बेळगाव ग्राउंड रिपोर्ट : ‘बेळगाव आता कर्नाटकातच पाहिजे’ असं का म्हणत आहेत काही मराठी तरुण?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं?

कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशाचं लक्ष तर तिकडे लागलं आहेच, पण कर्नाटक म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात पहिला विचार येतो तो बेळगावचा.

बेळगावच्या न संपलेल्या सीमालढ्याचा परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावरही दिसून येतो. पण ६० वर्षांहून अधिक काळ न सुटलेल्या या प्रश्नाचा परिणाम बेळगावातल्या नव्या तरुण पिढीवर काय आणि कसा होतो?

हाच प्रश्न घेऊन 'बीबीसी मराठी'ची टीम बेळगावात पोहोचली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, आपले पाय रोवू पाहणाऱ्या आणि तरीही स्वत:ची स्वतंत्र सामाजिक आणि राजकीय जाणीव असणाऱ्या बेळगावातल्या तरूणांशी आम्ही बोललो.

पुण्या-मुंबई आणि बेंगळुरूशी समान मैत्री असणाऱ्या बेळगावातल्या या नव्या पिढीमध्येही बरीच मतं-मतांतरं आहेत. मागच्या पिढ्यांपेक्षा काहींचे विचार वेगळे आहेत तर काही मागच्या पिढीचा लढा पुढे नेण्याचा मानस व्यक्त करतात.

बेळगावातल्या नव्या पिढीला सीमाप्रश्न आणि त्यासाठीचा लढा आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो का?

'मराठी माणूस सोयीसुविधांपासून वंचित'

मैथिली कपिलेश्वरकर माध्यम संयोजक आहेत. घरातल्या मागच्या पिढ्या सीमालढ्यात भाग घेतांना त्यांनी पाहिल्या आहेत.

त्या सांगतात, "मला हा नक्कीच महत्त्वाचा प्रश्न वाटतो. आमच्या भाषिक स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे आणि त्यासाठी ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत त्याच इथे नाहीत.

महाराष्ट्रापेक्षा इथे कर्नाटकात सोयीसुविधा चांगल्या आहेत असं म्हटलं जातं, पण मराठी माणूस जर त्या उपभोगूच शकत नसेल तर त्यांचा उपयोग काय?

Image copyright Sharad badhe/bbc
प्रतिमा मथळा चर्चेत सहभागी झालेले बेळगावचे तरुण-तरुणी.

म्हणूनच आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जी सीमालढ्याची चळवळ सुरू आहे, आजही त्यात माझ्या पिढीचा सुज्ञ तरुण आहे. माझी पिढी असेल वा माझ्यानंतर येणारी, जे या अस्मितेच्या लढ्यामध्ये होरपळले आहेत ते सगळे या लढ्यात सहभागी आहेत."

'संघर्ष केवळ प्रशासकीय पातळीवर'

स्वाती कुलकर्णी लग्न होऊन बेळगावात आल्या आणि इथल्याच झाल्या. इथल्या सांस्कृतिक चळवळीत त्या कार्यरत आहेत, त्यांची नाट्यसंस्था आहे.

"ठीक आहे की मला कानडी भाषा येत नाही, पण ती मला समजावी, कळावी ही माफक अपेक्षा असते, यासाठी काही प्रयत्न केले जात नाहीत. पूर्वी एकेकाळी इथे ७०-७२ टक्के मराठी लोक होते. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे सजग झालेला मराठी माणूस आता इथून महाराष्ट्रात स्थलांतरित होतो आहे," त्या म्हणतात.

पण पुढे त्या म्हणतात, "माझ्या स्वत:साठी हा मुद्दा आता महत्त्वाचा राहिलेला नाहीये. कारण माणसां-माणसांमध्ये आता काही प्रॉब्लेम नाही. जो काही आहे तो केवळ प्रशासकीय पातळीवर आहे. कानडी आता शाळेतच अनिवार्य विषय असल्यानं मुलं आता ती भाषा शिकतात आणि म्हणून नव्या पिढीच्या दृष्टीनं तो काही महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे असं मला दिसत नाही."

Image copyright Sharad badhe/bbc
प्रतिमा मथळा कर्नाटक विधानसभा.

'सीमाप्रश्न माझ्यासाठी गौण, मला विकास हवा'

सुदीप बिलावर हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांचं पण म्हणणं तेच आहे. "माझ्यासाठी सीमाप्रश्न आता महत्त्वाचा उरलेला नाही. इथं बेळगावात सगळ्या सुविधा आहेत. थोडीफार तडजोड करावी लागते, पण ते चालायचंच. हे नक्की की मराठी माणसांना आजही जो संघर्ष करावा लागतो तो सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण पूर्वीसारखी सक्ती आता वाटत नाही. सीमाप्रश्न आजच्या पिढीला सुसंगत वाटत नाही.

"आजच्या पिढीला शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे आणि विकास पाहिजे. या प्रश्नात सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य आहे. काही वर्षांपूर्वी मला हे विचारलं असतं तर मी म्हटलं असतं की बेळगाव महाराष्ट्रात जायला पाहिजे, पण आता मी म्हटतो की ते कर्नाटकातच राहिलं पाहिजे. कारण इथला विकास, शिक्षणाच्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर मी पाहिलं, म्हणून माझ्या मतात हा बदल झाला."

बेळगाव ही कर्नाटकची उपराजधानी झाल्यावर सहाजिकच इथे सरकारी योजनांच्या पैशांच्या ओघ वाढला. राजकीय उठबस वाढली. त्याचा परिणाम इथल्या सीमाप्रश्नाविषयीच्या मतांवर पहायला मिळतो. पण काही तरुणांमध्ये सीमालढ्याची धग अजूनही कायम आहे.

'सीमालढ्यातल्या मी चौथ्या पिढीतला मावळा'

शिवराज चव्हाण अभिनेता आहे. पुण्या-मुंबईमध्ये चित्रपट आणि नाटकांसाठी कायम येत असतो.

"बेळगाव सीमाप्रश्न मला तितकाच महत्त्वाचा वाटतो जितकी महत्त्वाची आई. आई आणि मातृभाषा हे माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचं. मराठी असल्यानं इथं कायम दुय्यम वागणूक दिली जाते आणि बेळगावात आता तर मराठी असणंच गुन्हा झाला आहे. मी स्वत: सीमालढ्यात सहभागी असतो. माझ्या बाबांकडून माझ्यावर हे संस्कार झाले आणि मी आता चौथ्या पिढीचा मावळा आहे या लढ्यातला," शिवराज म्हणतो.

Image copyright Sharad badhe/bbc

शिवराजसारखाच संकेत कुलकर्णीसुद्धा चित्रपटांमध्ये रमणारा आहे. त्याची एक फिल्म नुकतीच 'कान्स चित्रपट महोत्सवा'पर्यंत झेप घेऊन आली. पण त्याचं मत अगदी विरुद्ध आहे.

"हा सीमाप्रश्न ज्या परिस्थितीत आहे तो पाहता मला तर काही फरक पडत नाही, अशीच स्थिती आहे. शाळेत आम्हाला एक विषय कानडीचा असायचा म्हणून कदाचित आम्हाला काही वाटत नसेल फारसं. माझ्या आजोबांकडून मी कायम सीमालढ्याबद्दल ऐकलं आहे. पण त्यांचे विचार ऐकता, माझी पिढी आणि त्यांची पिढी यांच्यात काही मतभेद आहेत हे नक्की," संकेत सांगतो.

'भाषा हा जगण्याचा आधार, तो काढला तर कसं होईल?'

पियूष हावळ कधी मुंबईत सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करायचा. पण बेळगावची आणि लढ्याची ओढ होती म्हणून परत आला. आता सीमालढ्याविषयी सोशल मीडियावर सतत लिहित असतो. त्याला हा प्रश्न कालविसंगत झाला आहे असं अजिबात वाटत नाही.

"बेळगाव सीमाप्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो शेवटी इथल्या माणसांच्या मूल्यांचा आणि तत्त्वांचा प्रश्न आहे. भाषा हा जगण्याचा आधार आहे आणि तो जर काढला तर जगण्याला काहीच अर्थ नाही. तोच मुद्दा धरून सीमालढा हा तत्त्वांचा लढा आहे. नवी पिढीही या लढ्यामध्ये सामील होते.

"१ नोव्हेंबर हा जो आम्ही निषेध दिन म्हणून दरवर्षी पाळतो, त्यात प्रत्येक वर्षी तरुणांचा सहभाग वाढतो आहे. ही गर्दी काही पैसे देऊन गोळा केलेली नसते तर एका तळमळीनं आणि आशेनं ते सगळे एकत्र आलेले असतात," पियूष म्हणतो.

Image copyright Sahrad badhe/bbc

'रस्ते आणि गटार झाले म्हणजे विकास नसतो'

कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा जास्त सुविधा मिळतात, मग महाराष्ट्रात का जावं?

या प्रश्नावर पियूष अधिक आक्रमक होतो. "इथं सुविधा असतील, पण त्या माणसाला त्याच्या भाषेतून मिळणं जास्त महत्त्वाचं आहे ना? मातृभाषेतनं शिक्षण घ्या असं जगभर सांगितलं जातं, पण त्याचवेळेस इथं मातृभाषेतनं शिक्षण घ्यायला काहीही वाव नाही. फक्त कानडी भाषेचा गवगवा केला जातो. हा मराठी माणसांवर अन्याय आहे. त्यामुळे मराठी माणसांचा कोणताही विकास कर्नाटकात राहून होणार नाही. रस्ते आणि गटारी झाल्या म्हणजे विकास नसतो," तो प्रत्युत्तर देतो.

पण पियूषच्या मतांशी त्याचे काही समवयस्क सहमत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं नव्या पिढीसाठी हा प्रश्न फारसा कालसुसंगत राहिला नाही आहे.

अक्षता आळतेकर-पिळणकर फार्मा क्षेत्रात काम करते. तिला कानडीशी वैर करावं असं वाटत नाही. "आपण ज्या कोणत्या राज्यात रहात असू तिथली भाषा शिकण्यात मला काही गैर वाटत नाही. गेली ६० वर्षं हा लढा सुरू आहे. प्रत्येक जण आपपल्या परीनं त्याला सपोर्ट करतो. पण आम्हाला आता काही प्रॉब्लेम यावा अशी काही परिस्थिती आलेली नाही. सामोपचारानं हा मुद्दा सोडवला गेला तर ठीकच आहे, पण केवळ त्या एका मुद्द्यावरच फोकस आपण करणार असू तर ते योग्य नव्हे," ती म्हणते.

'सामान्यांपेक्षा राजकारण्यांच्या दृष्टीनं प्रश्नाला महत्त्व'

सायली शेंडेचं नुकतंच महाविद्यालयीन जीवन सुरू झालं आहे. "मला नाही वाटत की हा मुद्दा योग्य आहे. मी शाळेत असतांना, आता कॉलेजमध्ये असताना माझे दोन्ही मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही दोन्ही भाषा बोलतो. आम्हाला कोणाला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही,"ती तिचा अनुभव सांगते.

सायलीचा मोठा भाऊ चिन्मय व्यावसायीक आहे. ते सांगतात," माझ्या पिढीतही माझे असे अनेक मित्र आहे ज्यांना वाटत राहतं की महाराष्ट्रात गेलं पाहिजे बेळगाव. पण मला स्वत:ला त्या मुद्द्यात काही महत्त्वाचं वाटत नाही. त्याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. सामान्य माणसांना त्याचा काही उपयोग होत नाही."

अर्थात, बेळगावात लढ्याच्या छायेत का होईना, पण कानडी आणि मराठी दोन्ही भाषांनी अनेक वर्षं घरोबा केला आहे. त्यामुळे मराठी बोलणारे कानडी भाषिकही इथे राहतात. त्यांच्यातल्या तरुण पिढीला या सीमाप्रश्नाबद्दल काय वाटतं हेही आम्ही विचारलं.

'आम्ही मराठी शिकलो, तुम्ही कन्नड शिका'

निरंजन नवलगुंद राष्ट्रीय पातळीवरचा नावाजलेला बुद्धिबळपटू आहे. त्याचं मत स्पष्ट आहे. "बेळगाव कर्नाटकात जायला पाहिजे की महाराष्ट्रात हा मुद्दा मला आता तितका सुसंगत वाटत नाही. आता कुठे इतक्या काळानं बेळगाव प्रकाशात येतंय, इथं विकास होतोय. आणि हे सगळं चांगलं होत असतांना आता अचानक कोणता आत्मघातकी निर्णय आम्हाला नको आहे," तो म्हणतो.

पण त्याच्या मराठी भाषिक मित्रांना होणारा त्रास तो नाकारत नाही.

"मला माझ्या मराठी मित्रांना होणारा त्रास दिसतो आणि तो आम्ही मान्य करायलाच पाहिजे. उत्तर काय असेल हे शोधलं तर मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. मला स्वत:ला तरी अभिमान वाटतो की मी बेळगावचा आहे, जिथं मराठी हीसुद्धा भाषा बोलली जाते. मी तरी बेळगावला बेळगावच म्हणतो. गरज पडली तरंच बेळगावी म्हणतो. मी बेळगाव नावाच्या शहरातच जन्मलो आणि मोठा झालो," निरंजन अभिमानानं सांगतो.

Image copyright Sharad badhe/bbc
प्रतिमा मथळा बेळगावात सरकारी पाट्या या कन्नडमधूनच दिसतात.

हृषिकेश सांगलीकर म्हणतो, "मी स्वत: कन्नडिगा आहे आणि बेळगाव म्हणा की बेळगावी, मला काहीही फरक पडत नाही. हिंसा नको इतकंच मला वाटतं. मी कन्नडिगा असूनही मराठी बोलायला शिकलो, तुम्हीही कानडी शिका. सगळे असं शिकूनच पुढे जाऊ शकू असं मला वाटतंय."

निवडणुकांचं वारं बेळगावातही वाहतंय. पुन्हा मराठी-कानडी वाद, सीमाप्रश्न हा नेहमीप्रमाणे त्यात कळीचा मुद्दा ठरणारच. पण त्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या नव्या पिढीची ही मतं आपल्याला परिस्थितीचा अंदाज देतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)