#5मोठ्याबातम्या : 'गुन्हेगारांना सोडणार नाही, आपल्या मुलींना न्याय मिळणारच' - नरेंद्र मोदी

Image copyright AFP

वेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. 'महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही'

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बोलले. "महिलांविरोधात जे गुन्हे करणार त्यांना अजिबात सोडणार नाही," असं मोदी म्हणाले आहेत.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले, "महिलांवरील अत्याचारांना चांगल्या नागरी समाजामध्ये स्थान मिळू शकत नाही. देश, समाज म्हणून आज आपल्या सर्वांना अशा घटनांची लाज वाटते. मी देशाला आश्वस्त करतो की कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही. न्याय होणारच, आपल्या मुलींना न्याय मिळणारच."

2. कठुआ बलात्कार प्रकरणी भाजपच्या 2 मंत्र्यांचे राजीनामे

जम्मूनजीकच्या कठुआ गावात झालेल्या बलात्कार प्रकरणी दोन भाजप मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या बलात्कार प्रकरणातल्या संशयित आरोपींच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, असं टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright Twitter/inc
प्रतिमा मथळा कठुआ आणि उण्णाव प्रकरणातल्या दोषींना शिक्षा मिळावी म्हणून दिल्लीत कँडल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, देशात बलात्काराच्या घटनांवरून वादंग उठलं असतानाच राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर 3 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार करत व्हीडिओ शूट करून व्हायरल केला आहे.

3. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर बेळगाव पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Image copyright Raju Sanadi

एबीपी माझाच्या बातमीनुसार, संभाजी भिडे हे गुरुवारी कर्नाटकमधल्या येळ्ळूर इथे महाराष्ट्र मैदानात झालेल्या कुस्त्यांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करा, इसं आवाहन केल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

4. पोलीस भरती सरावादरम्यान युवतीचा मृत्यू

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

कोमल दत्तात्रय पवार असं या युवतीचं नाव असून ती सांगलीतल्या विटा शहरात राहते. विटामधील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळच्या सुमारास सराव कराव ही घटना घडली, असं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

5. 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या बातमीत काही निवडक पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे -

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : कच्चा लिंबू
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : न्यूटन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : श्रीदेवी (मॉम)
  • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : बाहुबली-2
  • दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार : विनोद खन्ना (मरणोत्तर)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)