कास्टिंग काऊच : 'हा रोल हवा असेल तर आमच्या काही 'फालतू अपेक्षा' आहेत!'

Reshma Ramchandra Image copyright Reshma/Facebook
प्रतिमा मथळा माझ्या भूमिकांनी मला खूप काही शिकवलं, असं रेश्मा म्हणतात.

त्या अनुभवाबद्दल बोलणं अजूनही मला नकोसं वाटतं, खूप मनस्ताप होतो. पण मी त्यावर बोलणं महत्त्वाचं आहे. 2016 मध्ये ती घटना घडली तेव्हा मी माध्यमांसमोर येऊन ठामपणे माझं म्हणणं मांडलं होतं. 'मला तुमच्याशी काही बोलायचं आहे', असा तो मेसेज होता. तेव्हा मी जे बोलले तेच पुन्हा बोलणार आहे.

खरंतर फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी नव्यानं मुंबईत आलेल्यांपैकी मी नाही. गेली 15 वर्षं मी मुंबईत राहतेय. सध्या मी 'तुझं माझं ब्रेक अप' या सीरियलमध्ये काम करतेय. त्याआधी 'देहभान', 'ठष्ठ' अशा नाटकांमध्ये मी भूमिका केल्या आहेत. त्यामुळेच एकेक टप्पा गाठत चित्रपटामध्ये काम करणं हे माझं स्वप्न होतं.

चित्रपटात काम करण्याची संधी आली तेव्हा म्हणूनच मी खूप उत्साहानं आणि त्याचा ध्यास घेऊन त्या युनिटमध्ये ऑडिशन द्यायला गेले. आता ती फिल्म रिलीज झालीय. त्यामुळे मी त्या फिल्मचं आणि फिल्मशी जोडलेल्या माणसांचं नाव सांगणार नाही.

भूमिकेसाठी 'फालतू अपेक्षा'

त्या चित्रपटातल्या एका व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शकाच्या समोर माझी ऑडिशन झाली. ऑडिशन चांगली झाली आणि मी त्या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे, असंही मला सांगण्यात आलं. माझा हा पहिलाच चित्रपट होता आणि मोठ्या पडद्यावर अवतरण्याची एक चांगली संधी मला मिळाली होती.

मी खूपच खूश झाले. माझ्या मानधनापेक्षाही मी त्या व्यक्तिरेखेचाच जास्त विचार करत होते. चित्रपटाच्या दृष्टीनं माझी मनातल्या मनात जोरदार तयारी चालली होती. आणि अशातच मी माझ्या मैत्रिणीकडे पुण्याला गेल्यावर या सगळ्याबद्दल मला एक धक्कादायक गोष्ट कळली.

Image copyright Reshma Ramchandra/Facebook
प्रतिमा मथळा आपण आहोत तसं व्यक्त होता आलं पाहिजे, असं रेश्मा यांना वाटतं.

मला जो रोल देण्यात आला होता त्यासाठी माझ्या मैत्रिणीनेही ऑडिशन दिली होती. हा रोल हवा असेल तर आमच्या काही 'फालतू अपेक्षा' आहेत, असं तिला सांगण्यात आलं होतं.

मला धक्काच बसला. जो रोल मी करणार होते त्यासाठी त्यांच्या काही 'फालतू अपेक्षा' होत्या आणि मी मात्र मनापासून त्या रोलची तयारी करत होते, मला संधी मिळाल्याच्या आनंदात होते.

माझ्या स्वप्नांवर एका क्षणात घाला आला होता. मी चिडले, दुखावले गेले, अपमानित झाले. मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. माझ्या मैत्रिणीला जे सांगण्यात आलं होतं ते ऐकून माझा त्यावर आधी विश्वासच बसत नव्हता. माझ्यासाठी हे सगळं सहन होण्याच्या पलीकडचं होतं. पण मी त्याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं.

सगळ्यांत आधी तर मी माझं ज्यांच्याशी बोलणं झालं होतं त्यांच्याकडे याबद्दल तक्रार केली. यावर, 'मी त्या माणसाला समजावून सांगतो', असं मला सांगण्यात आलं. पण मी ज्याच्याविरुद्ध तक्रार केली होती त्या माणसानं मला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला आणि 'डेट्स मॅच होत नाहीत म्हणून तू या चित्रपटात काम करणार नाहीस,' असं त्यानं सांगितलं. 'तुला काय करायचं ते कर,' असाही त्याचा उद्दाम सूर होता.

मी या सगळ्यामुळे खूपच संतापले आणि अशा माणसांसोबत पुन्हा कामच करायचं नाही, असा निर्णय घेऊन टाकला.

'इंडिसेन्ट प्रपोजल'

फिल्म इंडस्ट्रीमध्ये संधी मिळावी म्हणून धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे असे अनुभव येतात. आपण नवखे असतो तेव्हा आपल्याला अभिनय येतो तर कामही मिळेल, असं वाटत असतं. ती पॅशनही असते. काही जणींना इथलं ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा या गोष्टीही खुणावत असतात.

करिअरच्या नेमक्या याच टप्प्यावर याचा गैरफायदा घेणारे असतात. मग कामाच्या व्यतिरिक्त सलगी करणं, लंच आणि डिनर मीटिंगचे प्रस्ताव देणं हे सुरू होतं.

फिल्म इंडस्ट्रीत मोठं व्हायचं असेल तर कुणाचं तरी बोट धरून चालावं लागतं, अशा टिप्स दिल्या जातात. आधार म्हणून खांद्यावर हात ठेवायचा आणि त्याची पकड जास्त घट्ट करायची, असेही चित्रविचित्र अनुभव येतात.

'तुला तुझ्या फिगरवर काम करावं लागेल, वजन कमी करावं लागेल', अशा वाक्यांनी या 'इंडिसेन्ट प्रपोजल'ची सुरुवात होते.

Image copyright Reshma Ramchandra /Facebook
प्रतिमा मथळा 'आपल्याला असा अनुभव आला तर न घाबरता बोललं पाहिजे'

याच वेळी खूप अलर्ट असावं लागतं. समोरचा माणूस जे सांगतोय ते खरंच कामाशी संबंधित आहे की त्याच्या आपल्याकडून काही 'फालतू अपेक्षा' आहेत, ते ताडून घ्यावं लागतं.

एखादा माणूस प्रस्थापित आहे, हा आपल्याला पुढे जायला मदत करेल, अशा समजात आपण राहिलो तर फसगत व्हायची शक्यता असते.

आमच्या इंडस्ट्रीमध्ये असे खूपच धोके आहेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. कामासाठी काम असं तत्त्वं ठेवणारी माणसंही मला खूप भेटली. पण दिग्दर्शक, निर्मात्यांपेक्षाही, आपल्याला 'संधी देतो', असं दाखवणारी मधली माणसं धोकादायक ठरू शकतात, असं मला वाटतं.

'पब्लिसिटी स्टंट'चे आरोप

मी सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना, 'मला तुमच्याशी काही बोलायचंय' असे मेसेज पाठवले आणि याविरुद्ध उघडपणे बोलण्याची तयारी दाखवली.

आता माझं अभिनयाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव झालं आहे, पण तेव्हा मी फार नवखीही नव्हते आणि फार अनुभवीही नव्हते. त्यामुळेच मोजक्याच माध्यमांनी यावर माझ्या मुलाखती घेतल्या आणि माझं म्हणणं मांडण्यामध्ये मला साथ दिली.

मी याबद्दल बोलायचं ठरवलंच होतं त्यामुळे मी डगमगले नाही. पण तरीही माझ्या या मुलाखतीकडे संवेदनशीलपणे पाहणारे कमी होते.

काहीजणांना मी एस्टॅब्लिश होण्यासाठी केलेला तो पब्लिसिटी स्टंट वाटला. काहीजणांनी मला दुर्लक्ष करण्याचे सल्ले दिले. काही सीनिअर अभिनेत्री तर 'अगं हे असं होतंच... आम्हाला पण आलेत असे अनुभव.. त्यात काय एवढं'... असं सांगत होत्या.

Image copyright Reshma Ramchandra/Facebook
प्रतिमा मथळा अभिनेत्री रेश्मा रामचंद्र यांनी चित्रपटसृष्टीतल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला.

याबद्दल उघडपणे बोलल्यानंतरच्या दिवसात इतर कामांच्या ठिकाणी काही टोमणे ऐकायला मिळायचे. 'अरे बापरे.. जरा जपून राहिलं पाहिजे हां हिच्यापासून', हेही ऐकून घ्यावं लागलं. पण फक्त मीच नव्हे तर माझी कुणी मैत्रीण, सहकारी कलाकार यांना कुणालाच अशा प्रकारांना सामोरं जावं लागू नये, असं मला वाटत होतं.

तेव्हा मी मुंबईत एकटी राहायचे. माझ्या कुटुंबीयांना माझी काळजी लागून राहायची. तुला काही झालं तर काय... असं त्यांना वाटायचं. पण उलट याबद्दल बोलल्यानंतर माझी हिंमत वाढली होती. शिवाय अशा गोष्टींबद्दल बोललं तर आपल्याला कुणी कामच देणार नाही, अशी भीतीही मला कधीच वाटली नाही.

कलाकार म्हणून यशस्वी प्रवास

ज्यांना खरंच चांगले प्रोजेक्ट करायचे आहेत ते माझं काम बघून माझी निवड करतीलच, असा मला ठाम विश्वास होता आणि झालंही तसंच. चित्रपटात काम करण्याची ती संधी गेली तरी नाटक, सीरियल या माध्यमांतून एक अभिनेत्री म्हणून माझा चांगला प्रवास सुरू आहे.

मी जर माझ्या अनुभवाबदद्ल सांगितलं नसतं तर माझ्या मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांशी या गोष्टींबद्दल मी संवाद साधू शकले असते का, असा प्रश्न मला पडतो. म्हणूनच असं जर आपल्याबद्दल घडलं तर स्वत:लाच दोषी न ठरवता, न घाबरता याबद्दल आवाज उठवला पाहिजे, एवढंच मी सांगेन.

हे ग्लॅमरचं जग आहे, इथे हे चालणारच, असा जर कुणाचा समज होत असेल तर तेही जास्त धोक्याचं आहे, हे विसरून चालणार नाही.

या गोष्टीबद्दल बोलल्यानंतर परत मला असा अनुभव आला नाही, कारण अशा प्रस्तावांना थाराच द्यायचा नाही, असं मी ठरवलंय. त्यासाठी एक वैचारिक, तात्विक भूमिका घेता आली याचं श्रेय मी माझ्या भूमिकांनाही देते.

'ठष्ठ'मधल्या अनामिकाच्या भूमिकेने मला हा विचारांचा ठामपणा दिला आहे, असं मला वाटतं.

जबाबदारी निभावल्याचा आनंद

चित्रपटसृष्टीतच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात होणारा स्त्री-पुरुष भेदभाव, लैंगिक शोषण हा खरंच खूप गुंतागुंतीचा आणि मोठा विषय आहे.

ह़ॉलिवूडमध्ये हार्वी वाइनस्टाईन या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याबद्दल जेन फोंडा, मेरील स्ट्रीप या अभिनेत्रींनीही आवाज उठवला. बॉलिवूडमध्ये दीपिक पदुकोणसारख्या सुपरस्टार सुद्धा आता अशा विषयांवर खुलेपणानं बोलतात.

पण चित्रपटसृष्टीतल्या किंवा कोणत्याही क्षेत्रात धडपडणाऱ्या मुलींनी याबद्दल बोललं तरी ते तितकंच गांभीर्यानं घ्यायला हवं, असं मला वाटतं. जोपर्यंत समाजातल्या सगळ्या थरांतून अशा अन्यायाचा प्रतिकार केला जात नाही तोपर्यंत असे प्रकार रोखले जाणार नाहीत.

मी माझ्या परीनं याचा निषेध नोंदवला, त्याची किंमत मोजावी लागली तरी धैर्यानं त्याला सामारी गेले. योग्य वेळी भूमिका घेतल्यामुळे एक व्यक्ती म्हणून जबाबदारी पूर्ण केल्याचा मला आनंद वाटतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)