राम, सीतेच्या व्यंगचित्रावरून महिला पत्रकाराला धमक्या

कार्टून, व्यंगचित्र. Image copyright Swathi Vadlamudi
प्रतिमा मथळा स्वाती वडलामुदी

एका कार्टूनमधून भाष्य करताना राम आणि सीतेदरम्यानचा संवाद दाखवला म्हणून व्यंगचित्रकार आणि पत्रकार महिलेला लक्ष्य करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरच्या ट्रोल्सबरोबर त्यांना धमक्याही मिळत आहेत.

'गौरी लंकेश हे नाव तुम्ही ऐकलं आहे ना?'

'या बाईला अटक करा'

'हिला दहा बाप आहेत. म्हणून ती असं काहीबाही लिहित आहे.'

पत्रकार स्वाती वडलामुदी यांनी काढलेल्या व्यंगचित्राला मिळालेल्या या काही प्रतिक्रिया वजा धमक्या आहेत. रामायणाचा संदर्भ देत, स्वाती यांनी हे व्यंगचित्र रेखाटलं. या चित्रात राम आणि सीता या रामायणातील व्यक्तिरेखांचा समावेश होता.

कठुआ आणि उन्नाव अत्याचार घटनांनी देशाला हादरवलं. या घटनांनी व्यथित झालेल्या स्वाती यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

व्यंगचित्रात सीता सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन असल्याचं दाखवलं आहे. देशातल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना वर्तमानपत्राचे मथळे होते. सीता रामाला म्हणते, 'रामभक्तांनी पकडून ठेवण्यापेक्षा रावणाने मला ओलीस ठेवलं हे बरं झालं.' व्यंगचित्रातील सीतेच्या तोंडी असलेल्या या उद्गारांनी वादाला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर स्वाती यांना ट्रोल्सनी लक्ष्य केलं आहे.

फेसबुकवर 5000पेक्षा जास्त नेटिझन्सनी हे कार्टून शेअर केलं आहे. ट्विटरवर असंख्य जणांनी हे कार्टून रीट्वीट केलं आहे.

स्वाती एका राष्ट्रीय पातळीवरील दैनिकासाठी वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम करतात. राजकीय आणि सामाजिक विषयांवर उपहासात्मक शैलीत त्या सोशल मीडियावर व्यंगचित्रे काढतात. अशी चित्रं काढणं आवडता छंद असल्याचं स्वाती सांगतात.

हे व्यंगचित्रासंदर्भात स्वाती यांच्याशी बीबीसी तेलुगू प्रतिनिधी पृथ्वीराज यांनी संवाद साधला.

Image copyright Swati Vadlamudi
प्रतिमा मथळा स्वाती यांनी काढलेलं हे व्यंगचित्र

व्यंगचित्र रेखाटण्यामागचा संदर्भ स्वाती यांनी समजावून सांगितला. "काश्मीरातील कठुआ इथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला निर्घृणपणे मारण्यात आले. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे आमदारांच्या घरासमोर एका लहान मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मुलीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. उत्तर प्रदेश सरकारने एका माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधातील खटला मागे घेतल्याचं कथित प्रकरण उघडकीस आल्याने तणाव वाढला होता. या सगळ्याचा संदर्भ कार्टूनला आहे.", असं स्वाती यांनी सांगितलं.

त्या पुढे सांगतात, "बहुतांश घटनांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गुन्ह्यात सामील आहेत किंवा गुन्हा करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे. अनेक भाजप नेत्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी अनेकजण रामभक्त असल्याचं अभिमानाने सांगतात आणि जय श्रीरामच्या घोषणा मोठमोठ्याने देतात. महिलांना आई तसंच देवता म्हणून मान देत असल्याचा ते दावा करतात."

"रावणाने सीतेला ओलीस ठेवलं होतं पण तिच्यावर अत्याचार केले नाहीत. कथित रामभक्तांची बीभत्सता पाहिली तर सीता त्यांच्या तावडीत सापडली असती तर काय अवस्था झाली असती याची कल्पनाच करवत नाही", असंही त्या म्हणाल्या.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती.

व्यंगचित्र अपलोड केल्यानंतर स्वाती यांना इंटरनेटवरून असंख्य धमक्या आल्या. स्वाती यांना अटक व्हावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

धमक्या मिळाल्यानंतर स्वाती यांच्या कुटुंबीयांना चिंतेनं घेरलं आहे. धमक्या मिळू लागल्यापासून मी सुखाने झोपू शकलेले नाही असं स्वाती सांगतात. देशातल्या लोकांची मानसिकता किती मागास पद्धतीची आहे याचं हे द्योतक आहे. पुरुषसत्ताक मानसिकता किती प्रबळ आहे हे सिद्ध होत आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर स्वाती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वाती यांच्या व्यंगचित्राने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असं उजव्या विचारसरणीच्या मंडळींचं म्हणणं आहे.

महिला संघटना तसंच भारतीय पत्रकार संघटनेनं याला प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं आक्रमण असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करणाऱ्या पत्रकारांना प्रत्यक्ष जीवनात तसंच सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आलं आहे.

कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या आकडेवारीनुसार 1992 पासून आतापर्यंत 27 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)