पाहा व्हीडिओ : अल्जेरिया लष्करी विमान अपघातात 257 ठार - पाहा व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - Algerian TV वर दाखवण्यात आलेलं अपघातस्थळाचं व्हीडिओ

अल्जेरियामध्ये लष्करी विमान क्रॅश होऊन किमान 257 लोकांचा बळी गेले आहेत, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी राजधानी अल्जिअर्सनजीकच्या बुफारिक लष्करी तळावरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळाने हा क्रॅश झाला. या क्रॅशचं नेमकं कारण अजूनही कळू शकलं नाहीये.

मृतांमध्ये बहुतांश लोक लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातले होते, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. 10 विमान कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे

अल्जेरियाचा पाठिंबा असलेल्या 'पोलिसारिओ फ्रंट' गटाच्या 26 लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा गट पश्चिम सहारामध्ये मोरोक्कोपासून स्वतंत्र होण्यासाठी लढत आहे.

घटनास्थळावरून येत असलेल्या काही व्हीडिओंमध्ये विमानाच्या मलब्यातून धूर निघताना दिसतोय. बचावकार्य करणारे लोक मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.

अल्जेरियाच्या लष्करप्रमुखांनी या अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले असून ते घटनास्थळी भेटही देतील, असं संरक्षण मंत्रालयाने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

अल्जेरियामध्ये चार वर्षांपूर्वी काही जवान आणि त्यांच्या परिवारांना घेऊन जाणारं एक विमान क्रॅश झालं होतं. त्यात 77 लोकांचा बळी गेला होता.

2014 साली पूर्व युक्रेनजवळ मलेशियन एअरलाईन्सच्या MH17 विमानावर हल्ला करून ते पाडण्यात आलं होतं. त्या अपघातात 298 लोक ठार झाले होते. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा विमान अपघात आहे.

प्रतिमा मथळा अपघातस्थळाचा नकाशा

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)