सोशल - काँग्रेसपाठोपाठ भाजपचं उपोषण : बीबीसी वाचक म्हणतात 'सगळे एकाच तळ्यातले मासे!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी Image copyright Getty Images

भाजप आणि काँग्रेसमध्ये आता उपोषणाची चढओढ सुरू झाली आहे. काँग्रेसपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदीच उपोषणावर बसणार आहेत.

विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याच्या निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. या देशव्यापी उपोषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी राजधानी दिल्लीत उपोषण करतील, तर कर्नाटकात निवडणूक प्रचार करत असलेले शहा हुबळीमध्ये दिवसभराचा उपवास करतील, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आम्ही वाचकांना याबद्दल काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

विनोद जाधव म्हणतात,"सगळे एकाच माळेचे मणी, एकाची धडपड सत्ता मिळवण्यासाठी तर दुसऱ्याची सत्ता टिकवण्यासाठी."

Image copyright Facebook

शाहू जवानजल म्हणतात, "सगळे एका तळ्यातले मासे आहे. यांचा मागचा रेकॉर्ड काढला तर आधी विरोधी पक्षात असताना काँग्रेसपेक्षा जास्त वेळा यांनी (भाजपने) संसदेचं काम होऊ दिल नाही. आणि तसंही भाजपवाले कलाकार आहेत. अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी बजावू शकतात."

Image copyright Facebook

"मी सत्ताधारी. माझ्याकडे बहुमत. देशातील 20 राज्यात माझी सत्ता. मात्र साधा विरोधी पक्षनेताही नसलेली लोकसभा मी चालवू शकत नाही. याचा निषेध करीत मी उपवास करीत आहे," अशी प्रतिक्रिया सत्यवान करंबबे यांनी दिली आहे. ते पंतप्रधान मोदींच्या सुरात बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

Image copyright Facebook

"संसद चालत नाही म्हणून बीजेपी ने उपोषण करणं म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'," असं मत रोहितकुमार घुगे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

तर बाबू डिसूझा यांनी भाजप सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. "कामकाज स्वतःच निमित्त साधून वेळोवेळी तहकूब केलं. कोंडी फोडण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता खोटा कळवळा दाखवून उपोषण करणार."

Image copyright Facebook

"ज्यांनी पिढ्या न पिढ्या महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाची तसंच सत्याग्रह आणि उपोषण या आयुधांची टर उडवली, त्यांनीच उपोषण करावे, हे हास्यास्पद आहे," असं मत रविन्द्र दारके यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"एक स्ट्रग्लर आर्टिस्ट, दुसरा नोबेल विनर आर्टिस्ट," अशी प्रतिक्रिया जॉय राजपूत यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

तर संभाजी पाटील यांनीही दोन्ही पक्षांना सुनावल आहे - "अरे जनाची नाही तर मनाची ठेवा थोडीफार... अधिवेशन सुरळीत पार पाडण्याचं काम सत्ताधारीचं आणि त्याला साद देण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं. पण या सर्व बाबींना हरताळ फासण्याचं काम सरकारने केलं. आधी मनमोहन सरकार असतानाही असंच संपूर्ण अधिवेशन वाया गेलं. जरा लाज वाटू द्या, सर्वसामन्याचे पैसे असतात आणि ते असे खर्च करून गोरगरिबांवर तुम्ही अन्याय करत आहात."

Image copyright Facebook

"हिंमत असेल तर गांधीजींप्रमाणे, आण्णांप्रमाणेही नाही(!), आमरण उपोषण या नाटकी राज्यकर्त्यांनी करून दाखवावं," असं भरत माने यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

अनेकांनी ही सगळी "नौटंकी" सुरू असल्याचं म्हटलं आहे. तर "मला वाटतं एके दिवशी आपल्या सगळ्यांनाच उपोषण करावं लागणार आहे. ते पण सक्तीचं, जेवायला नाही म्हणून!" अशी चिंता मकरंद ननावरे यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)