#5मोठ्याबातम्या : 900 वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली?

कालिबंगन
प्रतिमा मथळा सिंधू संस्कृतीच्या कलाकृतींपैकी एक

आजच्या विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्यांपैकी या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या.

1. दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली?

सलग 900 वर्षं पडलल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे 4,350 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष IIT खरगपूरच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे.

लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, या नवीन अभ्यासामुळे त्या काळात 200 वर्षांचा दुष्काळ पडला होता, हा गैरसमजही आता दूर झाला आहे.

या अभ्यासात वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांच्या कालखंडातील पाऊसमानातील बदलांचा अभ्यास केला.

सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात सुमारे 900 वर्षं पावसाने दडी मारल्याने सिंधू संस्कृती ज्या नद्यांच्या काठांवर विकसीत झाली होती, त्या पार आटून गेल्या. त्यामुळे लोकांनी पूर्व आणि दक्षिणेकडे स्थलांतर केलं.

2. काँग्रेसच्या कर्नाटक निवडणूक यादीत लिंगायत, OBC

कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना काँग्रेसने जातीय समीकरणांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूस्थान टाइम्सच्या बातमीनुसार, काँग्रेसने 218 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी 52 उमेदवार इतर मागासवर्गीय जातीतले (OBC) आहेत.

Image copyright Getty Images

शिवाय, या यादीत लिंगायत समाजाचे 42 आणि वोकलीगास समाजाचे 39 उमेदवार आहेत. या दोन्ही समाजांचं तिथं वर्चस्व असल्याचं मानलं जातं.

सत्ताधारी काँग्रेसने 36 दलितांनाही तिकीट दिलं आहे. तसंच 17 उमेदवार ST असून 15 मुस्लीम आणि 17 ब्राह्मण आहेत.

यापैकी 138 उमेदवारांचं वय 51 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे.

3. भाजपशासीत 3 राज्यांमध्ये SC/STचा नविन कायदा

SC/ST अॅट्रॉसिटी कायद्याबाबत अलीकडेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांच पालन करण्याचे आदेश छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारांनी त्यांच्या पोलीस यंत्रणांना दिले आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे.

अॅट्रॉसिटी अॅक्टचा अनेक ठिकाणी गैरवापर होत असून तो टाळण्यासाठी या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यापूर्वी चौकशी करण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये म्हटलं होतं.

Image copyright Getty Images

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांबाबत केंद्र सरकार पुनर्याचिका करण्याच्या तयारीत असताना तीन राज्यांनी या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत, अशी बातमी इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर आहे.

हिमाचल प्रदेश सरकारने याबाबत अधिकृत लेखी आदेश दिले नसले तरी न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याविषयी त्यांनी पोलीस यंत्रणेला सांगितलं आहे. कर्नाटकातही तोंडी आदेश देण्यात आले आहेत.

हरियाणा सरकारने याविषयी कायदेशीर सल्ला घेण्याचं ठरवलं आहे तर काँग्रेसशासित पंजाबमध्ये याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासमोर आलेला आहे.

4. कठुआ प्रकरण : पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण

जम्मूजवळच्या कठुआमधल्या बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबासह सहकारी आणि वकिलांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कठुआमध्ये आमच्या जिवाला धोका होऊ शकतो, अशी भूमिका पीडित कुटुंबीयांतर्फे त्यांच्या वकिलांनी मांडली.

दुसरीकडे त्यांच्या वकील इंदिरा जयसिंह यांनी निःपक्ष सुनावणीसाठी हा खटला चंदिगढला चालवण्यात यावा, अशी मागणी केली होती.

या प्रकरणातील आरोपी सांझी राम याच्यासह अनेक आरोपींनी आपण निर्दोष असल्याचं सांगत आपली नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

5. शिवसेना-भाजप भेट बारगळली

शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे. पण शिवसेनेला युती करायची नसेल तर आमची हरकत नाही, असं भाजप नेते आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Image copyright Twitter

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ त्यांनी मागितली आहे, असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

सोमवारी ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यात भेट होणार होती. पण ठाकरे यांच्या भेटीची वेळ मुनगंटीवारांना मिळाली नसल्याने ही भेट बारगळली.

नाणार प्रकल्प आणि कडेगावमधील शिवसैनिकांची हत्या या कारणांमुळे उद्धव ठाकरे नाराज असल्यानं बैठकीची वेळ पुढे जात असल्याचं समजतं, असं या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)