#5मोठ्याबातम्या : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अटक

कुलदीप सेंगर Image copyright FACEBOOK/IKULDEEPSENGAR
प्रतिमा मथळा कुलदीप सेंगर

वेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना अटक

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर सीबीआयनं कारवाई करत भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेतलं आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'नं ही बातमी दिली आहे.

लखनऊमधून कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआयनं पहाटे 4.30 वाजता ही कारवाई केली.

यानंतर सेंगर यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. सेंगर यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

2. भाजप आमदारांचा उपोषणादरम्यान सँडविचवर ताव

संसदेचं अधिवेशन वाया घालवल्याच्या निषेधार्थ भाजपनं विरोधकांच्या विरोधात एकदिवसीय उपोषण करण्याचं ठरवलं होतं.

मात्र पुण्यातले भाजप आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी सँडविच आणि वेफर्स खाऊन स्वपक्षाच्या उपोषणाला तिलांजली दिली.

Image copyright MONEY SHARMA/Getty Images

सकाळी 11 वाजता सुरू झालेलं उपोषण त्यांनी अवघ्या अडीच तासात सोडल्याचं एबीपी माझाच्या बातमीत म्हटलं आहे.

पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक सुरू होताच नाश्त्याच्या प्लेट्स आल्या आणि या आमदारांना उपोषणाचा विसर पडला. बैठकीदरम्यान त्यांनी सँडविच, वेफर्स आणि बर्फीवर ताव मारला.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून दलितांच्या मुद्द्यावर असंच एक उपोषण करण्यात आलं हातं. त्यावेळी उपोषणाआधी काँग्रेस नेत्यांचा छोले आणि भटुऱ्यांवर ताव मारतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

3. अॅट्रॉसिटी : 'न्यायालयाला कायदा बदलण्याचा अधिकार नाही'

न्यायालयाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अॅट्रॉसिटी) बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. दैनिक लोकमतनं यासंबंधी बातमी दिली आहे.

Image copyright Reuters

"अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांबाबत एफआयआर दाखल होण्यापूर्वी पोलीस उपअधीक्षकांद्वारे तपासाचे आदेश दिल्यास त्यांनाही नाईलाजानं कायद्याविरोधात काम करावं लागेल. तसंच ही बाब खूप संवेदशील आहे. यामुळे देशात लोकांमध्ये राग आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे परस्परांतील सामाजिक सौहार्द बिघडले आहेत. केंद्र सरकार नायायालयाच्या या निर्णयामुळे गोंधळलं असून न्यायालयानं यावर पुनर्विचार करावा," असं केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

4. 'पंतप्रधान आहात, आपलं काम नीट करा'

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, कमल हासन यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदींना खुलं पत्र लिहिलं आहे. सोबत एक व्हीडिओही अपलोड केला आहे.

Image copyright FACEBOOK/IKAMALHAASAN

या व्हीडिओत कमाल हासन यांनी निवडणुकीपेक्षा माणूस जास्त महत्त्वाचा असून कावेरी प्रश्नावर लवकरात लवकर न्याय केला जावा अशी मागणी मोदींकडे केली आहे.

5. ऑर्कुट पुन्हा सोशल मीडियाच्या मैदानात

एकेकाळी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलेल्या ऑर्कुट या वेबसाईटनं पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये एन्ट्री केली आहे.

लोकमतनं दिलेल्या बातमीनुसार, फेसबुक, ट्वीटर आणि इतर नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेल्या ऑर्कुटनं 4 वर्षांपूर्वी नेटीझन्सना अलविदा केला होता.

आता पुन्हा नव्यानं ऑर्कुट मार्केटमध्ये आलं आहे. ऑर्कुटचं नाव आता हॅलो असं करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)