'इतिहासाने आंबेडकरांना चूक ठरवलं हे मान्य केलं पाहिजे' - पाहा व्हीडिओ

बीबीसीच्या आंबेडकर आणि लोकशाही या कार्यक्रमाच्या वेळचं दृश्य
प्रतिमा मथळा बीबीसीच्या आंबेडकर आणि लोकशाही या कार्यक्रमाच्या वेळचं दृश्य

बीबीसीला 1953 साली दिलेल्या स्फोटक मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाकित केलं होतं की "भारतात लोकशाही चालणार नाही, ती केवळ नावापुरती असेल". या मुलाखतीवर चर्चा करण्यासाठी बीबीसी मराठीने मुंबईत शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं.

यावेळी बोलताना लेखक आणि राजकीय भाष्यकार सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, "जी त्यांनी भविष्यवाणी केली आहे की इथे संसदीय लोकशाही चालणार नाही, संसदीय लोकशाही इथे कोसळणार. याबाबतीत मात्र इतिहासाने आंबेडकरांना चूक ठरवलं, हे आपण मान्य केलं पाहिजे."

पाहा व्हीडिओ -

बीबीसीला दिलेल्या या मुलाखतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संसदीय लोकशाहीमुळे गरिबांचं भलं होणं कठीण आहे. पर्याय म्हणून भारतासाठी साम्यवादाचा एखादा प्रकार योग्य असेल, असंही ते म्हणतात.

या मुलाखतीवर आधारित 'आंबेडकर आणि लोकशाही' या बीबीसी मराठीने आयोजित केलेल्या विशेष परिसंवादात सुधींद्र कुलकर्णींसोबत बाबासाहेबांचे नातू आणि 'भारिप बहुजन महासंघा'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी तसेच लेखक राहुल कोसंबी सहभागी झाले होते.

प्रतिमा मथळा परिसंवादात बोलताना प्रकाश आंबेडकर आणि सुधींद्र कुलकर्णी

सुधींद्र कुलकर्णी या परिसंवादात म्हणाले की, "भारतात लोकशाही काम करेल असं तुम्हाला वाटतं का, असं विचारल्यावर ते (बाबासाहेब आंबेडकर) म्हणतात की - नाही, ती फक्त नावापुरती असेल. इथे लोकशाही काम करणार नाही कारण इथली समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे. पुढे त्यांना हाही प्रश्न विचारला गेला की ही व्यवस्था कोसळेल असं तुम्हाला वाटतं का? आंबेडकरांचं उत्तर आहे - हो. ही व्यवस्था कोसळेल. आता त्यांनी केलेलं हे भाकित खरं को खोटं हे ठरवण्यासाठी मध्ये गेलेली 65 वर्षं हा पुरेसा कालावधी आहे. आज आपण हा प्रश्न विचारूया की भारतात संसदीय लोकशाही कोसळली आहे का किंवा ती कोसळण्याची चिन्हं तरी आपल्याला दिसतात का? किंबहुना मी तर असं म्हणेन की संसदीय लोकशाहीची मुळं इथं खोलवर रूजलेली आहेत."

पुढे कुलकर्णी म्हणाले, "या प्रणालीमध्ये अनेक उणिवा आहेत, त्या भारतातही आहेत. पण भारतीय जनतेनं, विशेषत: खालच्या स्तरांतल्या लोकांनी, लोकशाही स्वीकारलेली आहे. संसदीय लोकशाही इथे मजबूत झाली आहे म्हणून सगळे जगातले लोक भारताकडे आदरानं बघतात. संसदीय लोकशाहीवर अविश्वास म्हणजे संविधानावर अविश्वास आहे."

प्रतिमा मथळा सुधींद्र कुलकर्णी

'मंदिरात देवाआधीच रावण'

मग बाबासाहेबांना संसदीय लोकशाहीवर विश्वास नव्हता का? प्रकाश आंबेडकरांना हे मत मान्य नाही. ते म्हणाले, "समाजातली जी विसंगती आहे आणि संविधानानं केलेली व्यवस्था जी आहे, त्यातला जो अंतर्विरोध आहे तो ते सातत्यानं मांडत आले. आपण काय स्वीकारायला तयार आहोत हे आपण ठरवूच शकलो नाही आहोत. म्हणून ते या मुलाखतीत खंतही व्यक्त करतात की ते ठरवण्यासाठी जो कार्यक्रम आखला गेला पाहिजे तो इथे नाही. त्या बद्दलही ते म्हणतात की मी वाट पहायला तयार आहे. तो एका रात्रीत तयार होणार नाही, मात्र तरीही आपण त्या दिशेनं जायला तर हवं. तो कार्यक्रम त्यांना १९५० नंतर दिसला नाही."

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, "संविधानाबद्दल एकदा ते (बाबासाहेब आंबेडकर) हैद्राबादमध्ये असंही म्हणाले होते की आम्ही एक मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये देव ठेवण्याच्या अगोदरच तिथे रावण गेला आहे. मग त्या मंदिराचं तुम्ही काय करणार आहात? त्यांचं सातत्यानं म्हणणं हे होतं की एका नवीन देश तयार होतो आहे आणि त्या नव्या देशाचा पाया काय रचला जाणार आहे ते ठरवलं गेलं पाहिजे. आणि माझ्या अंदाजानं ते ठरवलं गेलं नाही आणि ती ठरवण्याची कोणी जबाबदारीही घेतली नाही. म्हणून ते असं म्हणाले असावेत."

'आत्मघातकी निष्कर्ष'

प्रतिमा मथळा लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी

लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या मते या साडेचार मिनिटांच्या लांबीच्या मुलाखतीवरून त्यांचं एकूण लोकशाहीबद्दलचं मत वा संसदीय लोकशाहीबद्दलचं मत ठरवणं योग्य नाही. "सुधींद्र कुलकर्णी म्हणाले तसं ते मत संविधानविरोधी आहे, असा निष्कर्ष काढणं आत्मघातकी आहे असं मला वाटतं. लोकशाहीबद्दलचं त्यांचं मत इथे जे प्रश्न विचारले गेले त्यासंदर्भातच आलं आहे. त्यातलं हे बरोबर आहे की संसदीय लोकशाहीचा जो अनुभव तोपर्यंत त्यांनी घेतला होता, पहिल्या निवडणुकीनंतर सत्ताधारी वर्गानं जी धोरणं स्वीकारली होती त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर अजिबात समाधानी नाहीत."

पुढे त्या म्हणाल्या, "पण त्यांचा संविधानावर विश्वास आहे आणि त्यांचा संसदीय लोकशाहीवर एक मार्ग म्हणून विश्वासच आहे. ते या मुलाखतीत साम्यवादाबद्दलही बोलतात, पण नंतर ते बुद्धिझमकडेही पाहतात. त्यामुळे ही मुलाखत म्हणजे त्यांचं लोकशाहीबद्दलचं अंतिम मत मानता येणार नाही."

जर जातीआधारित विषमता टिकली तर संसदीय लोकशाही कोसळेल असं बाबासाहेब म्हणतात, या संदर्भाकडेही लक्ष द्यायला हवं असंही प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या.

प्रतिमा मथळा राहुल कोसंबी

यावेळी राहुल कोसंबी म्हणाले की, "1953 मध्ये ही मुलाखत झाली आहे. 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली होती आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये हरले होते. त्या वेळेस जे सरकार नव्या योजना आणत होतं, त्यातून जातिअंताच्या ध्येयाकडे आपण जातो आहोत असं बाबासाहेबांना वाटत नव्हतं. म्हणून बाबासाहेब अशा पद्धतीची टोकाची मतं देताना दिसताहेत."

कम्युनिस्ट बाबासाहेब?

बाबासाहेब या मुलाखतीत एखाद्या प्रकारचा साम्यवाद भारतासाठी पर्याय असेल असंही म्हणतात. या विधानावरही या परिसंवादात उहापोह झाला. राहुल कोसंबी यांच्या मते, "आपण हे विधान अधिक गंभीरतेनं घेतलं पाहिजे. हे विधान यापूर्वी त्यांच्या कोणत्याही लिखाणातून आलेलं दिसत नव्हतं, ते या मुलाखतीत येतं. नंतर 1956 मध्ये बुद्धाच्या मार्गावर गेल्यावर बाबासाहेबांनी काठमांडूत भाषण करताना कम्युनिझमला दुसरा क्रमांक दिला होता."

प्रतिमा मथळा परिसंवादात राहुल कोसंबी बोलताना

"बाबासाहेब कोणत्याही समाजाच्या नीतिवान अधिष्ठानासाठी धर्माचा सातत्यानं पाठपुरावा करताना दिसतात. साम्यवाद जर राजकीय प्रणाली म्हणून स्वीकारला तर नैतिक अधिष्ठानाचं काय म्हणून त्याच्या पलिकडे जाऊन बुद्धिझम त्यांनी स्वीकारला. म्हणूनच साम्यवादाचा एखादा प्रकार म्हणताना इथल्या तरुणांना ते निश्चितपणे राजकीय मॉडेल देतांना ते दिसताहेत," असं विश्लेषण राहुल कोसंबी यांनी केलं.

प्रकाश आंबेडकरांच्या मते बाबासाहेबांना व्यक्ती आणि विचार बदलणारी व्यवस्था हवी होती आणि म्हणून त्यांनी बुद्धिझम स्वीकारला, पण त्यांनी मार्क्सवाद कुठेही मुळापासून नाकारला नव्हता.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)