2019 मध्ये भाजपचा पराभव करणे हेच लक्ष्य : सीताराम येचुरी

सीताराम येचुरी Image copyright cpim.org

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) 22 व्या अधिवेशनात सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.

अधिवेशनात 17 सदस्यीय पॉलिट ब्युरो आणि 95 सदस्यीय केंद्रीय समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे.

2015 साली सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली होती. त्या आधी प्रकाश करात हे सरचिटणीस होते.

पक्षाची स्थिती अत्यंत नाजूक असून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षं हाती असलेली सत्ता देखील त्रिपुरातून गेली.

त्यावर सीताराम येचुरी म्हणाले, "केवळ पक्षासमोरच नाही तर देशासमोर अनेक आव्हानं आहेत. नुकताच आपला जो पराभव झाला आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला मोठ्या जनाधाराची गरज आहे."

Image copyright cpim.org
प्रतिमा मथळा प्रकाश करात

"पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्राधान्य द्यायला हवं. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्यासोबत जोडावं लागणार आहे," असं ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा CPI(M) चा विचार आहे?

"देशाच्या वेगवेगळ्या राज्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पक्षांचं सहकार्य घेऊन आघाडी करावी लागू शकते," असं येचुरी म्हणाले.

"निवडणुका झाल्यानंतर आघाडीची स्थापना होते. 2004च्या निवडणुकानंतर UPAची स्थापना झाली. 1996 मध्ये युनायटेड फ्रंट मोर्चाची स्थापना झाली," यावेळी देखील असंच होईल असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images

"उत्तर प्रदेशात काँग्रेस अशक्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत हात मिळवणी करून काहीही साध्य करता येणार नाही. आपण कोणाबरोबर आघाडी केली पाहिजे हे त्या-त्या राज्यातील परिस्थितीवर अवलंबून असेल.

देशाची अखंडता आणि एकता टिकवायची असेल तर आपल्याला सर्वांत आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला 2019मध्ये सत्तेतून हटवावं लागेल," असं विधान त्यांनी केलं.

येचुरी यांचा आतापर्यंतचा प्रवास

चेन्नईत जन्मलेल्या येचुरी यांचं बालपण हैदराबादमध्ये गेलं. 1974 मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केलं. 1975मध्ये त्यांनी CPI(M) मध्ये प्रवेश केला. आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही जाऊन आले.

1984मध्ये ते पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये आले. त्यानंतर, 14व्या अधिवेशनात ते पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य बनले.

विशाखापट्टणम् येथे झालेल्या पक्षाच्या 21 व्या अधिवेशनात त्यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)