या आजोबांनी स्वतःच्या कुटुंबीयांना घडवली जन्माची अद्दल, पण का?

धज्जा राम Image copyright Sat Singh/BBC

हरयाणातल्या सोनिपत जिल्ह्याच्या मातंड गावाची लोकसंख्या चार हजाराच्या आसपास आहे. गावातले बहुतांश लोक शेती करतात. मुलींनी त्यांच्या मर्जीनं लग्न करणं आजही इथं योग्य समजलं जात नाही.

याच गावात धज्जाराम नावाचे एक गृहस्थ राहतात. ते 72 वर्षांचे आहेत. आज त्यांच्या घरात भयाण शांतता पसरली आहे. जवळच उष्टी भांडी पडली आहेत. काही सामान त्यांच्या अंगणात विखुरलेलं आहे.

कुर्ता आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलेले धज्जाराम शून्यात नजर लावून बसले आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातल्या पाच लोकांना सोनिपत कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

धज्जाराम यांची नात स्वीटी हिची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली. स्वीटीचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणून तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. स्वीटी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. पण कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन घरी बोलावलं आणि 1 जुलै 2016ला तिची हत्या केली.

तो दिवस...

स्वीटीचे वडील बलराज शेतकरी आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं आपल्या मुलीची हत्या केली. त्यांनी तिला घरातच शेणाच्या गोवऱ्यांवर ठेवून जाळून टाकलं.

धज्जाराम त्या दिवसाची आठवण सांगतात. "माझ्या बायकोचं निधन झाल्यापासून मी देवळातच झोपतो. त्या दिवशी मी रात्री जेव्हा जेवायला आलो होतो, तेव्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तेव्हाच काहीतरी वाईट होणार याची कुणकूण मला लागली होती."

नातीच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी लगेच हे प्रकरण पोलिसांना कळवलं.

Image copyright Sat Singh/BBC

"पोलीस येईपर्यंत नक्की काय होतंय याची मलाही कल्पना नव्हती. पोलीस आले आणि तिच्या चितेवरून पुरावे गोळा केले. स्वीटी अतिशय हसतमुख मुलगी होती. उच्चशिक्षण घेतलेली ती आमच्या घरातली पहिलीच मुलगी होती," ते सांगत होते.

पोलिसांनी मुलीचे वडील, आई, काका, काकू आणि एक बहीण (एकूण पाच लोक) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.

दोन वर्षांच्या सुनावणीनंतर 12 एप्रिल 2018 रोजी या कुटुंबीयांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

स्वीटीच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि गावातले लोक धज्जाराम यांच्या भूमिकेच्या विरोधात गेले.

त्यामुळे त्यांच्याशी गावात सगळ्यांनी अबोला धरला आणि धज्जाराम यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. ते सांगतात की, जुलै-2016 नंतर त्यांनी कोर्टात साक्ष देण्याशिवाय कधीही घराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही.

"पहिल्या दिवशी मी जे पाहिलं आणि ऐकलं त्यावर मी ठाम राहिलो. एक शब्दही मागे पुढे नाही. पोलीस आणि कोर्टानं त्यात महत्त्वाची भूमिका बजावली," ते सांगतात.

पण या वयात घरातल्या सगळ्याच लोकांना शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मृत नातीला न्याय मिळवून देण्याचं श्रेय घेण्याबाबत ते म्हणाले, "माझ्या मुलांना शिक्षा व्हावी असंही मला वाटत नव्हतं. मी एक म्हातारा माणूस आहे. आयुष्यात असं काही करायची माझी इच्छा नव्हती."

आयुष्याचे गंभीर प्रश्न

"घरातल्या पाच लोकांना तुरुंगात पाठवलं तरी धज्जाराम यांच्याबरोबर आणखी पाच जण राहतात. "त्यांच्या जेवणाचं काय करायचं हेसुद्धा मला माहिती नाही. या मुलांना मी कसं मोठं करू हा एक मोठा प्रश्न आहे," ते म्हणतात.

धज्जाराम आपलं पासबुक दाखवतात. त्यांच्या खात्यात आता फक्त दोन हजार रुपये आहेत.

ते सांगतात की, त्यांच्या मोठ्या नातीचं 2017मध्ये लग्न झालं. जवळच्या गावातच तिचं सासर आहे. मीनाला जामीन मिळाला होता. पण 12 एप्रिलला कोर्टानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Image copyright BBC/Sat singh

धज्जाराम यांचा सगळ्यांत मोठा मुलगा बलराज या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विकास घराच्या दरावर उभा राहून कोणीतरी येण्याची वाट पाहतोय. बऱ्याच दिवसांपासून मुलांनी काहीही खाल्लेलं नाही. धज्जाराम यांच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीही नाही.

घराच्या जवळून जात असलेल्या बिमलादेवी म्हणाल्या की, या कुटुंबाला कोणत्याच आशा उरलेल्या नाहीत. पाच लोक तुरुंगात आहेत आणि लहान मुलांबरोबर फक्त आजोबा. तेसुद्धा एक प्रकारे अनाथ झाले आहेत.

काजल या मुलांमध्ये सगळ्यांत मोठी आहे. ती एका खासगी शाळेत शिकते. यावर्षी तिनं दहावीची परीक्षा दिली आहे.

घरात पाच मुलं आहेत, ज्याचं वयं 18 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांची जबाबदारी धज्जाराम यांच्यावर आहे. तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं न्यूमोनियामुळे निधन झालं. आता ते एकटेच आहेत.

बीबीसीशी बोलताना धज्जाराम यांनी सांगितलं की, ते अडीच एकर जमिनीवर शेती करतात. त्यांना 1800 रुपये पेन्शन मिळते. त्यात ते घर चालवतात.

ते सांगतात, "माझ्या आयुष्यात आता काहीच नाहीये. पाच मुलं आणि मी. कुटुबांच्या इतर सदस्यांना शिक्षा झाली आहे. हा निर्णय माझ्यासाठी गौरवास्पद आहे की लाजिरवाणा हेच कळत नाही. कदाचित मला ते समजूनच घ्यायचं नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)