नरोडा पाटिया : 'असे लोक सुटले तर दुःख होणारच'

महिला

नरोडा पाटिया दंगल प्रकरणात गुजरात हायकोर्टानं शुक्रवारी भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांचे खाजगी सचिव किरपाल सिंह यांचीही सुटका करण्यात आली. मात्र, बजरंग दलाचे नेते राहिलेल्या बाबू बजरंगी यांची जन्मठेप कमी करून 21 वर्षं करण्यात आली.

या निकालानंतर बीबीसी गुजराती सेवेचे प्रतिनिधी सागर पटेल यांनी नरोडा पटिया इथं पीडितांशी चर्चा केली. या प्रकरणातील एक पीडित रुकसाना यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली. त्यांच्या कुटुंबातील दोन जणांची हत्या करण्यात आल्याचं रुकसाना यांनी सांगितलं.

रुकसाना सांगतात, "आमचं 8 जणांचं कुटुंब इथेच राहत होतं. 2002मधली गोष्ट आहे. मी नाश्ता करत होते आणि माझी बहीण जिची हत्या झाली ती तेव्हा कपडे धूवत होती. माझ्या आईचाही या दंगलीत मृत्यू झाला. आम्ही घरात असतानाच बाहेर गोंधळ सुरू झाला. त्यामुळे आम्ही सगळे गोपीनाथ गंगोत्री सोसायटीच्या दिशेनं पळालो. पण, तेव्हा आम्हाला सगळ्यांनी घेरलं."

रुकसाना सांगतात की, त्या वेळी त्यांची बहीण, आई आणि शेजारीच्या अनेकांना मारण्यात आलं.

प्रतिमा मथळा माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

तुम्हाला तेव्हा काय मदत मिळाली, या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा गंगोत्री सोसायटीच्या दिशेनं पळालो तेव्हा आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. या निकालावर खूष नसल्याचं त्या सांगतात.

रुकसाना पुढे सांगतात, "मी या निकालावर खूष नाही. एक महिला असूनही त्यांनी महिलांसोबतच वाईट कृत्य केलं आहे, लोकांना मारलं आहे. महिलेनंच महिलांच्या इज्जतीचं रक्षण केलेलं नाही. हेच जर त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या मुलीसोबत झालं असतं तर चाललं असतं का? त्यामुळे असे लोक सुटले तर दुःख होणारच."

तर, दुसऱ्या एका पीडितेनं सांगितलं की त्यांनी ही दंगल होताना स्वतः पाहिलं आहे.

त्या सांगतात, "लहान मुलांना मारणाऱ्यांना निर्दोष सोडलं यावर विश्वास बसत नाही. आम्ही त्या वेळी घडलेला प्रकार आमच्या डोळ्यांनी पाहिला आहे."

या प्रकरणातल्या अजून एक पी़डित शरीफा बीबी शेख सांगतात, "माझी चार मुलं, एक मुलगी आणि मी असे त्या वेळी घरात होते. गोंधळ झाल्यावर आम्ही एका ढाब्यापर्यंत पळालो. माझ्या 16 वर्षांच्या मुलाला माझ्यासमोर मारण्यात आलं. माझ्या मुलाला तलवारीनं मारून पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. कोर्टाच्या निर्णयानं मला दुःख झालं आहे."

या प्रकरणी शिक्षा मिळालेल्या बाबू बजरंगी यांच्याबद्दल त्या सांगतात, कोडनानी यांच्याप्रमाणे बाबू बजरंगी यालाही सोडून दिलं जाईल.

प्रतिमा मथळा शरीफा बीबी शेख यांच्या मुलाचा दंगलीत मृत्यू झाला होता.

त्या पुढे सांगतात, "हळूहळू सगळ्यांनाच सोडून दिलं जाईल. मला न्याय मिळालेला नाही. सुटल्यानंतर हे लोक पुन्हा त्याच गोष्टी करतील याची आम्हाला भीती आहे. कोणताही नेता आमच्या या अडचणींबद्दल बोलत नाही. आमची अशी मागणी आहे की यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून ते पुन्हा या गोष्टी करणार नाहीत. आता माझ्या घरात चार मुलांपैकी तीन मुलं आणि एक मुलगी आहे. माझ्या मृत मुलाची मला खूप आठवण येते, तो घरातला एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे."

या दंगलीची झळ बसलेली अन्य एक पीडित महिला रडून सांगत होती की, अनेक जण हा परिसर सोडून निघून गेले आहेत. तिला देखील हा परिसर सोडून जायचा आहे. पण, पैसे नसल्याने ती सोडून जाऊ शकत नाही.

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शांतता नांदेल की नाही, या बद्दल त्या साशंक आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)