कॉमनवेल्थ गेम्स 2018 : सुवर्ण'हिना'! 25 मीटर पिस्तूल प्रकारात अव्वल

हिना Image copyright Getty Images

हिना सिधूने 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरले. अटीतटीच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालिनाबोव्हिचला मागे टाकत हिनाने बाजी मारली. याच प्रकारात भारताच्या अनू सिंगला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हिजाबला नाही म्हणणारी हिना कशी ठरली शूटिंग स्टार अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


50 मीटर रायफल प्रोन प्रकारात चैन सिंगचं पदक अगदी थोड्या फरकानं हुकलं. 204.8 गुणांसह चैनने चौथे स्थान पटकावलं. 2014 मध्ये चैनने याच प्रकारात इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं होतं.

त्याचवर्षी कुवैत येथे झालेल्या सातव्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत चैननं सुवर्णपदकाची कमाई केली होती.

Image copyright Getty Images

2016 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत चैननं सहा सुवर्णपदकांवर नाव कोरलं होतं. पात्रता फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या चैननं अंतिम फेरीतही सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं.

मात्र एलिमिनेशन राऊंडमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकानं त्याचं पदक हुकलं. दरम्यान 34 वर्षीय अनुभवी नेमबाज गगन नारंगला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं मलेशियाला 2-1 असं नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतातर्फे हरमनप्रीतनं तिसऱ्या मिनिटाला गोल केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय हॉकी संघ

दहाव्या मिनिटाला फैझल सारीच्या गोलसह मलेशियानं 1-1 बरोबरी केली. हरमनप्रीतनं पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत दुसरा गोल केला. भारतानं ही आघाडी कायम राखत विजय मिळवला.

सलामीच्या लढतीत भारतानं वेल्सवर विजय मिळवला होता तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)