गडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'

महाराष्ट्र पोलीस, नक्षलवादी, गडचिरोली Image copyright BHAMRAGAD POLICE
प्रतिमा मथळा नक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा

महाराष्ट्र पोलिसांचं सी-६० पथक आणि सीआरपीएफच्या नवव्या बटालियननं केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी कारवाईत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही चकमक झाली. तब्बल दीड ते दोन तास ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात एसएलआर आणि एके-४६ या आधुनिक बंदुकांचा समावेश आहे.

या चकमकीत, माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम आणि श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू या मूळच्या तेलंगणातल्या माओवादी नेत्यांचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी चळवळीच्या 38 वर्षांच्या इतिहासात ही एक मोठी पोलीस कारवाई आहे. चकमकीत इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा मृत्यू होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.

या चकमकीनंतर आता पुढे काय होणार, याचे परिणाम काय होणार, माओवादी या कारवाईला प्रत्युत्तर देणार का? पोलिसांनी केलेली ही कारवाई कितपत महत्त्वाची आहे?

प्रतिमा मथळा गडचिरोली जिल्ह्यातील ताडगाव पोलीस स्थानक.

नक्षलवाद्यांच्या मोठ्या हल्ल्याची शक्यता?

'इंडियन एक्स्प्रेस'चे ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांच्या मते, ''रविवारी पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत तब्ब्ल १६ माओवाद्यांचा मृत्यू झाल्यानं, या गटात बदला घेण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे."

"माओवादी या घटनेमागील कारणं शोधून त्वरित नवीन पर्याय शोधून, पोलीस पथकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतील. पण ज्यापद्धतीची कारवाई पोलिसांनी केली आहे, ती माओवाद्यांना मोठा धक्का देणारी आहे हे निश्चित," असं ते पुढे सांगतात.

'दैनिक लोकमत'चे जेष्ठ पत्रकार नरेश डोंगरे सांगतात, "या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीला जोरदार हादरा बसला आहे. त्यामुळे या भागातल्या माओवाद्यांचं मनोबल ढासळण्याची भीती लक्षात घेत ते जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा तेव्हा माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ले करून घातपात घडविले आहेत. हे लक्षात घेता सुरक्षा दलानं अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे."

"भविष्यात एखाद्या नेत्याचे किंवा अधिकाऱ्याचे अपहरण अथवा हत्या करण्याचं षडयंत्र माओवादी रचू शकतात. त्यादृष्टीनेही सुरक्षा दलानं खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे, या घडामोडींनी बिथरलेले माओवादी गावकऱ्यांवर सूड उगवण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे गावकऱ्यांना संरक्षण देण्याला सुरक्षा दलानं सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे," डोंगरे पुढे सांगतात.

'द हिंदू'चे पत्रकार पवन डहाट यांचं विश्लेषण मात्र वेगळं आहे. ते म्हणतात, "माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात 2014 पासून पुन्हा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. काल घडलेल्या या घडामोडींनंतर त्यांचं नक्कीच मोठं नुकसान झालं आहे. त्यातल्या त्यात या गटाचे मुख्य सूत्रधार असलेले श्रीनिवास आणि साईनाथ हे मारले गेलेत. त्यामुळे या माओवाद्यांची ताकद कमी झाली आहे. म्हणून हे म्हणणे योग्य होणार नाही ही संघटना स्थानिक रहिवासी किंवा पोलिसांवर हल्ला करतील. कारण गडचिरोली मधल्या माओवाद्यांचा गट हा तेवढा ताकदीचा नाही जेवढा छत्तीसगढमधल्या सुकमा आणि बिजापूर भागातला आहे.''

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)