तुम्ही मुलांना 'बलात्कार' कसा समजावून सांगता?

विरोध निदर्शनं Image copyright Getty Images

हैदराबाद येथे पशुवैद्यक तज्ज्ञावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नुकताच मुंबईत 22 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार झाला. पुण्यातही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

याआधी अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्यात लहान मुला-मुलींचं लैंगिक शोषण झालं आहे. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनंही झाली आणि त्यात लहान मुलंही सहभागी झाली होती.

जेव्हा सगळीकडूनच बलात्कारांच्या बातम्या येत असतात, तेव्हा या बद्दल आपल्या मुलांना समजून कसं सांगायचं, हा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहतो.

दिल्लीतील लहान मुलांचे मनोविकारतज्ज्ञ समीर पारीख सांगतात, "जेव्हा तुम्ही लहान मुलांना एखादा विषय समजवून सांगण्याच प्रयत्न करता तेव्हा एकाच प्रयत्नात त्यांना तो समणार नाही. मुलांना त्यांच्या समजुतीनुसार आणि आकलनानुसार विविध घटनांविषयी समजून सांगायला हवं."

बीबीसीच्या प्रतिनिधी निकिता मंधानी यांनी देशातल्या वेगवेगळ्या भागांतल्या लोकांशी चर्चा केली आणि ते मुलांना बलात्काराच्या घटनांविषयी कशाप्रकारे समजावतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

'खरंच बाहेरचं जग इतकं वाईट आहे?' : मोना देसाई, 11 वर्षांच्या मुलीची आई, मुंबई

मुलगी नवीन-नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असते. मला सुरुवातीला वाटायचं की तिनं बलात्कार अथवा लैंगिक शोषण या संदर्भातल्या बातम्या कमी प्रमाणात पाहाव्यात, पण हे शक्य नव्हतं.

ती 5 वर्षांची झाल्यानंतर आजूबाजूला काय सुरू आहे याबद्दल तिला समजून सांगायचा आम्ही प्रयत्न केला. जवळपास 2 वर्षांपूर्वी तिनं एका पुस्तकात रेप हा शब्द वाचला आणि मला त्याचा अर्थ विचारला.

Image copyright Getty Images

मी तिला खोलात जाऊन नाही समजावू शकले. पण मी तिला सांगितलं की, याचा अर्थ म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या संमतीविना तिच्या शारीरिक अवयवांचा छळ करणं. तसंच असं वागणं चुकीचं असतं हेही आम्ही तिला सांगितलं.

काश्मीरमध्ये 8 वर्षांच्या मुलीसोबत झालेल्या घटनेमुळे माझी मुलगी आणि तिची मैत्रीण अस्वस्थ आहेत. ती मला विचारते की, खरंच बाहेरचं जग इतकं वाईट आहे का?

या घटनांबद्दल ऐकून तिला वाईट वाटतं. पण सध्या ती मोठी होत आहे. त्यामुळे तिला बाहेर पडून जगाचा सामना करावा लागेल.

अन्यथा नेहमी कुणाला तरी तिच्यासोबत ठेवणं किंवा कपडे कसे घालावे, असा सल्ला देणं माझ्यासाठी कठीण काम होईल.

'सगळेच पुरुष एकसारखे असतात का?' - पारूल खन्ना, चंदीगढ, 14 वर्षांच्या मुलीची आई

आपल्या मुलीसोबत बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल चर्चा करणं अवघड काम असतं. मला वाटतं की तिनं लोकांवर विश्वास ठेवायला हवा, बाहेर पडून मैत्री करायला हवी तसंच कुणाच्यातरी प्रेमातही पडायला हवं.

पण मला तिच्या सुरक्षेविषयी चिंतासुद्धा वाटते. ती किती वाजता घरी येते, कसे कपडे घालते याचा मला काहीही फरक पडत नाही. पण तरीही मी तिला योग्य वेळी घरी येण्याबद्दल आणि कपड्यांबद्दल सल्ला देत असते.

Image copyright Getty Images

मला तिला जगाबद्दलचं सत्य सांगायचं आहे. पण हे सांगताना तिला त्रास व्हायला नको, असं मला वाटतं.

बलात्कार आणि लैंगिक घटनांबद्दल ऐकल्यानंतर तिला दु:ख होतं आणि सगळेच पुरुष एकसारखे असतात का, असं ती विचारते. समाजात सर्व प्रकारचे लोक राहतात, असं मी तिला समजावते. जग सुंदर आहे हा विश्वास तिला देणं एक अवघड काम आहे.

मुलींना नाही म्हणायला शिकवायला हवं - अखिला प्रभाकर, 8 आणि 10 वर्षांच्या मुलांची आई, मुंबई

मुलं 5 वर्षांची झाली तेव्हा आम्ही त्यांना गुड टच आणि बॅड टच याविषयी सांगायला लागलो. तसंच दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराचा आदर कशाप्रकारे ठेवायला हवं, हे त्यांना सांगितलं.

शरीरातले काही अवयव खासगी (प्रायव्हेट) असतात आणि त्यांना दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करू देऊ नये. या अवयवांना आई-वडील अंघोळ घालताना अथवा डॉक्टर उपचार करताना स्पर्श करू शकतात. त्यातही डॉक्टर आईवडिलांच्या उपस्थितीत मुलांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करू शकतात, असं आम्ही त्यांना सांगितलं.

Image copyright Getty Images

कुणाच्या स्पर्शामुळे वाईट वाटत असेल तर त्या व्यक्तीला नाही म्हणून सांगायला घाबरायचं नाही आणि त्याबद्दल आम्हाला लगेच सांगायचं, असंही आम्ही त्यांना सांगितलं.

मित्रांसोबत खेळताना एखाद्याला तो खेळ आवडत नसेल तर त्याला तो खेळ खेळायला जबरजदस्ती करू नये, असंही आम्ही मुलांना समजावलं. थोडक्यात आम्ही मुलांना नाही म्हणायला शिकवलं आहे.

कोणत्या प्रकारच्या माध्यमातून आमचे मुलं बातम्या वाचत अथवा ऐकत आहेत आणि त्यांच्या वयानुसार त्या बातम्या किती आवश्यक आहेत, यावरही आम्ही लक्ष ठेवतो.

'अशा घटनांवर मुलीशी कशी चर्चा करावी समजत नाही' - सुनंदा पराशर, 7 आणि 2 वर्षांच्या मुलींची आई

माझ्या 7 वर्षांच्या मुलीसोबत मी बलात्काराविषयी कधीच चर्चा केली नाही. पण दोन वर्षांपूर्वी मी तिला गुड टच आणि बॅड टचविषयी सांगायला सुरुवात केली.

या नंतर जेव्हा केव्हा आम्ही या विषयावर बोलतो तेव्हा ती मला बॅट टचविषयीची एक गोष्ट सांगते. सुरुवातीला मला खूपच चिंता वाटली. पण असं काहीही तिच्यासोबत झालं नसल्यानं मी निश्चिंत झाले.

Image copyright Getty Images

मी सांगितलेल्या गोष्टी समजून घ्यायचा माझी मुलगी प्रयत्न करते आणि मग ज्या संबंधी आम्ही बोलत आहोत त्या जागी स्वत: ला ठेवायचा प्रयत्न करते. माझ्या मुलीला या गोष्टी योग्यप्रकारे समजत आहेत की नाहीत, या बद्दल माझ्या मनात आई म्हणून नेहमी भीती वाटत असते.

माझ्या मुलीच्या वयाच्या मुलींसोबत अशाप्रकारच्या घटना होत आहेत, हे ऐकून मला भीती वाटते. बलात्कारासारख्या घटनेवर माझ्या मुलीशी कशाप्रकारे चर्चा करावी, मला माहिती नाही. मला भीती वाटते की, मी तिला बलात्काराच्या घटनेबद्दल सांगितलं तर ती स्वत:ला या घटनेसोबत जोडून बघेल.

बलात्कार विरोधी निदर्शनात मी माझ्या मुलाला घेऊन गेलो - अरुनाभा सिन्हा, 15 वर्षांच्या मुलाचे वडील, दिल्ली

गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या मुलासोबत लैंगिक हिंसाचाराच्या घटनांविषयी चर्चा करत आहोत. आपल्या मुलांची वाढ चांगल्याप्रकारे व्हायला हवी हे खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूच्या घटनांतून सर्वांनी शिकायला हवं.

पण आता मुलांना त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत नसल्याचं समजतं.

यामुळेच याबाबत चर्चा करणं आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे. काय करायला हवं आणि काय नको फक्त एवढंच त्यांनी समजून घेणं गरजेचं नाही तर यामुळे आपल्या भोवती अशा गोष्टी होऊ नये याबाबतची समजही त्यांना देणं गरजेचं आहे.

मागच्या रविवारी आम्ही आमच्या मुलाला बलात्कार विरोधी निदर्शनात सहभागी होण्यासाठी घेऊन गेलो होतो. तो एकटा नसून अनेक लोक भविष्याविषयी चिंता करत आहेत, हे त्याला समजायला हवं.

'बदल घडवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे त्याला कळायला हवं' - सुनयना रॉय, 11 आणि 3 वर्षांच्या मुलांची आई, बंगळुरू

बलात्कार आणि लैंगिक शोषणाविषयीच्या अनेक घटनांबाबत मी माझ्या मोठ्या मुलासोबत चर्चा केली आहे. तो कधी-कधी यासंबंधीच्या बातम्या वाचतो त्यामुळे संमती आणि हिंसेसारख्या गोष्टींवर मी त्याच्याशी चर्चा केली.

बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे त्याला समजायला हवं.

Image copyright Thinkstock

बलात्काराच्या घटनांबद्दल माझ्या मुलाला माहिती असायला हवं. आजच्या काळात महिलांसाठी लैंगिक छळ म्हणजे खूप मोठी भीती झाली आहे. तसंच प्रत्येकाच्या जीवनावरही या घटनांचा प्रभाव पडतो.

महिलांबद्दलचे अपमानकारक विनोद प्रत्येक घरात होताना दिसून येतात आणि हे विनोद भयंकर रूप कशाप्रकारे धारण करू शकतात, यावर आपण विचार करायला हवा.

बातम्या बघण्यापासून आणि वाचण्यापासून मी माझ्या मुलाला रोखत नाही. पण त्यांनी स्वत: यावर चर्चा करायला हवी असं मला वाटतं, त्यांच्यावर चर्चा थोपवायला मला आवडत नाही.

कदाचित मुलं आमच्यासोबत जी चर्चा करतात त्याचा अर्थ पूर्णत: ते समजू शकत नसतील. पण त्यांच्या आईसोबत असा वाईट व्यवहार करणं कदापि खपवून घेण्या योग्य नाही, हे त्यांना चांगलंच समजतं.

'आई, बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होत नाही का?' - कोमल कुंभार, 12 वर्षांच्या मुलीची आई

गेले काही दिवस टिव्ही आणि इंटरनेटवर कठुआ पीडितेचे फोटो फिरतायत. ते पाहून माझी बारा वर्षाची मुलगी सानियाने, ही मुलगी कोण आहे? असा प्रश्न मला विचारला. त्यावेळी मला तिच्यासोबत काय घडलं हे सांगावं लागलं. खरंतर तिच्यासोबत काय घडलं हे समजून सांगण्याचं तिचं वय नाही. पण मी सोप्या शब्दात तिला हे प्रकरण समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यावर सानियाने बलात्कार म्हणजे काय? असा सवाल मला केला. तेव्हा मी तिला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं की, आपल्या इच्छेशिवाय जर कोणी आपल्या अंगाला हात लावत असेल किंवा आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असेल, तर ते वागणं चुकीचं असतं. त्यावर सानियाने, बलात्कार का करतात? आणि मुलींच्याच बाबतीत असं का होतं? असे प्रश्नही मला विचारले. तिच्या प्रश्नांची उत्तर देण्याची माझी इच्छा असली तरी ते समजून घेण्याचं तिचं वय नाही. त्यामुळे हे फक्त मुलींच्याच बाबतीत न होता, मुलांच्या बाबतीतही होतं, असं मी तिला सांगितलं.

बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होत नाही का? असा प्रश्नही सानियाला पडला होता. त्यावर आपल्या देशात कायद्यानुसार त्यांना शिक्षा होते, असं मी तिला समजावलं.

सानिया आणि माझ्यात नेहमीच वेगवेगळ्या विषयावर संवाद घडत असतो. त्यामुळे मला हा विषय तिला समजावून सांगणं तसं कठीण गेलं नाही. परंतु सर्वांच्याच घरी अशी परिस्थिती असेल असं नाही. सध्य आजूबाजूला घडणाऱ्या घटना मन विचलित करणाऱ्या असल्या तरी त्याबाबत मुलांशी त्यांच्या भाषेत वेळोवेळी संवाद साधायलाच हवा, असं मला वाटतं.

(या बातमीसाठी मुंबईहून प्रशांत ननावरे यांनी इनपुट दिले आहेत.)

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)