न्या. लोया मृत्यू प्रकरण : चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

ब्रिजगोपाल लोया Image copyright CARAVAN MAGAZINE

न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या 2014 साली झालेल्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या आहेत.

बुधवारी सकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या खंडपीठानं लोया प्रकरणाचा निकाल जाहीर केला. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला.

न्या. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे चौकशी सुरू होती.

तिन्ही न्यायमूर्ती एकाच खोलीत राहिले. त्याबद्दल कोणताही वाद नाही. असं स्पष्ट करतानाच चार न्यायिक अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही, असं निकालात म्हटलं आहे.

याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी निराशा झाली, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. "न्यायमूर्तींनी सांगितलं त्यावर विश्वास ठेवा, असा सूर आहे. कोर्टानं नेमकं काय म्हटलं त्याचा अभ्यास करू", असं त्यांनी निकालानंतर सांगितलं.

या संदर्भात, नागपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैस्वाल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "कोर्टाच्या निर्णयानं सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. न्या. भूषण गवई आणि न्या. शुक्रे यांच्या जबाबांवर आता कोणताही संशय राहिलेला नाही. त्यांनी आपल्या सहकारी न्यायाधीशांच्या मृत्यूबद्दल राजकारण होऊ देण्यास वाव ठेवला नाही हे स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात एका मोठ्या व्यक्तीचं नाव असल्यामुळे या चर्चा होत होत्या. या चर्चा आज थांबल्या आहेत. याचा आम्हाला आनंद आहे."

याचिकाकर्त्यांनी न्यायव्यवस्थेत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं निरिक्षण खंडपीठानं नोंदवलं आहे.

न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या 2014 साली झालेल्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित होत्या. या 2 याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी घेण्यात आल्या.

लोया यांचे पुत्र अनुज यांनी लोया यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांना कोणताही संशय नाही, असं म्हणत चौकशी नको, असं यापूर्वीच म्हटलं आहे.

हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घेऊ या.

न्या. लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

'द कॅरव्हान' या इंग्रजी मासिकाने नोव्हेंबर 2017 मध्ये या प्रकरणात पहिलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार, 1 डिसेंबर 2014 रोजी नागपुरात एका लग्नकार्याला गेले असताना लोया यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. पण 'द कॅरव्हान'ने लोया यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे, अशी मांडणी केली होती.

लोया तेव्हा गाजलेल्या सोहराबुद्दीन शेख एनकाउंटर प्रकरणाची सुनावणी करत होते. त्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुख्य आरोपी होते, म्हणून हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनलं आहे.

म्हणून लोया यांचा गूढ मृत्यूमागे कोण, यावर सविस्तर विश्लेषण करत, काही मोठे प्रश्नही त्यांनी त्या वृत्तात उपस्थित केले होते.

काय होतं सोहराबुद्दीन प्रकरण?

सोहराबुद्दीन अन्वर हुसैन शेख याची 26 नोव्हेंबर 2005 रोजी कथित चकमकीत मारला गेला होता. या चकमकीचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती डिसेंबर 2006ला झालेल्या एका चकमकीत मारला गेला. सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी यांचीसुद्धा हत्या झाली आहे.

प्रतिमा मथळा सोहराबुद्दीन शेख

या हत्येनंतर गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झाले होते आणि त्यांना अटकही झाली होती.

नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली खटला सुरू होता. आणि न्यायालयाच्या आदेशानंतर अमित शाह यांना राज्याच्या बाहेर काढण्यात आलं होतं. नंतर हा खटला गुजरातच्या बाहेर वर्ग करण्याची आणि सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीशांची बदली न करण्याचे आदेश देण्यात आले.

मे 2014 मध्ये सीबीआयचे विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पत यांनी अमित शाह यांना समन्स बजावलं. शाह यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यापासून सूट मागितली. पण न्या. उत्पत यांनी अशी परवानगी दिली नाही.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांची 26 जून 2014ला त्यांची बदली झाली. आणि सोहराबुद्दीन प्रकरण न्या. लोया यांना सोपवण्यात आलं.

त्यांच्यासमोरही अमित शाह उपस्थित झाले नाहीत. त्यानंतर लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा नागपुरात मृत्यू झाला.

न्या. लोया यांच्यानंतर एम. बी. गोसावी यांच्या चौकशी समितीनं आरोपांना नामंजूर केलं आणि अमित शाह यांना 30 डिसेंबर 2014 रोजी दोषमुक्त केलं.

इंडियन एक्सप्रेसचे प्रश्न

'द कॅरव्हान'चे पहिल्या वृत्तानंतर इंडियन एक्सप्रेसने 27 नोव्हेंबर 2017 रोजी एक बातमी छापत काही नवी माहिती प्रकाशात आणली, आणि 'द कॅरव्हान'च्या वृत्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

'द कॅरव्हान' मासिकात लोया यांना रिक्षातून हॉस्पिटलला नेण्यात आल्याचं म्हटलं होतं. पण लोया यांच्या बहिणीनं, जर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तर त्यांचा ECG का काढला नाही, असा सवाल केला होता.

Image copyright INDIAN EXPRESS

पण इंडियन एक्सप्रेसनं प्रसिद्ध केलेल्या बातमीत लोया यांचा ECGचा रिपोर्टसुद्धा प्रसिद्ध केला होता. नागपूरच्या दंदे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने लोया यांचा ECG काढण्यात आला होता आणि त्यांना कारने आणण्यात आलं होतं, असा खुलासा केल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

याला एका न्यायाधीशानं दुजोरा दिल्याचं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं होतं.

त्यानंतर ECGच्या तारखेवरून एक नवा वाद उपस्थित झाला. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार ECGची तारीख 30 नोव्हेंबर म्हणजेच लोयांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीची होती. त्यावर ECGचा डिफॉल्ट टाईम हा अमेरिकेचा होता, असा खुलासा करण्यात आला.

लातूर बार असोसिएशनची मागणी

या प्रकरणी 27 नोव्हेंबरला महाराष्ट्रात लातूर शहर बार असोसिएशननं लोया यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी एका न्यायालयीन आयोग नेमण्याची मागणी केली होती. बीबीसीशी बोलताना लोया यांचे मित्र आणि लातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष उदय गवारे म्हणाले, "जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हापासून ते दबावात होते. म्हणून हे सगळंच संशयास्पद होतं."

त्यांच्या मते, "आम्ही अंत्यविधीला गेलो होतो तेव्हाच तेथे चर्चा होती का मृत्यू नैसर्गिक नाही. यात काहीतरी गडबड आहे. त्यांचे कुटुंबीय दबावाखाली होते आणि ते बोलायला तयार नव्हते. मासिकात जो लेख आला आहे, त्यामुळे ही शंका उपस्थित होतेच. तीन वर्षांनंतर या मुद्दयावर का बोलू नये?"

दोन पत्रं, दोन दावे

'द कॅरव्हान'चे राजकीय संपादक हरतोष सिंग बाल यांनी अनुज लोया यांची दोन पत्र ट्वीट केली आहेत. पहिलं पत्र अनुज लोया यांनी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारं होतं.

तर दुसर पत्र 'द कॅरव्हान'चं वृत्त प्रकाशित झाल्यानंतरचं आहे. वडिलांच्या मृत्यूबाबत त्यांना कसलीही शंका नाही, असा या पत्राचा आशय आहे.

'द कॅरव्हान' च्या मते ही दोन्ही पत्रं अनुज यांच्या जवळच्या मित्रानं पाठवली होती.

Image copyright Twitter/ Hartosh Singh Bal

हरतोष बाल यांनी अनुज लोया यांच्या पत्रकार परिषदेनंतर ट्वीट करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

"अनुज यांनी पहिल्या चिठ्ठीचा इन्कार केलेला नाही आणि कुटुंबानं जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याचा कोणताही व्हीडिओ नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर कोणाचंच नुकसान होणार नाही. उलट संशयाचं धुकं दूर होईल," असं ते म्हणाले आहेत.

लोया यांचा मृत्यू आणि सर्वोच्च न्यायालय

न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं 4 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच दरम्यान काँग्रेसचे नेते तहसीन पुनावाला यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी 12 जानेवारीला पत्रकार परिषद घेतली तेव्हा ज्या संवेदनशील खटल्याबद्दल ते बोलत आहेत, तो खटला म्हणजे 'न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा आहे का?' या प्रश्नावर न्या. गोगोई यांनी होकारार्थी उत्तर दिलं.

न्या. लोया यांच्या मृत्यूवर महाराष्ट्राचे पत्रकार बंधुराज लोणे यांनी एक याचिका दाखल केली आहे. या दोघांनी मिळून हे प्रकरण न्यायालयात नेलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)