किदंबी श्रीकांत : डबल्स खेळणारा श्रीकांत कसा झाला सिंगल्सचा वर्ल्ड नंबर वन!

बॅडमिंटन, किदम्बी श्रीकांत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेणारा किदम्बी श्रीकांत.

बॅडमिंटन खेळातली चीन, सिंगापूर, मलेशिया या देशांसह युरोपीयन खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत भारताचा किदंबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. हा पराक्रम करणारा तो पहिलावहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे.

ही गोष्ट आहे, चार वर्षांपूर्वीची म्हणजे जुलै २०१४ मधली. इंडोनेशियातील स्पर्धा खेळून किदंबी श्रीकांत हैदराबादला घरी परतला होता. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर दुसऱ्याच दिवशी तो सरावासाठी गोपीचंद अकादमीत गेला. सराव सुरू होता. मात्र तब्येत बरी नाही हे त्याच्या देहबोलीतून सहकाऱ्यांना जाणवत होतं. विचारल्यावर डोकं दुखतंय असं त्याने सांगितलं. फार गंभीर नाही म्हणून सराव सुरूच राहिला पण थोड्या वेळाने श्रीकांत चक्कर येऊन कोसळला. त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी निदान सांगितलं. श्रीकांतला मेनिनजायटीस अर्थात मेंदूच्या संसर्गजन्य तापाने ग्रासलं होतं.

शुद्धीवर आल्यानंतर तो अकादमीतल्या सहकाऱ्यांना ओळखू शकला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या खेळाने आपल्या आगमनाची वर्दी देणारा, क्रमवारीत अव्वल वीसमध्ये धडक मारणाऱ्या तरुण मुलाला आयसीयूमध्ये पाहून दूर गुंटूरवरून आलेल्या त्याच्या घरच्यांना चिंतेने घेरले. पण डॉक्टरांनी आधार दिला. पुरेशा विश्रांतीनंतर तो बरा होईल हा विश्वास त्यांनी दिला, मात्र स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये कधी परतेल हे त्याच्यावरच अवलंबून आहे हे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

करिअर गडबडण्याची चिन्हं होती पण घडलं भलतंच. अचंबित करणाऱ्या इच्छाशक्तीसह श्रीकांतने जेमतेम चार महिन्यात कोर्टवर पराक्रम घडवला. बॅडमिंटन विश्वात लिन डॅन नावाचा अवलिया खेळाडू आहे. वर्षानुवर्षं सतत जिंकण्याचे अनोखे रेकॉर्ड नावावर असणाऱ्या ऑल टाइम ग्रेट लिन डॅनला नमवण्याची किमया 21 वर्षीय श्रीकांतने केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संस्मरणीय विजयानंतर आनंद व्यक्त करताना श्रीकांत

बॅडमिंटन विश्वात लिनच्या नावाची धास्ती आहे. दोन ऑलिंपिक पदकं, पाच विश्वविजेतापदं, प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेसह बॅडमिंटनमधल्या सर्व प्रमुख स्पर्धांची जेतेपदं लिनच्या नावावर आहेत. लवचिक शरीर, त्यामुळे कोर्टवरचा सर्वांगीण वावर, भात्यात असलेली फटक्यांची वैविध्यपूर्ण पोतडी आणि कोणत्याही स्थितीतून विजय खेचून आणण्याची ऊर्मी यामुळे लिन डॅन हे कोडं बॅडमिंटनमधल्या अनेकांना सोडवता आलेलं नाही. मात्र श्रीकांतने सगळी शक्ती आणि युक्ती पणाला लावत लिनला त्याच्या मायभूमीत चीतपट केलं. या सामन्यापूर्वी किदम्बी श्रीकांत हे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागलं होतं. मात्र या विजयाने श्रीकांतच्या नैपुण्यातलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं.

गुंटूरच्या शेतकऱ्याचा मुलगा

भारतीय बॅडमिंटनपटूंच्या उल्लेखनीय विजयांपैकी एकाचा मानकरी ठरलेल्या श्रीकांतची सुरुवात चक्क डबल्स प्लेयर म्हणून झाली होती. आंध्र प्रदेशातलं गुंटूर हे गाव मिरची, कापूस आणि तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. श्रीकांत याच गावचा.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना श्रीकांत

श्रीकांतचे वडील व्यावसायिक शेतकरी. खाऊन पिऊन सुखी असं चौघांचं कुटुंब. श्रीकांत आणि त्याचा भाऊ नंदगोपाळ दोघंही बॅडमिंटन खेळणारे. ही केवळ हौस किंवा टाइमपास नाही, मुलं सीरियस आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी हैदराबाद गाठलं. हैदराबादचं उपनगर असलेल्या गच्चीबाऊलीमध्ये गोपीचंद अकादमीत नंदगोपाळचा प्रवेश पक्का झाला. हैदराबाद-गुंटूर अंतर जवळपास 300 किलोमीटरचं आहे. साहजिकच अपडाऊन शक्यच नाही. त्यामुळे घर सोडून राहणं ओघानं आलंच. पण बॅडमिंटनसाठी आधी नंदगोपाळने आणि नंतर श्रीकांतने अकादमीलाच घर मानलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीकांत आक्रमक खेळासाठी ओळखला जातो.

खेळातली कारकीर्द दुखापतीमुळे संपुष्टात आणल्यानंतर अकादमीद्वारे युवा बॅडमिंटनपटू घडवण्याचा वसा पुल्लेला गोपीचंद यांनी स्वीकारला आहे. उंचीचं वरदान लाभलेल्या श्रीकांतकडे फटक्यांचं वैविध्य आहे हे जाणलेल्या गोपीचंद यांनी त्याला एकेरीत खेळण्याची सूचना केली. कोचची सूचना प्रमाण मानत श्रीकांतने एकेरीत अर्थात सिंगल्स प्रकारात खेळायला सुरुवात केली. हा निर्णय किती योग्य होता हे श्रीकांतच्या उंचावणाऱ्या आलेखाने सिद्ध होतं आहे.

ऑलिंपिकचा अनुभव

करिअर ऐन भरात असताना ऑलिंपिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं खास अनुभव असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत चांगली कामगिरी केल्यानं दोन वर्षांपूर्वी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत श्रीकांत पदकाचा प्रबळ दावेदार होता. सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांच्याप्रमाणेच श्रीकांतकडून पदकाची अपेक्षा होती.

Image copyright BWF
प्रतिमा मथळा श्रीकांतच्या अव्वल स्थानाला पुष्टी देणारं वर्ल्ड बॅडमिंटन फेडरशनचं पेज

क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये श्रीकांतसमोर लिन डॅन उभा ठाकला. यावेळी लिनने श्रीकांतचा पदकाच्या दिशेने जाणारा मार्ग रोखला. चार वर्षानंतर येणारी दुर्मीळ अशी ऑलिंपिकची संधी श्रीकांतच्या हातून निसटली. ज्या लिन डॅनला नमवल्यानंतर श्रीकांतचं नाव जगभर दुमदुमलं होतं. त्याच लिन डॅनविरुद्ध ऑलिंपिकच्या व्यासपीठावर पराभव झाल्याने श्रीकांतच्या मानसिक कणखरतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

वर्ल्ड नंबर वनचं महत्त्व काय?

जागतिक क्रमवारीचं अव्वल स्थान काबीज करणाऱ्या श्रीकांतची ऐतिहासिक भरारी अनुभवताना बॅडमिंटन विश्वातल्या काही गोष्टी समजून घेणं अत्यावश्यक आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनतर्फे चार स्वरुपाच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सुपर सीरिज प्रीमियर, सुपर सीरिज, ग्रां.प्रि, आणि इंटरनॅशनल चॅलेंज असे चार टप्पे असतात.

राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास सुरू होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषत: पुरुष गटात स्पर्धकांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे पात्रता फेरीत अव्वल असलेल्या खेळाडूंचीच मुख्य स्पर्धेसाठी निवड होते. यामध्येच बरीचशी ऊर्जा खर्च होते. यानंतर मुख्य फेरीत एकापेक्षा मातब्बर खेळाडूंशी टक्कर द्यावी लागते. एकामागोमाग होणाऱ्या या स्पर्धांचं भरगच्च वेळापत्रक तयार असतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीकांतने गेल्यावर्षी सुपर सीरिज स्पर्धांच्या जेतेपदाचा धडाकाच लावला.

दोन स्पर्धांदरम्यान प्रवासही करावा लागतो. श्रीकांतच्या बाबतीत विविध दुखापतींमुळे हे समीकरण आणखी अवघड होतं. स्पर्धेतल्या प्रत्येक टप्प्यावरील विजयानुसार क्रमवारीचे अर्थात रेटिंगचे गुण मिळतात. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील कडव्या स्पर्धेमुळे क्रमवारीतले खेळाडू सतत बदलत राहतात. रेटिंग सुरू झाल्यापासून भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू अव्वल स्थानी विराजमान होऊ शकला नव्हता. सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू या दोघींपाठोपाठ आता इतिहासात श्रीकांतचं नाव लिहिलं जाईल.

रेटिंगमध्ये अव्वल नंबरी ठरण्यात श्रीकांतचं मागच्या वर्षातलं प्रदर्शन निर्णायक आहे. कारण या एकाच वर्षात श्रीकांतने चार सुपर सीरिज स्पर्धांची जेतेपदं पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतिस्पर्धी आपल्या खेळाचा अभ्यास करतात हे जाणलेल्या श्रीकांतने स्मॅशचा फटका आणखी घोटीव केला. बचाव करताना श्रीकांत कमी पडायचा. पण या उणे मुद्द्यावरही काम करत श्रीकांतने बचाव भक्कम केला. मॅरेथॉन मॅचेससाठी सरावाच्या वेळी प्रचंड घाम गाळला.

दुखापतीच्या अडथळ्यांवर मात

आपण खेळतोय त्या खेळात 25व्या वर्षीच वर्ल्ड नंबर वन होणं सगळ्यांनाच जमत नाही. पण श्रीकांतने ते करून दाखवलं आहे. लेडबॅक अर्थात आळशी प्रवृत्तीच्या स्वभावाला वेसण घातली. कोचच्या सांगण्यावरून दम काढणाऱ्या ट्रेनिंग मोड्युलला आपलंसं केलं. युक्ती आहे पण शक्ती नाही असं व्हायला नको म्हणून शरीर कमावलं. मुळात इथपर्यंतच्या प्रवासात इंज्युरींनी सातत्याने खोडा घातल्याने श्रीकांतला सदैव काळजीपूर्वक असावं लागतं.

निसटते पराभव, मोक्याच्या क्षणी कच खाल्याने संधी जाणं, इंज्युरीमुळे खेळताना शरीरावर आलेल्या मर्यादा असे असंख्य खाचखळगे पचवत वाटचाल केल्याने श्रीकांतचं वर्ल्ड नंबर वन होणं खास आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एका ब्रँडच्या कार्यक्रमादरम्यान श्रीकांतची मुद्रा

स्पोर्ट्स सेलिब्रेटीभोवती असणारं स्टारडम श्रीकांतभोवती नसतं. जाहिरातींमध्ये अभिनय करण्यापेक्षा मॅच खेळणं सोपं आहे असं त्याचं म्हणणं असतं. फावल्या वेळात त्याला मजबूत झोप घ्यायला आवडते. बिझी शेड्युलमुळे श्रीकांतला घरी राहायला वेळच मिळत नाही. पण घरी असला की 'आय लव्ह डूइंग नथिंग' अर्थात काहीही न करणं त्याला मनापासून आवडतं.

पिक्चर पाहण्याइतकंच मनात तयार असलेल्या पिक्चरच्या कहाण्या खास दोस्तांना ऐकवणं श्रीकांतचा छंद आहे. बॅडमिंटन सोडल्यानंतर कदाचित मूव्ही डायरेक्टर होईन असं त्याला वाटतं. मात्र त्यापूर्वी फिल्ममेकिंगचा संपूर्ण अभ्यास करेन हे सांगायला तो विसरत नाही. तडाखेबंद स्मॅशच्या फटक्य़ासाठी प्रसिद्ध श्रीकांतला जिंकण्यासाठी वाट्टेल ते हा फंडा पटत नाही. प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी खेळताना आक्रमक असायला हवं पण वागणं नीटच हवं हा श्रीकांतचा आग्रह असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रॉजर फेडररचा चाहता असणाऱ्या श्रीकांतच्या वागण्यातून हा आग्रह कृतीत उतरताना दिसतो.

वर्ल्ड नंबर वन होणं हा श्रीकांतसाठी चमत्कार नाही. मर्यादित गुणवत्तेला ठरवून सर्वोत्तमाकडे नेता येतं हा विश्वास श्रीकांतच्या वाटचालीने दिला आहे. अडथळ्यांची शर्यत पार करतानाही वागण्यातलं सच्चेपण कायम ठेवता येऊ शकतं हे वर्ल्ड नंबर वन श्रीकांतने सिद्ध केलं आहे. प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद या दिग्गजांनंतर अनेक गुणी पुरुष बॅडमिंटनपटू खेळून बाजूला झाले. श्रीकांतच्या रुपाने या दोन महान खेळाडूंचा वसा पुढे नेईल असा वारसदार मिळाला आहे.

सुपरसीरिज जेतेपदं

वर्ष स्पर्धा
2017 फ्रेंच
2017 डेन्मार्क
2017 ऑस्ट्रेलिया
2017 इंडोनेशिया
2017 सिंगापूर
2015 इंडिया
2014 चीन

ग्रां.प्रि. जेतेपदं

वर्ष स्पर्धा
2016 सय्यद मोदी स्पर्धा
2015 स्विस ओपन
2015 सय्यद मोदी स्पर्धा
2014 सय्यद मोदी स्पर्धा
2013 थायलंड

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)