदकांवर भारताचं नाव कोरलं गेलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपरकिंग्ज यांनी प्रत्येकी एक एक मॅच जिंकली आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आम्ही वाचकांना विचारलं होतं की ते काय फॉलो करत आहेत आणि का.

त्यात काहींनी कॉमनवेल्थ गेम्सच्या बाजूने आपलं मत नोंदवलं आहे, तर काहींनी IPLची मजा घेत आहेत.

Image copyright Facebook

यामध्ये सुषमा पेडनेकर म्हणतात, "कॉमनवेल्थ गेम्स ही देशाला मान मिळवणारी स्पर्धा आहे. IPL हा व्यापार आहे. करमणूक दोघेही करतात पण अभिमान तिरंगा जिथे फडकतो तिथे होतो."

तर तुषार राऊत यांनी दोन्ही खेळ भारी आहेत, आणि सगळ्या खेळाडूंना खेळताना बघायला मजा येते, असं म्हटलं आहे. तसंच, कॉमनवेल्थ गेम्स पहाटे सुरू होऊन सायंकाळपर्यंत संपतात आणि IPL रात्री सूरू होते, त्यामूळ दोन्ही माझी पसंती आहे, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

Image copyright Facebook

उन्मेष मनोहर यांची पसंती कॉमनवेल्थ गेम्सला आहे. कारण "त्या खेळांमध्ये देशासाठी मिळणारे पदक IPLमधल्या कोटी कोटी रुपयांपेक्षा अधिक मौल्यवान आहेत," असं त्यांना वाटतं.

Image copyright Facebook

"IPL वरचा विश्वास उडालाय मॅच फिक्सिंग मुळे. तसाही तो खेळ पैसे देऊन खेळवला जातोय. त्यापेक्षा वेगवेगळे खेळ असणारा कॉमनवेल्थ बरा," असं सचिन होडे सांगतात. "देशाला पदकं मिळतात त्याचा अभिमान वेगळाच, IPL दरवर्षी खेळवला जातो त्यामुळे त्याच कौतुक ही वाटत नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"मी क्रिकेट फॅन असल्यामुळे IPL पाहतो. परंतु CWG ही देशाला अभिमान मिळवून देणारी स्पर्धा आहे. त्यामुळे मी त्याकडेही लक्ष देतो," अशी प्रतिक्रिया गोपाल राजपूत यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

गोपाल राजपूत यांच्या कमेंटवर प्रतिक्रिया देत विशाल निकम म्हणतात, "कॉमनवेल्थचा अर्थ काय ते आधी पहा. पूर्वी सर्व जगात ब्रिटिशांची सत्ता होती. त्यांच्या अंकित असणाऱ्या देशांमध्ये ते क्रीडा स्पर्धा घेऊ लागले. त्या देशातील संपत्ती वर ब्रिटिशांची मालकी होती. पण आपण काय कॉमनवेल्थ आहोत का? भारताने कॉमनवेल्थमध्ये सहभागी होऊ नये, आपण कोणाचेही गुलाम नाही."

त्यावर गोपाल राजपूत म्हणतात, "इतर देश त्यात सहभागी होत आहेत, ते काही ब्रिटिश राजवटीखाली नाहीत. CWG ला खेळाडूंना मिळणारं व्यासपीठ म्हणून पाहिलं पाहिजे."

Image copyright Facebook

संपत मंडलीक, अनिकेत ठाकूर, दत्ताराम वाळवकर आणि वर्षा कासूल्लकर यांनी कॉमनवेल्थ गेम्सच्या बाजूने मत नोंदवलं आहे.

Image copyright Facebook

तसंच, सचिन तायडे यांनी ट्विटरवरून आपलं मत नोंदवलं आहे. ते म्हणतात, "क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट करून कसं चालेल? इतर खेळांनाही अशाच पाठिंब्याची गरज आहे आणि मिळणाऱ्या पाठिंब्याचं रूपांतर हे पदकांत दिसून येतं. कालचा रविवार तर सोनेरी करून टाकला आपल्या खेळाडूंनी. त्यांनाही क्रिकेट सारख्याच पाठिंब्याची गरज आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)