#5मोठ्याबातम्या : छोले भटुऱ्यांनी खाल्लं राहुल गांधींच्या उपोषणाचं क्रेडिट

राहुल गांधी Image copyright Getty Images

आजची वृत्तपत्रे आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. राहुल यांचं उपोषण, माकन यांचे छोले भटुरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार दलित विरोधी असल्याची टीका करत काँग्रेसनं पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोमवारी देशव्यापी लाक्षणिक उपोषणाचं आवाहन केलं होतं.

इकॉनॉमिक टाइम्सन ही बातमी दिली आहे. बातमीमध्ये म्हटले आहे की सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 यावेळेत हे उपोषण होणार होतं, पण राहुल गांधी या उपोषणात दुपारी 1 वाजता सहभागी झाले. परिणामी तोपर्यंत कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला होता.

राहुल गांधी यांनी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर हे उपोषण केलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते अजय माकन, अरविंदसिंग लव्हली आणि हारूण युसूफ एका हॉटेलमध्ये छोले भटुरे खात असल्याचा फोटो व्हायरल झाल्याचही या बातमीत म्हटलं आहे.

तसंच जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना उपोषण स्थळावरून परत पाठवण्याच वृत्त आलं.

2. बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी

बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या 13 वर्षांच्या मुलीला 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यासाठी परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे.

न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढले असून अशी प्रकरणं कशी हाताळावीत याबाबत मार्गदर्शिका नसेल तर ती तातडीनं बनवण्याचे आदेश दिले आहेत. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

कल्याण जवळच्या हाजी मलंग येथून या मुलीचं गेल्या वर्षी अपहरण झाले होतं. उत्तर प्रदेशातून या मुलीची सुटका करण्यात येऊन संशयिताला अटक करण्यात आली आहे.

17 मार्चला करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत ही मुलगी गरोदर असल्याचं लक्षात आलं, पण ही बाबा पोलिसांनी तिच्या पालकांना कळवली नव्हती. जर तेव्हाच पोलिसांनी पालकांना या संदर्भात कल्पना दिली असती तर त्यावेळी गर्भपात करणं शक्य झालं असतं.

3. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 225 विमानांची उड्डाणे रद्द

पावसाळ्यापूर्वी करायच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुख्य धावपट्टी बंद ठेवावी लागल्यानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 225 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

Image copyright Getty Images

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. मुख्य धावपट्टी 2 दिवस बंद राहणार असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

4. आवडत्या व्यक्तीशी लग्न करता येणं जीविताच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा भाग

मुस्लीम धर्म स्वीकारलेली हादिया आणि शफीन जहान यांचं लग्न सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचा केरळ उच्च न्यायालयानं या दोघांचं लग्न रद्द ठरवण्याचा निर्णय रद्द केला आहे. इंडियन ने ही बातमी दिली आहे.

Image copyright SONU AV
प्रतिमा मथळा हादीया आणि शफीन

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी हा निर्णय दिला. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करणं हा घटनेतील कलम 21चा भाग आहे, असं निर्वाळा या निकालात देण्यात आला आहे.

हा निर्णय देत असतानाच सुप्रीम कोर्टानं राष्ट्रीय तपास यंत्रणेला तपास सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. पण या तपासाचं अतिक्रमण या लग्नावर होणार नाही, असं निकालात म्हटलं आहे.

5. आरक्षण विरोधात आज भारत बंद

आरक्षणाच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद पुकारण्यात कोणतीही मोठी संघटना सहभागी नसली तरी सोशल मीडियावर या बंदसाठीचं आवाहन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

गृहमंत्रायलानं या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या शिवाय सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दैनिक भास्करने ही बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)