पावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी?

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी
भेंडवळमध्ये घटमांडणीतून पावसाचा अंदाज सांगतात.

फोटो स्रोत, JAIDEO WANKHEDE

फोटो कॅप्शन,

भेंडवळमध्ये घटमांडणीतून पावसाचा अंदाज सांगतात.

राज्यात पीक परिस्थितीसह पाऊसही सर्वसाधारण असणार, अशी भविष्यवाणी यंदाच्या भेंडवळमधून करण्यात आली आहे.

यंदा कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिकं चांगली येतील. तसंचत भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही, देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असंही सांगण्यात आलंय.

पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस ,जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. तसंच अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

तसंच गेल्या वर्षीप्रमाणे देशात आणि राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

भेंडवळनं 2014 ते 2018 या 5 वर्षांत पावसाबद्दल सांगितलेली भविष्यवाणी आणि प्रत्यक्षात झालेला पाऊस यांच्यातला फरक या तक्त्यातून जाणून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहिल, देशाची सत्ता स्थिर राहिल, नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता, चारा-पाण्याची टंचाई निर्माण होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

वाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करतात. भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल सारंगधर महाराज सांगतात, "आम्ही सांगत असलेलं भाकीत 70 ते 75 टक्के खरं ठरतं. गेल्या 20 ते 25 वर्षांपासूनचा तसा रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे."

पण भेंडवळच्या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही अशी टीका होते. यावर महाराज सांगतात की, "आमच्या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार नसेलही पण नैसर्गिक आधार आहे. कारण निसर्गातल्या घडामोडींवरूनच आम्ही भाकीत सांगतो. हवामान खातं जसं हवामानाचा अंदाज व्यक्त करतं तसंच आम्हीही अंदाजच व्यक्त करतो. याबाबत कुणीच एकदम अचूक असू शकत नाही."

'या भविष्यवाणीला तार्किक आधार नाही'

भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) वेगळी भूमिका आहे. समितीतर्फे एक पत्रक काढण्यात आलं. त्यात भेंडवळच्या घटमांडणीला शास्त्रीय आधार नाही, असं म्हटलं आहे.

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, SURESH MANKAR

फोटो कॅप्शन,

घटापासून दीड फुटांच्या अंतरावर 18 प्रकारची धान्यं ठेवली जातात.

"भेंडवळच्या भविष्यवाणीला कुठलाही तार्किक आधार नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या वस्तूला कशाचंही प्रतीक कसं काय मानू शकता? शेतामध्ये उघड्यावर काही पदार्थ घट घालून मांडणे व दुसऱ्या दिवशी त्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या झालेल्या बदलाचा आधार घेऊन देशाचं भविष्य वर्तवणं ही पद्धत अयोग्य आहे," असं अविनाश पाटील सांगतात.

"संदिग्धता ठेवणं ही भविष्यवाल्यांची खरी खासियत असते. ते कधीच अमक्या एका जिल्ह्यात इतका इतका पाऊस पडेल असं सांगत नाहीत. त्यांच्या भविष्यवाणीत कधीच नेमकेपणा नसतो. भविष्यवाणी करताना ही मंडळी अतिशय मोघमपणे संपूर्ण देशातल्या पावसाबद्दल सांगतात. म्हणजे आपण म्हटलं, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पाऊस नाही पडला, तर तुमच्याकडे नसेल पडला पण देशात इतर ठिकाणी तर पडला ना, असं म्हणायला हे मोकळे असतात," पाटील पुढे सांगतात.

फोटो स्रोत, SURESH MANKAR

फोटो कॅप्शन,

विदर्भातले शेतकरी या घटमांडणीकडे लक्ष ठेवून असतात.

याबद्दल पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचं मत जाणून घेतलं.

"सृष्टीमधल्या निरीक्षणांवरून भेंडवळमध्ये भाकीत वर्तवलं जातं. पण त्यासाठी नेमके कोणते घटक लक्षात घेतले हे कधीच सांगितलं जात नाही. त्यामुळे त्याला विज्ञान कसं म्हणणार?" असा सवाल देऊळगावकर उपस्थित करतात.

"शिवाय ज्याचा पायाच चुकीचा आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक अर्थ नाही त्यावर विश्वास ठेवायचा कसा? काही लोकांना यातून मानसिकरित्या बरं वाटत असेल एवढाच या भविष्यवाणीचा मी अर्थ काढतो," असं देऊळगावकर म्हणतात.

व्हीडिओ कॅप्शन,

रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा? गावाकडची गोष्ट

70 ते 75 टक्के भविष्यवाणी खरी ठरते या सारंगधर महाराज यांच्या दाव्यावर देऊळगावर सांगतात की, "त्यांची भविष्यवाणी किती टक्के खरी ठरते, यावर मी काही विश्वास ठेवणार नाही. कारण भविष्यवाणी बरोबर ठरल्यास ही मंडळी त्याबद्दल सांगत सुटतात पण चुकल्यानंतर मात्र कुणीही समोर येत नाही."

'हवामान खातं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे'

विदर्भातले अनेक शेतकरी या भविष्यवाणीवर लक्ष ठेवून असतात. याविषयी देऊळगावकर सांगतात की, "इथे शेतकऱ्याची मानसिकता लक्षात घ्यायला हवी. आपल्याला कुणीतरी आशा दाखवावी असं शेतकऱ्यांना वाटत असतं. त्यामुळे मग कधी पंचांग तर कधी कुणी जाणता त्यांना काही ना काही सांगत राहतो. भेंडवळची भविष्यवाणीही याच प्रकारात मोडते. यातून त्यांना एक प्रकारचा मानिसक आधार मिळतो. याशिवाय दुसरं काहीही होत नाही."

फोटो स्रोत, AVINASH PATIL/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

भेंडवळमध्ये गेल्या 315 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

"खरं तर हवामान विभागानं शेतकऱ्यांना फोनवर मॅसेज करून पाऊस पडणार की नाही, हे सांगायला हवं. जोवर हे होत नाही तोवर शेतकरी या भाकीतावर विश्वासच ठेवतील. यासारख्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्यांना शिक्षित केलं पाहिजे," अशी अपेक्षा देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

भेंडवळच्या भविष्यवाणीला माध्यमांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळते. पण पुढे ही भविष्यवाणी किती खरी ठरते, यावर माध्यमं भाष्य करताना दिसत नाहीत. यावर देऊळगावकर म्हणतात की, "प्रसिद्धी माध्यमांनी भेंडवळसारख्या गोष्टींकडे लक्षच देऊ नये. यासारख्या अंदाजांना वर्तमानपत्रांत स्थानच असता कामा नये. जर द्यायचं असेल तर गेल्या 50 वर्षांत यांचं भाकीत किती खरं ठरलं, किती खोटं ठरंल, का ठरलं, त्यामागची कारणं काय हे स्पष्टपणे सांगायला हवं. म्हणजे मग त्यामागचं विज्ञान समजून घ्यायला मदत होईल."

घटमांडणीची परंपरा

जवळपास 315 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलडाण्यातल्या भेंडवळ इथे घटमांडणीची परंपरा सुरू केली. या परंपरेनुसार, वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरच्या शेतात घटाची मांडणी करतात.

फोटो स्रोत, JAIDEO WANKHEDE

फोटो कॅप्शन,

धान्याला प्रतीक मानून भाकीत वर्तवलं जातं.

यासाठी शेतात 1 फूट खोल खड्डा खणण्यात येतो. खड्डा खोदताना त्यातून बाहेर पडलेल्या मातीतून 4 ढेकळं बाहेर काढतात. या 4 ढेकळांकडे पावसाच्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ जून, दुसरं जुलै, तिसरं ऑगस्ट तर चौथं ढेकूळ म्हणजे सप्टेंबर.

नंतर या 4 ढेकळांवर पाण्यानं भरलेली मातीची घागर ठेवली जाते. या घागरीवर करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवले जातात.

व्हीडिओ कॅप्शन,

हवामान अंदाजावर विश्वास ठेवायचा का?

घटापासून दीड फुटांच्या अंतरावर 18 प्रकारची धान्यं ठेवली जातात. यामध्ये अंबाडी, कपाशी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, तीळ, बाजरी, मटकी, जवस, वटाणा यांचा समावेश असतो. शिवाय घटाशेजारी पानाचा विडा ठेवला जातो. त्यावर सुपारी ठेवण्यात येते.

अशी करतात भविष्यवाणी...

रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घटातल्या बदलांचं निरीक्षण करून भाकीत वर्तवलं जातं. जसं यंदा या 18 धान्यांपैकी मुगाचे दाणे हे आहे त्या परिस्थितीत न राहता बाहेर फेकले गेले. त्यामुळे मग यंदा मुगाचं उत्पादन चांगलं होईल, असं भाकीत वर्तवण्यात आलं. जर धान्यं आतल्या बाजूस फेकलं गेलं, तर उत्पादन कमी होईल, असं मानतात.

पाऊस किती पडणार, हे कोणत्या ढेकळावर घागरीतलं किती पाणी पडलं यावरून ठरवलं जातं. जसं की, यंदा पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ थोडंफार भिजल्यानं जून महिन्यात साधारण पाऊस होईल असं सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, JAIDEO WANKHEDE

फोटो कॅप्शन,

भेंडवळच्या भविष्यवाणीला तार्किक आधार नाही, अशी अंनिसची भूमिका आहे.

पानाच्या विड्यावरल्या सुपारीकडे राजाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. सुपारी आहे त्या जागी कायम राहिल्यास राजा गादीवर कायम राहील, असं भविष्य वर्तवण्यात येतं. जसं यंदा विडा आहे त्या परिस्थितीत आढळला असला तरी थोडाफार सुकलेला होता. त्यामुळे यंदा राजा गादीवर कायम राहील, पण त्याला संकटांना सामोरं जावं लागेल, असं भाकीत वर्तवण्यात आलं.

शिवाय घागरीवर ठेवलेल्या करंजीवरून आर्थिक परिस्थितीबद्दलचा अंदाज लावतात. करंजी गायब झाल्यास आर्थिक परिस्थिती खालावेल, असं सांगितलं जातं. यंदा मात्र करंजी आहे त्या जागेवर कायम आढळल्यानं अर्थव्यवस्था सुरळीत चालेल, असं सांगण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)