World Book Day: 'फास्टर फेणे'चा बंगाली भाऊ 'फेलूदा'

फेलूदा Image copyright ROHAN PRAKASHAN

'लालमोहनबाबूंच्या आग्रहामुळे आम्ही अखेर 'जात्रा' बघायला गेलो. जात्रा म्हणजे आपल्याकडच्या तमाशाच्या फडाप्रमाणे गावोगावी फिरून नाटकाचं खुल्या मैदानावर प्रयोग करणारी कंपनी. 'भारत ऑपेरा' या प्रसिद्ध कंपनीचं 'सूर्यतोरण' हे ते नाटक होतं. हे चांगलं नाटक होतं. कथा आणि अभिनय मेलोड्रामासारखा असला, तरी नटांच्या अभिनयानं प्रेक्षकांना सबंध वेळ खिळवून ठेवलं होतं. ते सर्व अनुभवी नट होते हे उघड होतं आणि लोकांना काय आवडेल हे लेखकाला चांगलंच ठाऊक होतं.'

''मी ज्या कथा लिहितो तशीच ही कथा होती, नाही?' असा शेरा लालमोहनबाबूंनी मारला. 'जर नाटकाचा टीकात्मकदृष्ट्या विचार केला, तर तुम्हाला हजारभर दोष आढळतील. तरीही त्यांनी तुमची बराच वेळ करमणूक केली. बरोबर आहे ना, फेलूबाबू?'' (रोहन प्रकाशन यांच्या सौजन्यां)

या अशा प्रस्तावनेनं गोष्ट सुरू होते. यातल्या 'आम्ही'मध्ये सहभागी असतात ते, लालमोहन गांगुली, तपेश मित्तीर आणि फेलूदा ही सत्यजित रे यांनी निर्माण केलेली तीन पात्रं! या तीनही पात्रांनी बंगालमध्ये गेल्या तीन-चार दशकांपासून धुमाकूळ घातला आहे.

चित्रपट दिग्दर्शक म्हणून सत्यजित रे जगविख्यात होते, हे सगळ्यांनाच माहीत असतं. त्यांची अपु ट्रायॉलॉजी, शोनार किल्ला असे चित्रपटही आवर्जून पाहिलेले असतात.

Image copyright DOMINIQUE FAGET/AFP/GETTY IMAGES

पण याच 'शोनार किल्ला'मधल्या फेलूदाला केंद्रस्थानी ठेवून सत्यजित रे यांनी एक-दोन नाही तर तब्बल 30 दीर्घकथा लिहिल्या आहेत. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या या कथा बंगालमध्ये आबालवृद्धांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. आपल्या मराठीत भा. रा. भागवत यांनी जसा फास्टर फेणे लिहिला आहे, तसाच हा फेलूदा!

या 30 कथांपैकी सर्वांत पहिली कथा होती ती, बादशाहची अंगठी या नावाची लखनऊमध्ये घडणारी कथा!

फेलूदाचं वेगळेपण!

सत्यजित रे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य इथं प्रकर्षानं जाणवतं. त्यांनी या कथा लिहिल्या आहेत त्या किशोरवयीन मुलांना डोळ्यासमोर ठेवून! त्यामुळे त्यांनी केवळ रंजकपर कथा न लिहिता त्यात काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे.

फेलूदा कोलकातामध्ये राहत असला, तरी या कथा फक्त कोलकातामध्येच घडत नाहीत. सत्यजित रे वाचकांना बनारस, काठमांडू, सिमला, दार्जिलिंग, अजंठा-वेरूळ, मुंबई, लखनऊ, हरिद्वार-ऋषिकेश, बंगालमधली जंगलं, तराईचा प्रदेश, राजस्थान असं देशभरातच नाही, तर हाँगकाँग आणि लंडनमध्येही फिरवतात.

Image copyright ROHAN PRAKASHAN

या प्रत्येक शहरातील प्रेक्षणीय स्थळं, त्या शहराचा इतिहास, महत्त्वाचे रस्ते, खाद्यसंस्कृती अशा सगळ्याची सैर सत्यजित रे घडवतात.

उदाहरणादाखल बोलायचं, तर वर उल्लेख केलेल्या कथेच्या सुरुवातीलाच रे आपल्याला बंगालमधल्या 'जात्रा' या नाटक कंपन्यांच्या प्रकाराबद्दल माहिती देतात.

राजस्थानमध्ये प्रवास करताना राजस्थानी पद्धतीची मिठाई, मुंबईतल्या एका कथेत चौपाटीचं वर्णन, पुरीमधला समुद्रकिनारा, बनारसचे घाट अशा गोष्टी अगदी सहजपणे या कथांमध्ये येतात.

या कथा आपल्याला फेलूदाचा लहान भाऊ तपेश सांगतो. किंबहुना तपेशनेच या कथा फेलूदाच्या प्रकाशकांसाठी लिहिल्या आहेत, असं रे यांनी भासवलं आहे. त्यामुळे कथेत 'मी', 'आम्ही' असे शब्द येतात. परिणामी कथा वाचताना फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू यांच्याबरोबर आपणही त्या साहसात सामील आहोत, असं वाटत राहतं.

साहस आणि थरार

फेलूदा आपल्या फास्टर फेणेसारखाच गुप्तहेर आहे. बंगालीत त्याला सत्यान्वेषी म्हणतात. त्याचं खरं नाव प्रदोष मित्तीर! पण बंगालमध्ये प्रत्येकाला त्याच्या पाळण्यातल्या नावाबरोबरच एक 'डाकनाम' किंवा टोपणनाव असतं. फेलूदा हे त्याचं डाकनाम आहे.

तो तरुण आहे, साहसी आहे, चपळ आहे आणि त्याची बुद्धिमत्ता लाजवाब आहे. आजूबाजूच्या अनेक बारीक गोष्टी तो टिपतो. लोक कसे वागतात, त्यांच्या सवयी काय आहेत, लकबी काय आहेत, त्यांच्या पूर्वायुष्यात काय घडलं, या सगळ्याची माहिती तो मिळवतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो.

Image copyright AFP/GETTY IMAGES

या गोष्टींमध्ये कधी त्याची गाठ तस्करांशी पडते, तर कधी एखाद्या गावातल्या कुख्यात गुंडाशी, कधी तो एखाद्या चांगल्या घरातल्या पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाचं पितळ उघडं करतो, तर कधी सराईत गुन्हेगारांशी दोन हात करतो.

अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या वाचणाऱ्यांना हर्क्युल पॉयरॉ आणि त्याची कार्यपद्धती ठाऊक असते. पॉयरॉ प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सगळ्यांना एकत्र जमवून रहस्यभेद करतो. सत्यजित रे यांच्या फेलूदाचाही यात हातखंडा आहे. 'तपेश'च्या भाषेतच सांगायचं, तर तलवारीसारख्या धारदार भाषेत फेलूदा रहस्यभेद करतो.

या कथा लहान मुलांना तर खिळवून ठेवतातच, पण मोठ्यांनाही त्या वाचायला आवडू शकतात. याचं आणखी एक कारण म्हणजे फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू उर्फ जटायू अनेक साहसी प्रकार करतात. आपणही ते साहस करून बघावं, असं कोणालाही कोणत्याही वयात वाटू शकतं.

Image copyright ROHAN PRAKASHAN
प्रतिमा मथळा फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू आपल्याला वेगळ्याच दुनियेत नेतात

'सोनेरी किल्ला' या राजस्थानमध्ये घडणाऱ्या कथेत ते उंटांवरून गुन्हेगारांचा पाठलाग करतात, 'दफनभूमीतील गूढ' उकलण्यासाठी पार्क स्ट्रीट, कोलकातामधल्या दफनभूमीत मध्यरात्री पाळत ठेवायला जातात, 'रॉयल बेंगॉलचं रहस्य' उलगडण्यासाठी शिकारीला जातात, एका गुन्हेगाराच्या तावडीत सापडल्यावर सुराफेकीचा सामनाही करतात.

या कथांमधली आणखी एक बाब म्हणजे इथे कुठेही अवास्तव हिंसा नाही. या कथा लहान मुलांसाठी प्रामुख्यानं लिहिल्या असल्यानं ते भान बाळगलं आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे मूळ बंगाली असलेल्या या सगळ्या कथा मराठीत आणताना ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी त्याचा मूळ लहेजा तसाच ठेवला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)