कठुआ बलात्कार : 'त्या दिवशी ती परतलीच नाही, नंतर तिचा मृतदेहच मिळाला'

कठुआ
प्रतिमा मथळा मुलीची आई

जम्मू काश्मीरमधील कठुआ इथं 8 वर्षांच्या मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे. बीबीसीच्या प्रतिनिधीने कठुआला भेट देऊन पीडित मुलीच्या आईवडिलांशी संवाद साधला. तिच्या आईच्या आणि तिच्या वडिलांच्या प्रश्नांच्या फैरी सर्द करणाऱ्या होत्या. हे प्रश्न नव्हतेच, तो होता एका मातेचा आणि पित्याचा आक्रोश.

प्रश्न...एका आईचे शेकडो प्रश्न. ज्या आईच्या आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची गळा दाबून हत्या करण्यात आली तिचे प्रश्न...एका अशा आईचे प्रश्न जिच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानं धार्मिक भेद आणखी अधोरेखित केले आहेत.

"आमची मुलगी...तिनं कोणाचं काय नुकसान केलं होतं? काय खाल्लं होतं? कसली चोरी केली होती? का मारलं त्यांनी तिला?"

"तिथून दूर घेऊन गेले. गाडीतून नेलं की उचलून नेलं...माहिती नाही. कसं मारलं माहिती नाही...?"

प्रश्न संपतच नाहीत. एका पाठोपाठ एक...येतातच.

खरंतर, प्रश्न नाहीतच ते... एका मातेच्या ह्रदयातला आक्रोश!

प्रतिमा मथळा बकरवाल समाजातल्या महिला

कठुआच्या दुर्गम नाला पर्वतरांगांमध्ये त्या आमच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडत होत्या. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आठ वर्षांच्या त्या मुलीचाच चेहरा येत होता.

आईसारखाच चेहरा, तसेच मोठे मोठे डोळे, गोरा रंग.

पण हे काही क्षणच...

पुन्हा त्यांच्याशी बोलू लागलो तेव्हा त्या सांगत होत्या, "माझी मुलगी देखणी होती. हुशार होती. जंगलात जाऊन वेळेत परत यायची."

"पण त्या दिवशी ती परतलीच नाही आणि मग तिचा मृतदेहच मिळाला."

जवळच बकऱ्या, गायी फिरत आहेत. बकरवाली कुत्रे जवळच बांधलेले आहेत. घोडेही चरत आहेत...असं त्यावेळचं तिथलं चित्रं होतं.

"तिलाही घोड्यांची आवड होती. तिला त्यांच्याबरोबर खेळायला आवडायचं, घोड्यावरून ती रपेटही मारायची," तिची बहीण सांगत होती.

घोड्यांना चरवण्यासाठी ती त्या दिवशी जंगलात घेऊन गेली होती. तिथूनच तिचं अपहरण करण्यात आलं आणि सात दिवस सामूहिक बलात्कार केल्यावर तिचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला.

प्रतिमा मथळा मुलीची बहिण

दु:खात बुडालेली तिची आई म्हणते, "माझ्या तीन मुली होत्या. आता दोनच राहिल्या आहेत."

भावाच्या मुलीच अपघातात निधन झाल्यानंतर त्यांनी या मुलीली भावाकडे सांभाळण्यासाठी दिलं होतं.

ही दुर्घटना घडली तेव्हा त्या मुलीचे आईवडील सांबा भागात मुक्कामाला होते. तर ती मामासोबत कठुआमध्ये राहात होती.

प्रतिमा मथळा तिच्या वडिलांशी बोलताना बीबीसीचे प्रतिनिधी फैसल मोहम्मद अली.

सात दिवसांनी तिचा मृतदेह मिळाला, पण तो ताब्यात मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, असे तिचे वडील सांगतात.

ते म्हणाले, "पोलीस म्हणाले की, बकरवाल्यांपैकीच कोणा तिला मारलं नसेल कशावरून? गावकरी तर असं वाईट काम कधीच करणार नाहीत."

हिरवी शाल परिधान केलेली तिची आई म्हणते, "तिचा नैसर्गिक मृत्यू असता तर सहन केलं असतं. जगात अनेक जण मरतात, तशीच ती गेली."

डोक्याला पगडी बांधलेले तिचे वडील म्हणाले, "आम्ही आमच्या मुलीला आमच्या कब्रस्तानमध्ये दफनही करू शकलो नाही. रात्रीच तिला दुसऱ्या गावात न्यावं लागलं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)