#5मोठ्याबातम्या : मुंबईत शिवसैनिकाची गोळ्या घालून हत्या

सचिन सावंत Image copyright Facebook / Sachin Sawant
प्रतिमा मथळा सचिन सावंत

पाहूयात विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या काही ठळक बातम्या.

1. महिनाभरात चार शिवसैनिकांची हत्या

मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील आकुर्लीचे शिवसेनेचे माजी उप-शाखाप्रमुख सचिन सावंत यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सने या बाबतीतली बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात झालेल्या तीन घटनांमध्ये चार शिवसैनिकांची हत्या करण्यात आली आहे.

याआधी शनिवारी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची जंगलात हत्या करून त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. त्याआधी अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती.

मटाच्या बातमीनुसार, रविवारी झालेल्या घटनेत दोन हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते पसार झाले. जखमी सावंत यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सचिन सावंत यांच्यावर आधीही प्राणघातक हल्ले झाले असल्याची माहिती समोर आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

2. तोंड आवरा, माध्यमांना मसाला देऊ नका - नरेंद्र मोदी

ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचं आणि परिणामी पक्षाला आणि सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करा, असा इशारावजा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या आमदार आणि खासदारांना दिला.

Image copyright EPA/JAGADEESH NV

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

ऊठसूठ केल्या जाणाऱ्या अशा वक्तव्यांनी पक्ष आणि सरकारबरोबर तुमची स्वतःचीही प्रतिमा मलीन करत असता, याची जाणीव मोदी यांनी करवून दिली.

दरम्यान, दुसरीकडे केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी बलात्काराच्याबाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "भारतासाख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडल्या म्हणून इतका गदारोळ कशासाठी माजवता," असं भाजपचे हे मंत्री म्हणाले. लोकसत्ताने याबाबतीतली बातमी दिली आहे.

3. 80 टक्के वयस्क भारतीयांचे बँक अकाऊंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेमुळे अखेर भारतातील 80 टक्के वयस्कांकडे बँकेची खाती आहेत, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्राध्यापकांना मिळणार सातवा वेतन आयोग

फायनान्शियल एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बँकेच्या जागतिक वित्त निर्देशांक डेटाबेसमध्ये 80 टक्के वयस्क भारतीयांची बँक खाती असल्याचं नोंद झाली आहे. आधारशी जोडणी केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचं या डेटाबेसमध्ये सांगण्यात आलं आहे.

ऑगस्ट 2014मध्ये जनधन योजना सुरू झाल्यानंतर मार्च 2018 पर्यंत 31 कोटी नवीन खाती उघडण्यात आली. पण चिंतेची बाब ही आहे की यातील 48 टक्के खात्यांमध्ये काही काळापासून व्यवहारच झालेले नाहीत. जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

4. 50 IITचे माजी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र पक्ष

प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून (IIT) पदवी घेतलेल्या 50 माजी विद्यार्थ्यांनी आपली पूर्णवेळ नोकरी सोडून SC/ST/OBC यांच्या हक्कांसाठी लढण्याच्या उद्देशानं एक राजकीय पक्ष काढला आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या 'बहुजन आझाद पार्टी'ला आता निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे.

या गटामध्ये SC/ST/OBC यातील लोकांचा समावेश असून आम्ही पक्षबांधणीचं काम सुरू केल्याचं माजी विद्यार्थी आणि या गटाचे नेते नवीन कुमार यांनी सांगितलं.

पण हा पक्ष 2019 लोकसभेची निवडणूक लढण्याची घाई करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. आधी त्यांचं लक्ष आहे 2020 साली होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर.

5. मुस्लीम चालक असल्यानं कॅब रद्द केली

आपल्या ओला कॅबचा चालक मुस्लीम असल्यानं आपण बुकिंग रद्द करत आहोत, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या अभिषेक मिश्रा नावाच्या ग्राहकाला सोशल मीडियावर लोकांनी चांगलंच झोडपलं.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेकने आपली बुकिंग रद्द केल्याचा एक स्क्रीनशॉट शेअर करत त्यावर "मी माझे पैसे जिहादींना देऊ इच्छित नाही," असं लिहिलं होतं. 20 एप्रिल रोजी लखनऊमध्ये हा प्रकार घडल्याचं समजतं.

अभिषेक मिश्रा हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून त्याला ट्विटरवर अनेक केंद्रीय आणि उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री फॉलो करतात.

अभिषेकच्या या ट्वीटला सोशल मीडियावर लोकांनी चांगलंच उचलून धरलं आणि ओलाला उत्तर देण्यास भाग पाडलं. अखेर रविवारी संध्याकाळी ओला कॅब कंपनीने त्या ट्वीटला उत्तर देत म्हटलं - "आम्ही आमच्या चालक आणि प्रवाशांबरोबर कुठलाही भेदभाव करत नाही. भारतासारखंच आम्ही धर्मनिरपेक्ष. आम्ही आमच्या चालक मित्रांना आणि प्रवाशी मित्रांना विनंती करतो की त्यांनी एकमेकांना नेहमीच आदराने वागवावं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)