#5मोठ्या बातम्या : अमित शहा यांचं सत्य सर्वांना माहीत आहे : राहुल गांधी

अमीत शहा Image copyright Getty Images

न्या. लोया यांच्या मृत्युप्रकरणी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर यावर विरोधी पक्षांमधून प्रतिक्रिया उमटल्या. अमित शहा यांचं सत्य सर्वांना माहीत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. ही आणि याबरोबरच आजच्या पाच मोठ्या बातम्यांवर एक धावती नजर...

1. अमित शहा यांचं सत्य सर्वांना माहीत आहे - राहुल गांधी

अमित शहा यांचं सत्य भाजपातील सदस्यांना ठाऊक आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे, असं वृत्त मनी कंट्रोल डॉट कॉमनं दिलं आहे.

भारतीय लोक बुद्धिमान आहेत. भाजपमध्ये असलेले लोक देखील बुद्धिमान आहेत, त्यांना अमित शाह चांगले माहीत आहेत. अमित शाह यांच्याबद्दलचं सत्य सर्वांना माहीत आहे, जनतेच्या नजरेतून काही सुटलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. या अर्थाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

याआधी, भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. जस्टिस लोया प्रकरणात न्यायालयात राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच याचिका दाखल झाल्या होत्या, असं पात्रा यांनी म्हटलं होतं.

2. पित्याचा सामूहिक बलात्कारात सहभाग

Image copyright Gopal shunya/bbc

आपल्या 35 वर्षीय मुलीला आपल्या मित्रांकडे सोपवून, एका पित्याने आपल्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारात सहभाग घेतल्याची घटना घडली असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

लखनौपासून 70 किमी दूर असलेल्या सीतापूरमध्ये ही घटना घडली. तीन संशयितांपैकी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. इतर दोघा जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

15 एप्रिल रोजी पित्याने मुलीला कमलापूर येथे जत्रेसाठी नेलं. त्या ठिकाणी त्याने मान सिंह नावाच्या व्यक्तीला बोलवलं. या व्यक्तीबरोबर तू जा मी पाठीमागून येईन, असं पित्यानं तिला सांगितलं. ती त्याच्यासोबत गेली आणि एका घरात तिच्यावर पित्यासह इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. तिला त्या ठिकाणी 18 तास कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिनं तिथून पळ काढला आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

3. पाच वर्षांमध्ये आमदाराच्या संपत्तीमध्ये 589 कोटी रुपयांची वाढ

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी गुजरातमधील आमदारांची कर्नाटकात राहण्याची सोय करणारे कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या संपत्तीत 589 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं शपथपत्र सादर केलं आहे. बंगळुरू जवळच्या कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढवणार आहेत. 2013 साली त्यांची संपत्ती 251 कोटी होती, आता शिवकुमार यांनी त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये इतकी आहे, असं त्यांनी घोषित केलं आहे.

4. सीआरझेडची मर्यादा 50 मीटरवर

सागरी हद्द नियमनाअंतर्गत बांधकामांना असलेली 500 मीटरची मर्यादा 50 मीटरवर आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं कोकणात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असं म्हटलं जात असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

सागरी नियमन क्षेत्रात (सीआरझेड) बांधकामांवर निर्बंध लादणाऱ्या निकषात बदल करण्यास केंद्र सरकारने गुरुवारी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायाला गती मिळेल, तसंच बांधकाम व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात जमीन खुली होईल.

राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात सीआरझेडच्या निकषात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. कर्नाटक आणि केरळ राज्याप्रमाणे सीआरझेडची मर्यादा ५० मीटपर्यंत आणावी, असे या प्रस्तावात म्हटलं होतं. पण पर्यावरणवाद्यांचा याला विरोध आहे.

5. मिलिंद एकबोटे यांना जामीन

Image copyright facebook

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांचा जामीन पुणे सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष असलेल्या एकबोटेंसाठी हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

मिलिंद एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा अॅट्रोसिटी तसंच दंगल घडवण्याबाबतचा आहे. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला दुसरा गुन्हा हिंसाचार आणि जाळपोळीचा आहे. हिंसाचाराच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)