सोशल - 'शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचे कुठेच दिसत नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी

बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही झाली नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून काल यवतमाळ इथल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

यवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरवाडी गावात शंकर चायरे या 50 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. चायरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत आत्महत्येला मोदी सरकारला जबाबदार ठरवलं आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

यासंदर्भात बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

शांतकुमार मोरे म्हणतात,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मोदी यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात 12,000 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे जाहीर झालं आहे. शेतकरी आत्महत्येची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झटकू शकत नाहीत."

Image copyright Facebook

"आता तरी जागे व्हा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा. अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही माफ करणार नाहीत. ईडा पिडा टळो बळीराजाचं राज्य येवो," असं ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

Image copyright Facebook

भरत माने म्हणतात, "तसं तर आत्महत्या करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु सध्याची स्थिती पाहता, सध्याची व्यवस्था याला जबाबदार आहे, कारण ती काही निवडक लोकांसाठी काम करते. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे बळी असे जागोजागी प्रत्येक क्षेत्रात दिसणारच."

Image copyright Facebook

प्रसंगाला धैर्याने समोर जाणं, हे प्रत्येकाने करायला पाहिजे. कर्मापासून कोणालाही सुटका नाही. मग ते चांगले असो या वाइट, असं मत रामचंद्र यांनी व्यक्त केलं आहे. तर 2014 च्या आधीचा काळ आठवा, आणि मग बोला, असा सल्ला शैलेंद्र शितोळे यांनी दिला आहे.

Image copyright Facebook

सुनिला चव्हण यांनीही शंकर चायरे यांच्या आरोपांचं समर्थन करत, हे सरकार खोटारडं असल्याचं म्हटलं आहे. जॉय राजपूत यांनी अजून बरेच गुन्हे नोंदवता येतील मोदीवर, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Image copyright Facebook

तर प्रशांत यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना, "स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशीचं पुढे काही झालं नाही. शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचं कुठे दिसत नाही," असं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)