अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासाठी काय आहेत जगभरात शिक्षा?

फाशीची शिक्षा Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी, ही मागणी जोर धरतेय.

सूरत, कठुआ, उन्नाव असो की दिल्ली... तारीख आणि ठिकाणं वेगवेगळी आहेत. पण या सर्व घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला हे सत्य सर्वांसमोर आहे. बलात्काराची प्रत्येक घटना वेदनादायी तसंच बिभत्सही होती.

म्हणूनच भारतात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरतेय. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय ही घेण्यात आला.

काहींचा फाशीच्या शिक्षेलाच विरोध आहे. तर काहींच्या मते, फाशीची शिक्षा दिली गेली तर मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल. तर काही जण बलात्कारसंबंधी असलेल्या कायद्यांची पाठराखण करतात.

या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातल्या इतर देशांमध्ये नेमकी काय शिक्षा आहे, हे जाणून घेऊ.

भारतातील कायदा काय सांगतो?

भारतात दुर्मिळातल्या दुर्मीळ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते.

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा गुन्हा 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

मात्र मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांनी 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचं विधेयक तयार केलं आहे. आता कायदा बनण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दिल्लीतही असा कायदा संमत करण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी उपोषण सुरू केलंय. बलात्कारांतील गुन्हेगारांना 6 महिन्यांच्या आत फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानेही या राज्यांच्या नव्या विधेयकाचा आधार घेत देशपातळीवर पोक्सो कायद्यात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

जगभरात काय आहे शिक्षा?

बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. अनेक देशांमध्ये बलात्कारापेक्षा बाल लैंगिक शोषण हा अधिक मोठा गुन्हा समजला जातो.

दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या रिसर्च असोसिएट्स नीतिका विश्वनाथ सांगतात, "काही देशांमध्ये फाशी शिक्षा दिली जाते पण ती अल्पवयीन मुलावरील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दिली जात नाही. तर काही देशांमध्ये फाशीच्या शिक्षेचा अंतर्भावच नाही."

Image copyright Getty Images

बलात्कार आणि फाशीची शिक्षा

"वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या देशांना रिटेशनिस्ट म्हटलं जातं," अशी माहिती नीतिका विश्वनाथ देतात.

त्यांच्या मते, "अनेक रिटेशनिस्ट देशांमध्येही अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा दिली जात नाही. पण लहान मुलांच्या लैंगिक हिंसेसाठी कठोर शिक्षेची कायद्यात तरतूद आहे."

'हक सेंटर फॉर चाईल्ड राईट्स'ने अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वेगवेगळ्या देशांत कोणती शिक्षा सुनावली जाते, याविषयी 2016 मध्ये एक रिपोर्ट लिहिला आहे.

मलेशियामध्ये बाल लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते.

सिंगापूरमध्ये चौदा वर्षांच्या बालकावर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला 20 वर्षं तुरुंगवास भोगावा लागतो. शिवाय कोडे मारण्याची आणि दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेत 2008 पर्यंत अल्पवयीन मुलांवरील बलात्कारासाठी फाशीची शिक्षा होती.

अमेरिकेत लहान मुलांवर झालेल्य बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती. पण 2008मध्ये बलात्काराच्या एका घटनेवरील सुनावणीत फाशीची शिक्षा बेकायदेशीर असल्याचं नमूद केलं गेलं. कोर्टाने म्हटलं की, घटनेत मृत्यू झालेला नसल्याने त्यातील गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा देणं म्हणजे गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी ठरते. त्यामुळे आता तिथे बलात्काराच्या घटनेत फाशीची शिक्षा दिली जात नाही.

अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी कायद्यात शिक्षेच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

कठोर शिक्षा सुनावणारे देश

लहान मुलांवरील बलात्कारासाठी सर्वात कठोर कायदे फिलिपाईन्समध्ये आहेत. अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला 40 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. त्या शिक्षेदरम्यान पॅरोलही मिळत नाही.

ऑस्ट्रेलियात अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

कॅनडा या देशात 14 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते.

इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्याचं सिद्ध झाल्यास 6 वर्षांपासून ते 19 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसंच जन्मठेपही होऊ शकते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जर्मनीत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

जर्मनीत बलात्कारानंतर मृत्यू किंवा हत्या झाल्यास गुन्हेगार व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते.

दक्षिण आफ्रिकेत बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्या वेळेस 15 वर्षं, तर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 20 वर्षं आणि तिसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

न्यूझिलंड या देशात अशा गुन्ह्यासाठी 20 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे.

'अॅमनेस्टी इंटरनॅशनल'च्या 2013च्या रिपोर्टनुसार लहान मुलांसंबंधी गुन्ह्यांसाठी जगभरात फक्त 8 देशांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये चीन, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, यमन आणि सुदान या देशांचा समावेश आहे.

'हक सेंटर फॉर चाईल्ड राईट्स'च्या कार्यकर्त्या भारती अली यांच्या मते, "अनेक देश फाशीच्या शिक्षेवर बंदी घालत आहेत. आपल्या देशात फाशीच्या शिक्षेचं समर्थन करणाऱ्यांनी विचार करायची गरज आहे. फाशीची शिक्षा लागू झाल्यास बलात्कारी व्यक्ती बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीची हत्या करु शकते."

(टीप : प्रत्येक देशात अल्पवयीन आणि बलात्काराची व्याख्या वेगवेगळी आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)