मक्का मशीद बॉम्बस्फोटातील पीडितांना कोणी उत्तर देईल?

सलीम Image copyright BBC/ Deepthi

"जो निर्णय आला आहे तो अगदी अनपेक्षित आहे. माझा भाचा गेला पण न्याय झाला असं मला वाटत नाही," 58 वर्षीय मोहम्मद सलीम सांगत होते. हैद्राबादमधल्या मक्का मशिदीमध्ये 2007 साली झालेल्या बाँबस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता आणि 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मोहम्मद सलीम यांचा शाईक याचा देखील त्यात मृत्यू झाला होता.

अकरा वर्षांनंतर हैदराबादच्या अतिरिक्त महानगर सत्र न्यायालयानं (तेच राष्ट्रीय तपास संस्थेचंसुद्धा न्यायालय आहे) पुराव्याअभावी पाचही आरोपींची सुटका केली.

नबाकुमार सरकार उर्फ स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भारत मोहनलाल रत्नेश्वर, राजेंद्र चौधरी या सर्व आरोपींची सुटका झाली.

ती फक्त श्वास मोजतेय

सलीम सकाळपासूनच टीव्हीसमोर बसून न्यायालयाच्या याबाबतच्या निर्णयाची वाट पहात होते. ते व्यवसायाने शेफ असून हैद्राबादमधील तलाब कट्टाच्या छोट्या गल्ल्यांमध्ये राहतात.

सलीम त्यांच्या बहिणीची म्हणजे शाईक नईमच्या आईची काळजी घेतात. शाईक गेल्यापासून त्याची आई अंथरूणा खिळून आहे. "माझी बहीण बोलू शकत नाही किंवा चालू शकत नाही. ती फक्त श्वास मोजतेय. मुलाच्या मृत्यूमुळे तिची तब्येत खालावली आहे. मला जसं जमतं तशी मी तिची काळजी घेतो," सलीम सांगत होते.

सोमवारी जाहीर झालेला हा निकालाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. कोर्टात मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जात होता. ज्या लोकांचे खटले होते अशा लोकांनाच प्रवेश दिला जात होता.

Image copyright BBC/Navin

कोर्टाच्या आवारात येण्यास प्रसारमाध्यमांना देखील बंदी होती. "कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती."

दुपारच्या सुमारास निर्णय जाहीर करण्यात आला. काही मिनिटांतच सर्व आरोपी न्यायालयाच्या आवारातून बाहेर निघून गेले.

मागच्या सरकारनं NIA चा वापर राजकीय अस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप असीमानंद यांचे वकील जे. पी. शर्मा यांनी केला.

"हे सगळं UPA सरकारचं कुभांड आहे. फिर्यादींना कोणतेही आरोप सिद्ध करता आले नाहीत, असं कोर्टानं सांगितलं. लोकांवर चुकीचे आरोप करणाऱ्या सरकारसाठी हा एक धडा आहे," असं जे पी शर्मा म्हणाले.

माझं आयुष्य बरबाद झालं

या निर्णयानंतर सगळ्यांनाच आनंद झाला नाही. कोर्टाच्या आवारात एक माणूस "मग माझ्या बहीण भावांना कोणी मारलं?" असं म्हणत ओरडत होता.

2007च्या स्फोटानंतर पोलिसांनी संशयावरून अनेक मुस्लीम युवकांना अटक केली होती. ज्यांना अटक झाली त्यांची 2008 च्या सुमारास निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सय्यद इमरान खान आता 33 वर्षांचे आहेत. 2007मध्ये बोवेनपल्ली भागातून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. तेव्हा ते 21 वर्षांचे होते आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होते. आता ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

Image copyright BBC/Deepthi

"मी तुरुंगातून 18 महिने आणि 24 दिवसांनी बाहेर आलो. त्यानंतर मी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. पण मला लागलेल्या बट्ट्यामुळे आणि माझ्या पार्श्वभूमीमुळे मला कुठेच नोकरी मिळत नव्हती.

आता त्यांनी सगळ्या आरोपींची सुटका केली. यासाठी कोण जबाबदार आहे? तपास संस्थांनी याचं उत्तर द्यायला हवं. माझी काहीही चूक नसताना माझं आयुष्य उद्धवस्त झालं. त्यासाठी कोण जबाबदार आहे?" असा प्रश्न इमरान यांनी बीबीसीशी बोलताना विचारला.

दिवस संपताच या खटल्यातले न्यायाधीश रविंदर रेड्डी यांनी अनपेक्षितपणे आपला राजीनामा उच्च न्यायालयाकडे पाठवला.

या राजीनाम्यामागची कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, पण सध्या सुरू असलेल्या काही अंतर्गत वादामुळे हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)