सोशल : 'मुख्यमंत्र्यांनी सकाळी लोकलनं प्रवास करावा, सर्व गैरसमज क्षणात दूर होतील'

देवेंद्र फडणवीस Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

राज्यात गेल्या तीन वर्षांत 4 हजार कोटी रुपये खर्च करून 60 लाखांपेक्षा अधिक शौचालयांचं बांधकाम केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत राज्य हागणदारीमुक्त आणि शौचालययुक्त झाल्याची घोषणा केली. त्यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसंच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता. त्यावर वाचकांनी मांडलेली ही काही निवडक मतं.

प्रणिल राजेंद्र बडगुर्जर यांनी यावर बोलताना मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, "मुख्यमंत्र्यांना म्हणावं सकाळी सकाळी कल्याण-सीएसटी लोकलनं प्रवास करा. सर्व गैरसमज क्षणात दूर होतील."

Image copyright FACEBOOK

याच आशयाची प्रतिक्रिया रामराव गेजगे यांनी दिली आहे. ते म्हणतात, "AC मध्ये बसून कोणीही सांगेल की महाराष्ट्र हागणदारीमुक्त झालाय. पण जरा गावामध्ये सकाळी येऊन बघा म्हणजे खरं काय ते समजेल."

Image copyright FACEBOOK

तुषार अहेर यांनी मात्र शौचालय न वापरण्याचं कारण सांगितलं आहे. "सक्तीचं केल्यामुळे गावांत शौचालयं बांधण्यात आली. पण आता त्यासाठी पाणी जास्त लागतं म्हणून गावकरी त्याचा वापर करत नाहीत," असं ते म्हणतात.

Image copyright FACEBOOK

किशोर गंगाखेडकर म्हणतात की, "कोणतीही योजना 100 टक्के यशस्वी होत नसते. शासनानं निधी दिला आणि लोकांची मनापासून तयारी असली तरच योजना यशस्वी होते. त्यात सरकारचा काहीही दोष नसतो."

Image copyright FACEBOOK

"काही लोकांना हवेशीर वातावरण आवडते, त्याला सरकार काय करणार?" असं नीलेश झगडे म्हणतात.

Image copyright FACEBOOK

सुरज सोनवणे गुरव मात्र स्वत:च्या तालुक्याबदद्ल सांगतात. "आमचा तालुका अजून हागणदारीमुक्त व्हायचा बाकी आहे," असं ते म्हणतात.

Image copyright FACEBOOK

पांडुरंग देशमुख यांनी मात्र महाराष्ट्र म्हणजे वर्षा बंगल्यापुरता मर्यादित आहे काय? असा सवाल केला आहे.

Image copyright FACEBOOK

ट्वीटरवर सुरज काळे यांनी हागणदारी कागदोपत्री झाली असं म्हटलं आहे. "आमच्या गावात 15 वर्षं झाली नळाला पाणी येत नाही, शौचालयाला काय वापरणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.

Image copyright FACEBOOK

हागणदारीमुक्त मोहिमेत सरकारला 70 टक्के यश आल्याचं सुनील ढेंगळे सांगतात. "पूर्वी कोणतंही गाव लागायच्या आत घाण वास यायचा आणि रस्त्यावर शौच करताना मंडळी दिसायची. पण आता प्रमाण बरंच कमी झालं आहे," असं ते म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)