मेरी कोम : बॉक्सिंग आणि रोजच्या जीवनातलीही आयर्न लेडी

मेरी कोम Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेरी कोम

35 वर्षांच्या मेरी कोम यांनी काही महिन्यांपूर्वी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्यांदा गोल्ड मेडल जिंकलं होतं आणि आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. मेरी कोमने पदक जिंकलं नाही, अशी फक्त एकच स्पर्धा होती ती म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स. मेरीनं आता यातही पदक मिळवलं आहे.

मेरी यांच रोजच जीवन धकाधकीचे आहे. दिल्लीतल्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये सराव करून झाल्यानंतर त्या सरळ संसदेत जातात. जेणेकरून खासदार म्हणून राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होता येईल आणि आपल्या नावापुढे अनुपस्थितीत असं नमूद करण्याची वेळ येणार नाही.

त्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं. ते काही असंच नाही. बॉक्सिंग रिंगच्या आत मेरी ज्या ताकदीनं लढतात त्याच ताकदीनं त्यांनी आयुष्यातल्या अडचणींशी दोन हात केले आहेत.

2011मध्ये मेरी कोम यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया होणार होती. त्याचवेळी त्यांना चीनमधल्या आशिया स्पर्धेसाठी जायचं होतं. काय निर्णय घ्यायचा हे आव्हान त्यांच्यापुढे होतं. शेवटी त्यांचे पती मुलाजवळ थांबले आणि त्या चीनला गेल्या. नुसतं गेल्याच नाही तर गोल्ड मेडलही जिंकलं. पण ही त्यांच्यासाठी सोपी गोष्टी नक्कीच नव्हती.

मेरी कोम 5 वेळेला विश्व चॅम्पियन राहिल्या आहेत आणि बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

2012मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

गरीब कुटुंबात जन्म

मणिपूरमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोम यांचा जन्म झाला. आपल्या मुलीनं बॉक्सिंमध्ये करीअर करावं, असं त्यांच्या आईवडिलांना वाटत नव्हतं. लहानपणी त्या घरचं काम करत, शेतात जात, लहान भावंडांना सांभाळत आणि उरलेल्या वेळेत सराव करत.

त्या काळी म्हणजेच 1998मध्ये डिंको सिंह यांनी आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. तेव्हापासूनच मेरी यांना बॉक्सिंगबद्दल आवड निर्माण झाली. आपली मुलगी बॉक्सिंग खेळते हे त्यांच्या आईवडिलांना बरेच दिवस माहितही नव्हतं.

Image copyright AFP/GETTY

2000साली वर्तमानपत्रात छापून आलेल्या 'स्टेट चॅम्पियन'च्या फोटोवरून त्यांना हे कळालं. बॉक्सिंग करताना दुखापत झाल्यास उपचार करणं अवघड होईल आणि लग्न करतानाही अडचण येईल, अशी भीती त्यांच्या वडिलांना वाटत होती.

पण मेरी मागे हटायला तयार नव्हत्या. शेवटी आईवडिलांना मेरी यांचं ऐकावं लागलं. 2001पासून मेरी यांनी 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. यादरम्यान मेरी यांचं लग्न झालं आणि त्यांना जुळी मुलं झाली.

5 वेळेस विश्व चॅम्पियन राहिलेल्या मेरी यांनी शेवटचे 2 विश्व चॅम्पियनशिप मेडल आणि ऑलिम्पिक मेडल आई झाल्यानंतर जिंकली आहेत.

2012च्या ऑलिम्पिकमध्ये तर मेरी यांना 48 किलो वजनी गटाऐवजी 51 किलो वजनी गटात खेळावं लागलं. या वजनी गटात त्यांनी फक्त दोनच सामने खेळले होते.

मेरी कोम यांनी कारकीर्दीत अनेक उतारही अनुभवले आहेत. 2014मध्ये त्या ग्लासगो इथल्या स्पर्धेसाठी तसंच रिओ ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरल्या नव्हत्या.

वैयक्तिक आयुष्यही खडतर

मेरी कोम यांना वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटांचा सामना करावा लागला.

Image copyright RAVEENDRAN/GETTY IMAGES

हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्रात छापून आलेल्या आणि मुलांच्या नावे लिहिलेल्या पत्रात त्यांनी 17 वर्षांच्या असताना कशाप्रकारे त्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता, हे सांगितलं होतं. पहिल्यांदा मणिपूर, मग दिल्ली आणि नंतर हिसारमध्ये त्यांना या घटनांना समोर जावं लागलं होतं. बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी मेरी कोम संघर्ष करत होत्या तेव्हाचा हा काळ होता.

तिसरं वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकून जेव्हा मेरी परत आल्या तेव्हा त्यांच्या सासऱ्यांची हत्या करण्यात आली.

पण प्रत्येक वेळेस मेरी यांनी परिस्थितीवर मात केली. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये तर त्यांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं.

1000 मेरी तयार करण्याचं स्वप्न

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक चॅम्पियन, खासदार, बॉक्सिंग अकॅडमीच्या मालक, सरकारी पर्यवेक्षक, आई आणि पत्नी अशा अनेक भूमिका मेरी एकावेळी निभावत आहेत.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटलं होतं, "रिंगमध्ये फक्त दोनच बॉक्सर असतात. रिंगमध्ये उतरताना तुमच्या मनात धग असली पाहिजे, ती नसेल तर समजायचं की तुम्ही खऱ्या बॉक्सर नाही."

आपल्या आत असलेल्या याच धगीचा वापर रिंगमध्ये करून मेरी इथपर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः सारख्या 1000 मेरी कोम तयार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)