#5मोठ्याबातम्या - महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते : त्रिपुरा मुख्यमंत्री बिप्लब देब

बिप्लब देब Image copyright Twitter
प्रतिमा मथळा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब

पाहूयात आजच्या विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या.

1. 'इंटरनेट महाभारत काळापासूनच'

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारात काळापासून इंटरनेट होतं, असा दावा केला आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, राजधानी आगरतळामध्ये एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देव म्हणाले, "महाभारत काळात आणखी बऱ्याच तांत्रिक सोयीसुद्धा उपलब्ध होत्या. महाभारतात जे युद्ध झालं ते संजयने धृतराष्ट्राला सांगितलं. संजय हे युद्ध दूरवरून पाहू शकले कारण तेव्हा इंटरनेट उपलब्ध होतं."

"त्या काळात इंटरनेट आणि उपग्रह होते. युरोप आणि अमेरिका ही तांत्रिक प्रगती आपल्यामुळे झाल्याचा दावा करत असले तरी या तांत्रिक यशाचा जनक भारतच आहे. अशा देशात जन्माला आल्याचा मला अभिमान आहे," असं ते म्हणाले.

2. 'मला दिलेला सल्ला मोदींनी स्वतः पाळावा'

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांवर भाष्य करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.

इंडियन एक्सप्रेस च्या बातमीनुसार, "कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मोदींनी मौन पाळलं आहे. मोदी यांनी आपल्याला जो सल्ला दिला होता त्याचंच अनुकरण आता त्यांनी करावं आणि अधिकाधिक बोलावं," असं मनमोहन सिंग म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नोटाबंदीच्या निर्णयावर मनमोहन सिंग यांची पुन्हा एकदा टीका

"माध्यमांमधून मला कळायचं की मी बोलत नसल्याचं सांगत ते माझ्यावर टीका करायचे. ते तेव्हा मला जो सल्ला देत होते, त्याचं पालन आता त्यांनी करावं," असं सिंग म्हणाले.

मोदींनी बलात्काराच्या घटनांवर पाळलेलं मौन सोडलं, याचा मला आनंद झाल्याचं ते म्हणाले. भाजपचे नेते त्यांना 'मौन-मोहन सिंग' असा टोमणा मारायचे. त्याबाबत विचारलं असता मनमोहनसिंग यांनी "आपण अशा प्रकारचे टोमणे झेलतच संपूर्ण आयुष्य जगलो आहोत," असं उत्तर दिलं.

3. 'मला मारण्याचा प्रयत्न!'

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात हालगिरीमध्ये केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातातून ते सुखरूप बचावले.

मात्र हा अपघात नसून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Image copyright ANANT KUMAR HEGADE

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार हेगडे म्हणाले, "हा जरी अपघात वाटत असला तरी तो अपघात नसून मला मारण्याचा प्रयत्न आहे. मी ज्या वाहनात बसलो होतो, ते वेगाने पुढे निघून गेलं आणि त्या ट्रकची धडक ताफ्यातल्या दुसऱ्या एका वाहनाला बसली."

4. नदीत ट्रक कोसळून 21 ठार

मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन त्यात 21 जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक वऱ्हाड घेऊन जात असताना हा अपघात झाला. वऱ्हाडींनी खच्चून भरलेला हा ट्रक पुलावरून थेट सन नदीच्या पात्रात कोसळला. नदीचं पात्र 60-70 फूट खोल होतं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

5. 'एल्गार'वर पोलिसांचे धाडसत्र

नक्षली कारवायांमध्ये गुंतल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी टाकल्या आहेत. पुणे, दिल्ली, मुंबई आणि नागपूरच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, असं लोकमतच्या बातमीतून कळतं.

या धाडी पुण्यातील तीन, मुंबईतील दोन आणि नागपूरमधील एका वकिलाच्या घरांवर पडल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

प्रतिमा मथळा शनिवार वाड्यात एल्गार परिषद.

मुंबईतील रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या 'एल्गार परिषदे'मुळे हे धाडसत्र सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

पण मुख्यमंत्र्यांनी त्याचा इंकार केला आहे.

नक्षली हालचालींशी संबधित असलेल्या लोकांवर केंद्रीय विशेष पथकाकडून देशभर ही कारवाई होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)